गणेशोत्सव – गणपतीची यथासांग पूजा कशी करावी ?
गणेशोत्सव म्हणजे सलग दहा दिवस घरात आणि बाहेर साजरा होणारा उल्हासाचा उत्सव . भाद्रपद शु . चतुर्थीच्या दिवशी पार्थिव श्रीगणेशाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून तिचे षोडशोपचारे पूजन केले जाते . त्यास अभिषेक करून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो . आरत्या म्हटल्या जातात . आपापल्या कौटुंबिक प्रथेप्रमाणे दीड , पाच , सात अथवा दहा दिवस गणपती पूजन करून त्या मूर्तीचे समुद्र , नदी किवां तलावात विसर्जन केले जाते . गौरीपूजनाची प्रथा असलेल्या कुटुंबात गौरी व गणपतीचे एकाच दिवशी विसर्जन केले जाते .
विघ्नहर्ता, गणनायक , बुद्धिदेवता म्हणून सर्व देवपूजेत गणपतीला अग्रस्थान आहे . याशिवाय पूजा – प्रार्थनेस प्रसन्न होणारा सर्व सामन्याचा देव अशीही गणपतीची ख्याती आहे . महाराष्ट्रात अनेक गणेश भक्त दर महिन्यातील विनायकी किंवा संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात . अष्टविनायकाची यात्रा करणे हाही काही भक्तांचा भाविक उपक्रम असतो . माघ महिन्यातील गणेश जयंती सुद्धा काही ठिकाणी कौटुंबिक कुलाचार म्हणून साजरी केली जाते .
पूर्वी हा सण घरगुती स्वरूपातच साजरा होत असे. तेव्हा घरात आप्त आणि परिचितांची मोठी वर्दळही असे . पण टिळकांमुळे हा उत्सव सार्वजनिक उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो . सजावट , रोषणाई , सांस्कृतिक कार्यक्रम , व्याख्याने , संगीत नाटक अशा उपक्रमांमुळे या उत्सवाला भारदस्तपणा आला आहे .
गणपतीची यथासांग पूजा
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून दुपारी सूर्य माथ्यावर येईपर्यंत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल याची काळजी घ्यावी.
१. प्रतिष्ठापनेसाठी स्नान करून पीतांबर, धोतर किंवा नेहमीचे स्वच्छ कपडे घालावेत.
२. शाल, उपरणे, किंवा टॉवेल यांसारखे उपवस्त्र खांद्यावर घ्यावे.
३. चौरंगावर रुमालाची किंवा कापडाची घडी ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी.
४. पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून पाटावर किंवा आसनावर बसावे.
५ प्रथम स्वत:च्या मस्तकावर गंध, कुंकू , शेंदूर किंवा अष्टगंध यापैकी एकाचा टिळा लावावा.
६. विड्याची २ पाने, सुपारी , ५ किंवा १ रुपयाचे नाणे असा विडा व नारळ ठेऊन घरच्या देवांना नमस्कार करावा.
७. घरातील वडिलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा.
८ पळी- भांड्यातील स्वच्छ पाण्याने आचमन करावे.(आचमन म्हणजे ३ वेळा हातावर पाणी पळीने घेऊन प्यावे व चौथ्या वेळेला हातावर पाणी सोडून उष्टा झालेला हात स्वच्छ करावा.)
९ चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला कोपऱ्यात मांडलेल्या नारळाच्या – सुपारीच्या गणपतीवर प्राणायाम , गायत्री जपासह अक्षता व फुले वाहावीत.
१० त्यानंतर ,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
अशी प्रार्थना करावी ‘मी आज गणेश चतुर्थी व्रतासाठी पार्थिव गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी करीत आहे असा संकल्प करावा.
११ शुभंकरोती कल्याणं, आरोग्यं धनसंपदा |
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते II
या मंत्राने समईच्या पायावर फळे ,गंध, अक्षता वाहून ‘शत्रुबुद्धीचा नाश व्हावा’ अशी प्रार्थना करावी.
१२ घंटेला गंध , फुले, अक्षता वाहून घंटा जोरात वाजवीत पुढील प्रार्थना म्हणावी.
आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसाम |
कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हान लक्षणं ||
१३ प्राण प्रतिष्ठेसाठी ज्यांना मंत्र पाठ करणे शक्य नसेल किंवा माहिती नसेल त्यांनी किमान ‘ ॐ गं गणपतये नम: | हा मंत्र म्हणत पूजेसाठी चौरंगावर स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दुर्वांकुरांनी अगदी थोडे तूप लावावे.
१४ मूर्तीच्या छातीच्या मध्य भागी उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांनी स्पर्श करून या गणेश मूर्तीमध्ये प्राण ओतले जावेत अशी प्रार्थना करावी.
१५. निदान १५ वेळा ॐ कारचा जप करावा.
१६ त्यानंतर ‘देवस्थ प्राण: |इह स्थित: | अशी प्रार्थना करावी.
१७ गजाननाच्या मूर्तीवर पुन्हा गंध , अक्षता , फुले वाहून गुळ – खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि विडा , नारळ यांवर पाणी सोडावे असे केल्याने प्राणप्रतिष्ठेसारखा सर्वात महत्वाचा विधी पूर्ण होईल.
पंचामृतस्नान-
दुध , दही, गायीचे शुद्ध तूप , मध , साखर हे पंचामृत दुर्वांनी हळूवार शिंपडून मूर्तीला स्नान घालावे.पंचामृत स्नानाची सांगता सहाव्या गंधोदकाने (गंधाचे सुवासिक पाणी) करावी. नवीन वस्त्र आणि जानवे घालून झाल्यानंतर मूर्तीला फुलांनी सुवासिक अत्तर लावावे. गुलाब पाणी शिंपडावे. सुवासिक चाफा , गुलाब, सोनटक्का, जाई, जुई , केवडा यांसारखी फुले उगाळलेल्या गंधात बुडवून आणि दुर्वांची जुडी अष्टगंध , शेंदूर यांत बुडवून ही फुले ,दुर्वा मूर्तीला वाहाव्यात. फुले ,दुर्वा यांच्या माध्यमातूनच हळद कुंकू इत्यादी परिमल द्रव्ये अर्पण करावीत.
नैवेद्य व आरती :
१. चौरंग – टेबल ज्या खोलीत मांडलेले असेल त्या खोलीत भरपूर निखाऱ्यावर धूप , गुळ , गुग्गुळ ही सुगंधी द्रव्ये टाकून वातावरण सुवासिक करावे.
२. उदबत्ती , निरांजने ओवाळून झाल्यावर ‘श्रीं’ साठी खव्याचे मोदक ,पेढे , लाडू यापैकी एकाचा किंवा जे गोड अन्नपदार्थ तयार केलेले असतील त्यांचा किंवा भोजन तयार असेल तर भोजनथाळीसह नैवेद्य दाखवावा. वरण -भात , भाजी ,पोळी , मोदक , चटणी , कोशिंबीर , असे सर्व प्रकारचे पदार्थ गणेशाच्या नैवेद्यात असतात. गणपतीच्या नैवेद्यासाठी २१ उकडीचे मोदक प्रामुख्याने लागतात.
३. मनोमन प्रार्थना करावी.
४. गंध, अत्तर लावलेले फुल गणपतीच्या पायावर अर्पण करून चौरंगावर मांडून ठेवलेल्या दक्षिणेसह विडा, फळे , नारळ यांवर पळीने पाणी सोडून श्री गजाननाला अर्पण करावे आणि २ तूपवातींच्या निरांजनानी ( तबक ताम्हणात ठेऊन ) मंगल आरती करावी.
५ ‘सुखकर्ता , दुख:हर्ता….’ ही गणपतीची आणि दुर्गे दुर्गटभारी ही देवीची आरती म्हणावी. कापूरारतीने आरतीचा शेवट व्हावा.
६. मंत्र पुष्पांजली ( यज्ञेन …….) म्हणावे आणि फुले , अक्षता वाहून प्रदक्षिणा घालून घालीन लोटांगण ……ही प्रार्थना म्हणावी.
इतर अनेक प्रार्थना म्हटल्या गेल्या तरी पुढील प्रार्थना म्हटल्या जातील असे पाहावे.
रूपं देही जयं देही | (बाप्पा माला रूप व जय दे)
यशो देही द्विषो देही | ( यश दे , द्वेष करणाऱ्यांना पिटाळून लाव)
पुत्रान देही धनं देही | (मुलांची प्राप्ती होऊ दे , त्यांना भरपूर धन दे)
सर्वान कामांश्च देही मे |
अन्यथा शरणं नास्ति | त्वमेव शरणं मम || (तुझ्याविना अन्य आश्रय नाही)
तस्मात कारुण्य भावेन | रक्ष रक्ष परमेश्वर || (दयाळूपणे माझे रक्षण कर )
सर्वेत्र सुखिन: सन्तु | सर्वे सन्तु निरामय:|
सर्वे भद्राणि पश्चन्तु | मा कश्चिददुख: माप्नुयात ||
(सर्वजण सुखी व्हावेत , सर्व निरोगी असावेत , कल्याणकारक जीवन पहायला मिळावे , कोणाच्याही वाट्याला दुख: येऊ नये.)