कोकणातली होळी
हिंदू पंचांगात संपन्न होणाऱ्या सणामध्ये कोकणात सर्वाधिक महत्त्व असलेला सण म्हणजे होळी. काम धंद्यानिमित्त कोकणाबाहेर असणारी मंडळी सर्व अडचणींवर मात करीत होळीचा सण साजरा करण्यासाठी आणि ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावी हजेरी लावतात. कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवाला मोठे महत्त्व असते. येथील मंडळी नोकरी व्यवसायात कितीही मोठी झाली आणि दूरवर गेली तरी होळीच्या सणाला ग्रामदेवतेच्या पालखीपुढे नतमस्तक होण्यासाठी येतातच. लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पाहतात त्यावेळी कोकणी माणसांना काबाडकष्ट करण्यासाठी वर्षभराची ताकद मिळालेली असते. तर चाकरमान्यांना गच्च भरलेल्या ट्रेनच्या गदीर्त लोंबकळण्यासाठी, मुंबईतला संसार रेटण्यासाठी, गावच्या आवशी, बापाशीक-मोठ्या भावाक आधार देण्यासाठी जोर आलेला असतो.
होळीचा सण म्हणजे कोकणवासियांच्या उत्साहाला कमालीचे उधाण येणारा समजला जातो. फाक पंचमीला पहिल्या होळीला सुरवात झाली की, पालखी राजांगणी जाईपर्यंत कोकणातील गावकऱ्यांमध्ये होळीचा ज्वर भरलेला असतो.
तळकोकणात वेंगुर्ल्याचे गावकरी ‘होळी’ (पोफळीची झाडं) नाचवत घेऊन येत असताना पाठीमागून पोरांनी शिमग्याच्या आधीच चावट गाणी सुरू केलेली असतात. तर तिकडे वर कोकणात गुहागरकडे गोमूच्या नाचाची प्रॅक्टिस सुरू असते. चाकरमानी बायकापोरांसकट, पैसे गाठीक बांधून तो गावाला निघालेला असतो. होळीच्या दिवसांत देवही देऊळ सोडून खांब्याच्या रूपाने चव्हाट्यावर आलेले असतात….. भक्तांची गा-हाणी ऐकण्यासाठी!
‘ देवा…माझ्या चेडवाचा लगीन जमना नाय. खूप यत्न केले. दिसाक बरा, कामाक वाघ. कोणच्याय घरात पडला तर नाव काढीत. आवशी बापाशीक पुन्हा बघुक नको. पण, असा काय होता! इलेली माणसा पुन्हा फिरनत नाय कित्याक… आम्ही कोणाचा काय वायट केला नाय, मग आमच्याच मागे किलेस कित्याक?’
अवसाराच्या तोंडून देव बोलतो…
हू हू हू हू…
‘ तुका काळजी कित्याक? मी काय ता बघून घेतंय. वर्साच्या आत लगीन जमतालाच. ही विभूत घे! पुडी लाल धाग्यात चेडवाच्या गळ्यात बांध! इलो माणूस मागे जावचोच नाय! देवांक विसरा नको. त्याची सेवा कर. जा!’
गणपतीनंतर कोकणात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. वरच्या कोकणात गुहागर, श्ाीवर्धनपासून चिपळूण, रत्नागिरीपर्यंत होळीला एकच धम्माल! गणपतीपेक्षा होळीला या भागात खूप महत्त्व. पाच दिवस, सात दिवस अग्नीच्या साक्षीने साजरा करायचा आनंद! खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण. भट-बामणांचा आधार न घेता! पूजाअर्चा मानकरी असलेल्या कुणबी, मराठ्यांनीच करायची. शिमग्याला भटजी लागत नाही. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रत्नागिरीच्या पट्ट्यात सुरमाड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्यात रूपात होळी सजते. होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्यासाठी चुरस असते. पण होळी कुठून आणि कुठली आणायची यासाठी कौल लावला जातो, देवाला विचारणा होते! देवाने सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडणार. ढोलताशाच्या गजरात, नाचत, गात ती गावात देवळाच्या समोर किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते. आणि सुरू होतो शिमगा, पौणिर्मेच्या अगोदर तीन, पाच, सात दिवस. पौणिर्मेला मुख्य होळी जळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव शिमगामय होतो. देवळाच्या मुख्य मंडपाच्या माडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते. ही पालखी व त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो. तिला नवे रूप लावले जातं. रूप म्हणजे सजवणं. पालखी आणि मुख्य देवाच्या चांदी-पितळेच्या रूपातल्या मूतीर्ला दागिने, कपडे, नक्षीकामाने सजवलं जातं.
पालखी उचलायची कुणी, ती कुठल्या वाडीतून न्यायची, ती कुठे प्रथम थांबवायची, जागरण कुठे, जेवण कुठे, खेळे कुठे हे सारं सारं ठरलेलं आहे आणि त्याचा निर्णय पन्नास-साठ वर्षांमध्ये झालेला नाही, तर पार शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून त्याचा इतिहास आहे. आदिलशहाच्या राजवटीत कोकणातल्या महसूल वसुलीसाठी मराठे सरदारांना गावं वाटून देण्यात आली होती. पुढे शिवाजी महाराजांच्या काळातही ती प्रथा कायम राहिली आणि पुढे त्याची वहिवाट झाली. अनेक वाड्यांच्या मिळून बनलेल्या गावांमधून दस्त गोळा केला जाई आणि त्याची जबाबदारी एका सरदाराकडे असे. तोच त्या गावचा पुढारी.
होळी रे होळी पुरणाची पोळी!
सायबाच्या बोच्यात बंदुकीची गोळी!!
हाय रे हाय!
दळव्याच्या संज्यात काय दम नाय!!
नावेर्कराच्या बैलाचा ढोल!
आणि तावड्याच्या नानाची टांग!!
होळीचा होम धडधडून पेटू लागला की या आणि यासारख्या असंख्य ‘फाक’ गुहागरपासून ते शिरोड्यापर्यंत वाडीवाडीत ऐकू येतात. मूठ आवळून तोंडावर नेत बो बो बो… करत सारा आसमंत गाजवून काढायची हीच असते संधी. शिवाय वाडीत खालीपिली त्रास देणा-यांच्या नावाने शिमगाही घालायचा असतो तो याचवेळी. नावासकट आणि तो समोर असताना. यावेळी सबकुछ माफ!
उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी म्हणण्याचा काळ औद्योगिकरणाच्या रेट्यात खाडीमागेर् समुदात वाहून गेला त्याला पाऊणशे वर्षं उलटून गेली. कुणबी व बलुतेदारी हातात हात घालून नांदत होती, तोपर्यंत गावकुसाला महत्त्व होतं. पण शेती आतबट्ट्याची झाली, सर्व व्यवहार पैशात होऊ लागल्यामुळे दापोलीपासून शिरोड्यापर्यंतच्या घरटी माणसाला शहरांचा आधार धरण्यावाचून पर्याय उरला नाही. पोटासाठी दाही दिशा पसरलेल्या कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडिक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती जत्रा, गणपती आणि होळीच्या निमित्ताने. तेच आज त्याच्या उरल्यासुरल्या आशेचा आधारवड बनलेत…
-संकलित
PC: google