उन्हाळ्यात करा झटपट लोणची
लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं.भारतीय आहारामध्ये लोणच्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोणची जेवणाची स्वादिष्टता वाढवितात. लोणच्याची मागणी देश तसेच विदेशांतही आहे. बाजारात आंब्याची विविध प्रकारची लोणची उपलब्ध आहेत, तसेच मिश्र लोणच्यांमध्येही आंबा वापरला जातो; परंतु भारतात मुख्यतः तेलयुक्त लोणची मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत. यातलेच काही प्रकार तुमच्यासाठी खास…
झटपट मिरचीचे लोणचे
साहित्य :
पाव किलो हिरवी मिरची, ५-६ मोठी लिंब, १ मोठा चमचा मोहरीची डाळ, १ चमचा हिंग, मीठ.
कृती :
• मिरची धुवून देठ काढून कोरडी करुन मिक्सरमध्ये जाडसर वाटावी.
• लिंबाच्या फोडी करून सर्व बिया काढून टाकाव्यात.
• लिंबाच्या फोडी मिक्सरवर बारीक वाटाव्यात.
• लिंबाचा गोळा, मिरची, हिंग, मोहरी, डाळ व मीठ एकत्र करावे.
• दोन दिवसात लोणचे मुरते व खाण्यायोग्य होते.
मोहरीची डाळ व हिंग न घालता चवीपुरती साखर घालून केलेले लोणचे उपवासालाही चालते.
कैरीचे लोणचे
साहित्य – दीड किलो लोणच्याच्या कडक कैर्या (साधारण मध्यम आकाराच्या १३-१४ कैर्या), २५० ग्रॅम मीठ, २ चमचा मेथीचे दाणे, ४ चमचे हळद, १० ग्रॅम हिंग खडे, ८ चमचे तिखट, १०० ग्रॅम मोहरीची डाळ, २५व ग्रॅम गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी ३ चमचे.
कृती – प्रथम मीठ भाजून घ्यावे म्हणजे कैर्यांना फार पाणी सुटत नाही. कैर्यां धुवून, पुसून घ्याव्यात. कैरीच्या बेताच्या आकाराच्या फोडी कराव्यात व त्यांना मीठ व हळद लावून ठेवावे. ३-४ चमचे तेल एका पातेल्यात घालून त्यात हिंग व मेथी तळून घ्यावी, नंतर त्याच तेलात हळद परतून घ्यावी. पातेले खाली उतरवून त्यात तिखट घालून जरा हलवावे. हिंग व मेथी कुटून घ्यावी, नंतर उरलेल्या तेलाची फोडणी करून घ्यावी. स्टीलच्या पातेल्यात किंवा परातीत मोहरीची डाळ, मीठ, हळद, तिखट, हिंग, मेथीची पूड व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात, त्यावर गार झालेली फोडणी ओतून लोणचे कालवावे व बरणीत भरावे. लोणच्याच्या फोडींवर तेल राहील इतके असावे.
कैरीचे गोड लोणचे
साहित्य- आंबट कैरी १ किलो, मोहरी डाळ १०० ग्रॅ. धणे ५० ग्रॅ. मेथी दाणे २५ ग्रॅ. गूळ ५०० ग्रॅम, मीठ, लालतिखट चवीनुसार, २ टे. स्पू. लवंग दालचिनी जायफळ पुड, हिग, तिळाचे तेल.
कती- कैरीच्या मध्यम फोडी करून घ्या. धणे-मेथीदाण्याची भरडपूड करा. गूळ किसून घ्या, मोहरीडाळ, धणेपुड, मेथी पुड कोरडी भाजून घ्या. हिग पूड करा, एका परातीत लाल-तिखट, हिग व सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडं गरम तेल ओता, किसलेले गूळ व मीठ टाकून एकत्र करा. कैर्यांच्या फोडी घालून कालवा. वरून तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतवून बरणीत भरून ठेवा. अधूनमधून हलवत रहा.
किसाचे लोणचे
घटक – कच्च्या आंब्याचा किस एक किलो, मीठ 110 ग्रॅम. साखर 20 ग्रॅम, हिंग दहा ग्रॅम, मेथी (रवाळ पूड) 20 ग्रॅम, मोहरी डाळ (रवाळ पूड) 40 ग्रॅम, मिरची पूड 30 ग्रॅम, सोडिअम बेन्झोएट 250 मिलिग्रॅम.
कृती – फळे स्वच्छ धुऊन कोरडी करावीत. साल पूर्णपणे काढून किस करावा. किसामध्ये मीठ, साखर, हिंग, मेथी, मोहरी व सोडिअम बेन्झोएट मिक्स करावे व कडक उन्हामध्ये एक दिवस वाळवावे. वाळवताना मधून मधून मिश्रण हलवावे. त्यानंतर मिरची पावडर मिक्स करावी व स्वच्छ निर्जंतुक बाटल्यांमध्ये लोणचे भरावे. एक वर्ष हे लोणचे चांगले टिकते.