वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची दिशा
स्वयंपाकघर म्हणजे एक व्यायामशाळा असते ज्यामुळे आपला देह तंदुरुस्त राहतो. स्वयंपाक घरातल्या विविध हालचालींतून आपल्या शरीराच्या स्नायूंची विशिष्ट हालचाल असंख्य वेळा होऊन ते तंदुरुस्त राहतात. स्वयंपाकघर म्हणजे दहा सेवकांना कामाला लावणारे कार्यालय. ते दहा सेवक म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. रुप, रस, रंग, गंध, चव, स्पर्श, ध्वनी सर्व अनुभवायला मिळते स्वयंपाकघरात. डोळे, कान, नाक, जीभ, हात, पाय, स्नायू, अस्थि या सर्वांचा समन्वय साधला जातो. देवघरापेक्षा स्वयंपाकघर महत्त्वाचं आहे. शरीर पोटावर चालतं. या देहातल्या देवाला नैवेद्य स्वयंपाकघर देतं. हेच स्वयंपाकघर जर योग्य दिशेला असेल तर ते आपणास नेहमीच फलदायी ठरू शकतं. आदर्श स्वयंपाकघर हे आरोग्यदायी, सुखी जीवनाचं प्रतीक आहे.
निसर्गोपचारात आहाराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. तुमचा आहार जेवढा सात्विक तेवढी तुमची प्रकृती चांगली. प्राचीन भारतीय शास्त्रानुसार जीवन व दीर्घायुष्य यांचा संबंध वास्तूशास्त्राशी आहे. निसर्गोपचार व आयुर्वेद जसं मानवी शरीराचं संतुलन राखतं, तसंच वास्तूशास्त्र जागेतली ऋणात्मक ऊर्जा काढून त्या जागेचं संतुलन राखून त्या वास्तूतली सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत करतं. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाकघराचा निश्चित शुभ परिणाम मानवी जीवनावर होतो.
वास्तूशास्त्रामध्ये आग्नेय दिशा अग्नीतत्वाची असून या दिशेला स्वयंपाकघराला स्थान दिलं आहे. म्हणून स्वयंपाकघर हे मुख्य वास्तूच्या आग्नेय दिशेला असावं. आग्नेय दिशाच स्वयंपाकघरासाठी का योग्य आहे यासाठी प्रथम आपण आग्नेय दिशेचं महत्त्व माहीत करून घेऊ या.
आग्नेय ही उपदिशा असून पूर्व व दक्षिण या मुख्य दिशेच्या मध्यभागी मिलनामुळे तयार होते. आग्नेय दिशा अग्नीच्या अधिपत्याखाली तयार होते. ज्योतिषशास्त्रानुसार आग्नेय कारकत्व शुक्र या ग्रहाकडे जाते. शुष्क काष्ठ किंवा गारगोटी अशा पार्थिव वस्तूंच्या घर्षणातून निर्माण होणारी ठिणगी ही पृथ्वीलोकातली अग्नीची जन्मस्थानं आहेत. ‘अग्नी’ची मुख्य देवतांमध्ये गणना होते. इंद्राच्या खालोखाल अग्नीचं महत्त्व आहे. तीन डोळे, चार हात, दाढी असलेली दोन मुखं, तीन पाय व चार शिंगं असं अग्नीचं स्वरूप आहे. क्रोध (कोप) हे अग्नीचं आयुध आहे. आग्नेय दिशेला अग्नीदेवाचं अधिपत्य असल्यामुळे अग्नीचे गुणधर्म म्हणजे शुद्धीकरण करणं. अशुद्धीचा नाश म्हणजे अग्नीसंपर्काने जंतुनाश होतो. अग्नीमुळे जीवन तेजोमय होतं.
अग्नीचं दुसरं स्वरूप सूर्य हा दिवसभर प्राणीमात्रांना जीवन बहाल करत असतो. अग्नीकडे सकाळी कोवळी सूर्यकिरणं आग्नेय कोपऱ्याकडे फेकली जातात आणि त्यातून नवचैतन्य निर्माण होतं.
दिशापालक अग्नीदेवाचं नगर तेजोवती म्हणजे तेजाचं नगर आहे तर दिशेचा रंग तांबडा (लाल) हे अग्नीचं द्योतक आहे. या दिशेची राशी मिथुन, जिचा स्वामी बुध ग्रह आहे. अष्टलक्ष्मींपैकी ‘धनलक्ष्मी’चं स्थान आग्नेय असल्याने या दिशेला कोणतीही कमतरता (धन-धान्याची) पडत नाही. प्राणधारण करण्याचं काम अग्नीचं आहे. सूर्यकिरणांमुळे निर्जंतुक होऊन अन्नपदार्थाची शुद्धता आणि अन्नाला चव प्राप्त होते. अर्थात चांगल्या प्रकारच्या अन्नपदार्थांची निर्मिती सहजसाध्य होऊन उत्तम आरोग्य लाभतं. व्याधी, वाईट शक्ती, कलह, दारिद्र्य यांचा नाश होतो. ग्रहाधिपती शुक्रामुळे कौटुंबिक जीवन आनंदी होतं. याच कारणास्तव अन्नपाक तयार करायची जागा म्हणजेच स्वयंपाकघर(पाकगृह) हे आग्नेय दिशेसच असावं. तसंच अग्नीतत्वाच्या सर्व वस्तू आग्नेय दिशेला असाव्यात.
आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असेल तर सुख, समाधान मिळतं. उत्तम आरोग्य लाभ, चवदार जेवण यामुळे कुटुंबात उत्साह वाढतो. अन्न धान्यांचा तुटवडा भासत नाही. भरभराट होते.
म्हणूनच स्वयंपाकघराची योग्य रचना केल्यास ते आपणास फलदायी ठरू शकतं. आदर्श स्वयंपाकघर हे आरोग्यदायी, सुखी जीवनाचं प्रतीक आहे. हे सर्व करणं आपल्याच हातात आहे, हे लक्षात ठेवून आणि आचरणात आणून आपलं जीवन आपण सुखदायी आणि समृद्धी बनवू शकतो.