अनादि निर्गुण
चातुर्मासाचे चार महिने म्हणजे सणवार, गोडधोड यांची रेलचेल. नागपंचमी, नारळी पौणिमा, गोकुळाष्टमी, बैल-पोळा यात श्रावण्महिना संपतो न संपतो तोच गणपती बाप्पा मोरया च्या गजरात विघ्नहर्त्या गजाननाचे आगमन होते. पाठोपाठ गौरी-माहेरवाशिणी येतात. स्त्रियांची धांदल, धामधूम विचारुन नका! सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. गणपतीसाठी मोदक, गौरीसाठी घराघरातील रितीप्रमाणे पंचपक्वान्नं, पुरणवरण घावनघाटलं, भाजीभाकरी नैवेद्याला केली जाते. कुठे काही कमी पडत नाही नं? सगळं व्यवस्थित होतंय नं याकडे वडीलधाऱ्यांचं लक्ष असतं यथास्थित पाहुणचार केला जातो. आपोआपच नवीन लग्न होऊन आलेल्या सुनांना घरचे रितीरिवाज समजतात, माहीत होतात. गावात माहेर असणाऱ्या स्त्रिया स्वत:च्या घरचे सवाष्ण जेवण आवरुन मग स्वत: माहेरी जातात. तेवढाच दोन क्षणांचा विसावा! आनंदाची देवाणघेवाण !
गौरीगणपतीला निरोप दिला की, वेध लागतात नवरात्राचे! आपल्याकडचे सणवार म्हणजे ‘खा प्या व मजा करा.’ एवढेच नाही तर कृतज्ञतेची, एकमेकांतील आपपर भाव, द्वैत भाव विसरण्याची शिकवण देणारे आहेत. कृतज्ञता माणसांबद्दल तर हवीच पण निसर्गा विषयी सर्व प्राणीमात्रांबद्दल सुद्धा हवी! निसर्गाच्या जवळ जा, दुसऱ्यांचे चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करा. स्वत:मधले दुर्गूण ओळखून ते कमी करण्याचा प्रयत्न करा. माणुसकी जपा-माणुसकीने वागा असा संदेश हे सण आपल्याला देतात.
नवरात्राचे नऊ दिवस आदिशक्तीची पूजा बांधण्याचे दिवस ! घरादाराची स्वच्छता, साफ-सफाई केली जाते. घरोघरीच्या स्त्रियांची गडबड बघण्यासारखी असते. रोजचा नैवेद्य, माळ, दिवा, सवाष्ण, कुमारीका एक का दोन! त्यातच पहाटेच्या पवित्र वातावरणात शेजारीण, जावाजावा, सासवासुना, गावदेवीच्या दर्शनाला जातात. तिची खणानारळाने ओटी भरुन सौभाग्यासाठी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. तिच्यामधील शक्तीला अंश आपल्यासाठी प्रेरीत होण्याची मागणी करतात. खेडोपाडी तर देवीला आईच म्हणतात. विठूमाऊली, ज्ञानेश्वर माऊली आपणाला माहीतच आहेत. मग ही तर प्रत्यक्ष मातृरुपा जगन्माऊली दीनोध्दारीणी! एकमेकींना भेटलं की, आईला निघालात का? असं विचारतात एवढी त्यांची श्रद्धा, भक्ती जी त्यांना अनेक संकटातून पार करते. नवरात्रात सगळीकडे भक्तीमय आनंददायी वातावरण असते. प्रत्येक गावची, प्रत्येक देवीची परंपरा वेगळीअसते. काही ठिकाणी नऊ दिवस देवीच्या देवळात जाऊन राहणे अशी कुणाच्या घरातली पद्धत तर कुणाचा नवस बोललेला असतो. यामागचा उद्देश हाच की, सर्वार्थाने एकरुप व्हायचे, प्रपंचाचे सर्व पाश तेवढे नऊ दिवस दूर करायचे.
मराठवाड्यातील श्री. योगेश्वरी देवीच्या वास्तव्याने पावन झालेले बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे माझे माहेर. सहाजिकच लहानपणी नवरात्रात देवीच्या दर्शनाला देवळात गेलो की, तिथे नऊ दिवस रहायला आलेल्या स्त्रिया भक्तिभावाने दिवसभर देवीची गाणी म्हणत असलेल्या दिसायच्या त्यावेळी त्यांच्या तोंडून ऐकलेला जोगवा, गोंधळ भारुड सर्व काही समजायचे नाही पण ऐकायला छान वाटायचे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी हा जोगवा असाच मनावर ठसला गेला. बालवयात त्याचा अर्थ उमगलाही नव्हता. पण आता संसारात पडल्यावर थोडे फार पावसाळे पाहिल्यावर, अनुभवाने शहाणपण आल्यावर त्या जोगव्याचा माझ्या मनाला भावलेला, समजलेला अर्थ असा, महिषासुराने सर्व जगताला त्राही भगवान करुन सोडले होते. सर्वजण त्याच्यापुढे हतबल झाले होते. इंद्रपसुद्धा डळमळीत झाले होते. अशावेळी नऊ दिवस, नऊ रात्री, सर्व शस्त्रास्त्रांसह देवीने त्याच्याशी युद्ध केले! शक्तीरुपापुढे तो बलाढ्या असूर पराभूत झाला. देवीने त्याचा संहार केला ती महिषासुरमर्दिनी ! आदिशक्ती काली-माता! रणचंडी! भवानीमाता! सर्वांनी तिचा जयजयकार केला. सगळीकडे विजयोत्सव साजरा केला तो दिवस विजयादशमी!
आपण सर्व सामान्यजन त्या आदिशक्तीची पूजा कशी बांधणार? तिला कोणत्या प्रकारची पूजा अपेक्षित आहे? काय केले म्हणजे ती वरदायिनी प्रसन्न होईल? आपल्याला कोणत्या महिषासुरांचा वध करायचा आहे हे आपल्या भारुडातून, जोगव्यातून समाजाला सांगणारे प्रबोधन पण ते मनोरंजनाच्या माध्यमातून करणारे, रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेचा वापर करणारे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात, प्रत्येकाच्या मनातील मोहिरुपी महिषासुराचा वध करण्याचा जोगवा मागा हा महिषासुर फार वाईट आहे. तो मनुष्याची सारासार बुद्धी नष्ट करतो. या संतसत्पुरुषांनी समाजाकडे डोळे उघडे ठेवून पाहिले सर्वजण काळजी, चिंता यांनी ग्रासलेले आहेत. जे आपल्याकडे आहे. त्याचा आनंद न मानता जे नाही त्याच्या मोहाने दु:खी आहेत. हा मोहरुपी महिषासुर असाच त्रास देतो. त्याच्यावर संयम, विवेक या शस्त्रांनी विजय मिळवायला हवा. आमच्या मनातील नको त्या गोष्टींचा मोह, हव्यास नष्ट होऊ दे ! आमची सद्सद्विवेक बुद्धी सदैव जागृत राहू दे हा जोगावा त्या भवानीमातेकडे मागा!
आमच्या मनात कुणाबद्दलही द्वैत भाव निर्माण होऊ देऊ नको. म्हणजे सर्वांबद्दल प्रेमभावनाच असू दे ! हा जवळचा तो दूरचा असे वागण्याची बुद्धी आम्हाला देऊ नको. आमच्या अंतरात सद्भावच असू दे. आत एक बाहेर एक असे वागण्याची बुद्धी देऊ नको. वारी परंपरा ज्ञानेश्वर माऊलींपासून चालू आहे. विठू माऊलीच्या भेटीला जातांना कुणामध्येही आपपर भाव नसतो. तिथे सर्वजण समान! तसाच मी पण अद्वैताची माळ घालून तुझ्या भेटीला येईल. असे एकनाथ सांगतात. सर्व सामान्यांनी तसे वागावे ही अपेक्षा ते ठेवतात ती शिकवण देतात. आपण म्हणतो, यांना सांगायला काय जातंय! आचरणात आणणं किती अवघड आहे. यावर संतमंडळी सांगतात. अवघड जरुर आहे पण अशक्य नाही हे नक्की!
परमेश्वर प्राप्तीसाठी नवविधा भक्ती सांगितली आहे. ज्ञानामार्ग, भक्तीमार्ग कर्ममार्ग, योगमार्ग हे मार्ग ही सांगितले आहेत. मी स्वत: ज्ञानी होण्याचा प्रयत्न करीन बोधाचा झेंडा मी हातात घेईन. म्हणजे ते ज्ञान फक्त माझ्यापुरते न ठेवता इतरांना पण ज्ञानी करीन. ही गोष्ट अशी का हे जाणून घेऊन मगच आचरणात आणीन म्हणजेच अंधश्रद्धेने मी काही करणार नाही. माझी श्रद्धा डोळस असेल. एकनाथांनी त्या काळाच्या अनिष्ट चालीरीतींवर अंधश्रद्धांवर आपल्या भारुडातून कोरडे ओढलेले आहेत. संत गाडगेबाबांनी पण लोकांना हेच सांगितले.
माझ्या मनातील काम, क्रोध, मद, मोह, मत्सराची जळमटे झाडून टाक आणि माझे मन विकल्परहीत कर! म्हणजे वाईट विचार मनात येऊ देऊ नको. कुणाबद्दलही मनात विकल्प आला की पाठोपाठ वाईट विचारांची मालिकाच चालू होते. मग आचार बिघडतो. शेजारीण चार दिवस बोलली नाही माझं काय अडलंय? मी का जाऊ बोलायला? नणंद मागे एकदा टोचून बोलली होती मी का गप्प बसून ऐकायचं? वगैरे. आपले मन सर्व चांगल्या वाईट गोष्टींना कारणीभूत असंतं म्हणूनच समर्थांनी पण मनालाच उपदेश केला आहे. संतमंडळी आपल्या सारख्या सर्व सामान्यांना पराकोटीचे सांगतात तेव्हा आपण त्यातील थोडे समजून घेऊ शकतो. आचरणात आणू शकातो. संत मनाने सांगतात तो आपण करणाने ते वाचतो व ग्रहण करतो! सर्व संत-सत्पुरुष आपल्याला एवढी खात्री देतात, विश्वास देतात. की हे सगळं तुम्ही अंगिकारलंत तर तुमचा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अगदी सुकर आहे. त्यांनी स्वत:च त्या वाटेवर चालून मार्ग दाखवलेला आहे. शेवटी चालण्याचा प्रयत्न आपणच करायचा आहे. आजची सामाजिक परिस्थिती तर फार बिकट झाली आहे. मनासिक शारिरिक ताण प्रत्येकावर प्रचंड आहे. काही आपण ओढवून घेतलेला तर काही परिस्थितीच्या रेट्याने आलेला! मोहाचे महिषासुर जागोजागी उभे आहेत. त्याच्यावर कशी मात करायची हे सर्वांपुढे आव्हान आहे.
सद्विचारांना सद्भावनांचा जोगवा फक्त नवरात्रापुरता न मागता न आठवता कायमच आपल्या मनात स्मरणात राहिला पाहिजे. जगताची वरदायिनी भगवती माता नक्कीच सर्वांचे कल्याण करेल! मंगल करेल !
- सौ. सुमित्री हेमंत फाटक pc:google