ज्युडोपटू सुरेखा शिरसाठ
“नऊ वर्षांची होते, आठ नऊ किलोमीटरवर असलेल्या शाळेत चालत गेल्यावर गुरुजी म्हणाले, “मुलांनो आज आपल्याकडे हे पाहुणे आलेत बरंका, तुम्हाला जोरात पळता येतं का ते बघायला. त्यांना पळून दाखवायचं.” पाहुणे आपलं पळणं बघायला का आलेत? असं काही कळलं नाही. कळलं ते एवढंच की जीव खाऊन पळायचं आहे. मग सुसाट सुटलो आम्ही. पायात बूट वगैरे घालायचे असतात हे तर आम्हा खेड्यातल्या मुलांना माहितीही नव्हतं. तसंच अनवाणी पायांनी पळले मी. नंतर कळलं मी चांगली पळले होते आणि नगरला होणाऱ्या क्रीडा नैपुण्य चाचणी(बॅटरी टेस्ट) साठी माझी निवड झाली होती. त्यात मी दुसरी आले. आणि नंतर पाथर्डीत झालेल्या चाचणीत जिल्ह्यात पहिली.”
ज्युडोसाठी “शिवछत्रपती पारितोषिकानं सन्मानित, आशियाई क्रीडास्पर्धां, राष्ट्रकुल स्पर्धात भारतीय चमूत निवड झालेली, महाराष्ट्रातल्या एकाही प्रतिस्पर्ध्याकडून आजवर हार न पत्करल्यामुळे सराव कुणाबरोबर करायचा याचीच चिंता असणारी तरुण खेळाडू सुरेखा शिरसाठ आव्हाड” बोलत असते.
दर महिन्यात एका राष्ट्रीय खेळाडूची ओळख मी करून देतेय हे कळल्यावर नगरच्या पत्रकार स्नेही सतीश कुलकर्णींनी सुरेखा आव्हाड बद्दल कळवलं. लग्न, पतीच्या आर्मीतल्या नोकरीमुळे त्याच्या बरोबर पंजाबात वास्तव्य, मुलाचा जन्म, या सगळ्यामुळे खेळापासून बरीच वर्षं लांब राहिल्यावर सुद्धा पुन्हा राज्य स्पर्धेसाठी निवड आणि सुवर्णपदक विजेती, हे वर्णन “आमच्या नगर जिल्ह्यातली” अशा खास आपुलकीनं ते तिच्याविषयी बोलले.
सुरेखा ही मुक्ताबाई आणि भानुदास शिरसाठ यांची तिसरी मुलगी. हिच्या पाठचा भाऊ. वडिलांची चार एकर शेती, पण ती कोरडवाहू, पावसावर अवलंबून असलेली. मुक्काम कडगाव, पो. मिरी, ता. पाथर्डी आणि जिल्हा अहमदनगर, हा तिचा पत्ता. शेतातच साधंसं घर, गाण्यात असतं तसं “कौलारू” वगैरे नव्हे, डोक्यावर छप्पर आणि चार भिंती, एवढंच. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. “शंभराची नोट” ही “केवढे पैसे” असं वाटायचं. पोटभर जेवायला मिळायचं, दोन कपड्याचे जोड आणि आठ नऊ किलोमीटरवरच्या शाळेत तंगडतोड करत जायचं ही दैनंदिनी. थोरल्या दोघी बहिणी शिकल्या नाहीत, तेंव्हा हिनं तरी शिकावं ही आईची इच्छा. शेतीच्या कामासाठी कधीकधी शाळा बुडवायची, एरवी शाळा सांभाळून आई वडिलांना शेतीकामात मदत करायची. शाळेत पण हिला शिकण्यापेक्षा पळापळी कर, लपाछपी खेळ, याकडे ओढा. अंगात सळसळती ऊर्जा. तिच्यातली ही ऊर्जा बघून गावातल्या एकानं सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी विषयी माहिती दिली. तिथे खेळणं तर शिकवतातच, शिवाय शालेय शिक्षण आणि राहण्या जेवण्याची सोय सरकार मार्फत केली जाते, हे सांगितलं. आई वडिलांना हे पटलं म्हणूनच ती क्रीडा नैपुण्य चाचणी देऊ शकली.
किराणामाल सोडून इतर कुठलीही दुकानं गावात नाहीत, अगदी आतापर्यंत एस. टी. बस सुद्धा जात नव्हती, असं गाव. मुली न्हात्या झाल्या की बारा तेरा किंवा फारफार तर चौदा पंधरा वर्षांच्या झाल्या की लग्न लावून द्यायची रीत.
अशा गावातली, वातावरणातली, आर्थिक गटातली मुलगी केवळ सरकारच्या क्रीडा धोरणाचा फायदा मिळवून परदेशात खेळून येते, हे केवढं कौतुकास्पद!
सुरेखा इतर मुलींसारखी शाळेत जात असतांना अचानक एक दिवस पाहुणे येतात काय, हिचं पळणं बघतात काय, आणि हिचं आयुष्यच बदलून जातं काय. हिची सगळी कहाणी मुळातून जाणून घेण्याजोगी.
सुरेखा वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी संपूर्ण नगर जिल्ह्यात पहिली आली तेंव्हा तिला “जिल्हा” या शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नव्हता. “पहिला नंबर” तेवढा माहीत होता. पहिली आली म्हणताच तिला पुण्यात बोलावून घेतलं गेलं. वडील अशिक्षित शेतकरी. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायची सुद्धा सवय नव्हती. पुणं खूप लांब राहिलं. पुण्याला जायचं कसं, त्यासाठी पैसे कुठून उभे करायचे? आणि मुख्य म्हणजे तिथे कशासाठी जायचं? अशा अनेक प्रश्नांनी ते बिचारे भांबावून गेले. मग शाळेतले गुरुजी तिसरीत शिकणाऱ्या सुरेखाला घेऊन पुण्यात पोचले.
एस. टी तून येताना दिसणारं पुणं बघून सुरेखाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. “असं असतं होय शहर? इतक्या इमारती, गर्दी, वाहनं..बापरे!” जेंव्हा तिनं बालेवाडी बघितलं तेंव्हा तर आश्चर्यानं थक्क होऊन गेली. इथे गावोगावच्या स्पर्धक मुली होत्या. बऱ्याचशा चांगले कपडे घातलेल्या, टापटीप दिसणाऱ्या, तरतरीत. हिच्या तर पायात बूट सुद्धा नाहीत. स्टेडियममध्ये असलेल्या रनिंगट्रॅकवर यांना पळायला सांगितलं गेलं तेंव्हा असा काही ट्रॅक असतो हेही हिला नव्यानंच कळत होतं. इथे इतर तरतरीत मुलींमध्ये पळायचं या कल्पनेनंच ही घाबरली, रडू लागली. मग गुरुजींनी धीर दिला, म्हणाले, “गावात कशी पळालीस तसं जीव खाऊन पाळायचं. घाबरायचं कशाला?”
गुरुजींचा मंत्र लक्षात ठेवून ही सुसाट पळाली आणि पुन्हा इथल्या सर्व स्पर्धकात पहिला नंबर. ही क्रीडा नैपुण्य चाचणी खरंतर शारीरिक क्षमतांचा कस बघणारी. त्या चाचणीबरोबर वैद्यकीय चाचणीतही ती उत्तीर्ण झाली.
जी धाव तिला क्रीडा प्रबोधिनीत घेऊन गेली ती पुढची तब्बल बारा वर्षं तेच तिचं घर बनलं.
सुरुवातीला तिला सांगली क्रीडा प्रबोधिनीत निवडलं गेलं. आई वडील, भावंडांचा, शाळेतल्या गुरुजींचा निरोप घेऊन ती सांगलीत दाखल झाली. कुपवाड एम.आय. डी. सी. परिसरात ही प्रबोधिनी होती.
इथलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. सुसज्ज इमारतीतल्या वसतीगृहात अशा गावोगातून निवडल्या गेलेल्या मुलींची राहण्याची सोय केलेली होती. त्याच संकुलात या मुलामुलींची शाळा. अर्थात मुलामुलींची सोय वेगवेगळया ठिकाणी.
पहाटे पाच वाजता उठायचं. प्रातर्विधी आटोपून लगेच सराव. मग न्याहारी करून शाळेत जायचं. १० ते ३ शाळा. शाळेतून आल्यावर परत संध्याकाळी सराव. रात्री शाळेचा अभ्यास, स्वतःचे कपडे धुणं वगैरे बाकीची कामं करायची. शेतात घर असलेल्या, चार भावंडात मुक्तपणे हुंदडणाऱ्या लहानग्या सुरेखाला इथल्या कडक शिस्तीत गोंधळल्यासारखं व्हायचं. झोपडीसारख्या छोट्या घराची आठवण यायची. इथे तुलनेनं सुखाची राहणी असली तरी मायेची उणीव आणि शिस्तीचा बडगा जाणवायचा. वर्षभरात जेमतेम दोनदा घरी जायला मिळायचं. हळूहळू ती या वातावरणाला सरावली.
पहिल्या वर्षी सगळ्या मुलींना एकाच पद्धतीनं तयार केलं गेलं. त्यात प्रामुख्यानं पळण्याचा सराव आणि दमश्वासाचे व्यायामप्रकार होते.
दुसऱ्या वर्षी एकेका खेळासाठी मुलींची निवड झाली. सुरेखाला बॅडमिंटन आवडत होतं, तिकडे तिचा कल दिसल्यानं तिला त्यासाठी निवडलं गेलं आणि पद्धतशीर सराव सुरु झाला.
सुरेखा अत्यंत चपळ असल्यानं तिची प्रगती चांगली होत होती, पण तिच्या लहानग्या मनावर हे बिंबवण्यात आलं की काही कारणानं तिला प्रबोधिनीतून काढून टाकण्यात आलं तर तिचं तिला बॅडमिंटन खेळणं परवडेल का? जो खेळ अत्यंत आवडतोय, जो उत्तम प्रकारे खेळायला जमतोय तर त्याला प्रोत्साहन देणं राहिलं दूर आणि तिच्या बालमनावर नको त्या चिंतांचं ओझं टाकलं जाऊ लागलं. आपल्याला क्रीडा प्रबोधिनीतून काढून टाकलं जाऊ शकतं, हा विचारही तिनं केला नसतांना आणि तो करण्याची जराही आवश्यकता नसतांना तिच्यावर तो लादला जाऊ लागला. जसजसा ती विचार करू लागली तिला ते पटत गेलं की खरंच आपल्याला इथून परत घरी पाठवलं तर आपल्या वडिलांना बॅडमिंटनची रॅकेट सोडा, शटल्स सुद्धा घेऊन देणं परवडणार नाही.
मग तिला दुसऱ्या खेळांची निवड करायला सांगितली गेली.
दोन वर्षांच्या सांगलीतल्या प्रशिक्षणानंतर सर्व मुलींना बालेवाडीत आणण्यात आलं. तिनं दुसरा खेळ निवडला तो होता, “ज्युदो”
बॅडमिंटन हा खेळ सुद्धा तिनं प्रथम प्रबोधिनीत पाहिला आणि ज्युदो सुद्धा, पण बॅडमिंटन प्रथम दर्शनीच आवडला तसं ज्युदोच्या बाबतीत मात्र झालं नाही. पहिल्यांदाच बघत असतांना ती मारामारी, नेमकं ज्या खेळत होत्या, त्यापैकी एक जखमी झाली, रक्त वाहिलं. ते सगळं बघून हिला तर चक्क भीती वाटली. नको बाबा हा खेळ, असं वाटलं पण तिथल्या शिक्षकांनी म्हटलं, “तुला चांगला जमेल हा खेळ.” हिनं तो निवडला आणि शिक्षकांचं म्हणणं खरं केलं.
बालेवाडीतल्या प्रबोधिनीत पण सांगलीसारखीच दैनंदिनी. तिथल्याच शाळेत जायचं आणि स्वतःचं आवरण्याचा वेळ सोडून खेळाचा सराव.
बालेवाडीत आल्याच्या पहिल्याच वर्षी तिची सब ज्युनिअर नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धां होत्या ओरिसात. इतक्या लांबचा प्रवास, तोही रेल्वेचा. तोही तिचा पहिलाच अनुभव. तिथे भारतभरच्या मुली. त्यांच्याशी हिंदी बोलावं लागणं. पुण्यात आल्यावर हिला हिच्या ग्रामीण भाषेचा, साध्या राहणीचा सुद्धा किंचित न्यूनगंड आलेला. इथल्या वातावरणात जुळवून घेण्याची कसरत, स्वतःची कामं, स्वतःचा अभ्यास सांभाळून खेळावर लक्ष केंद्रित करताकरता दमछाक व्हायची. त्यात सतत स्पर्धां. थोडी मोठी झाल्यावर, समजूत आल्यावर त्या स्पर्धांचं महत्त्व कळलं, पण त्या वेळेला त्या स्पर्धाचं दडपण यायचं, हे ती मान्य करते.
स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा म्हणजे सराव शिबिरात सहभागी होणं ही ओघानं आलंच. अशा शिबिरं आणि स्पर्धांच्या निमित्तानं तिचा अख्खा भारत फिरून झाला. ओरिसातलं भुवनेश्वर, उत्तर प्रदेशातलं लखनऊ, आसाम मधलं गुवाहाटी, तामिळनाडूत चेन्नई, आंध्र प्रदेशात वारंगळ, छत्तीसगड मध्ये भिलाई, मणिपूरमध्ये इंफाळ, उत्तराखंडमध्ये हरिद्वार, गुजरात मध्ये मेहसाणा, शिवाय दिल्ली, मुंबई सह महाराष्ट्रातल्या बहुतेक गावी ती खेळण्यासाठी जाऊन आलीय.
इयत्ता तिसरी पासून म्हणजे लहान गटात सुरु झालेला प्रवास आता यंदा तिनं प्रौढ गटात भाग घेऊन चालूच ठेवलाय. मध्ये लग्न, मुलाचा जन्म यात सहा सात वर्षांची दरी पडली, पण तिनं खेळणं पुन्हा सुरु केलंय हे कौतुकास्पद.
नववीत असतांना सहाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलं गेलं. केवढी मोठी गोष्ट होती ही. अवघं पंधरा सोळाचं वय आणि परदेशात, चीनला खेळायला जायचं. सर्वसामान्यपणे अशा महत्त्वाच्या प्रसंगी, घरी राहणाऱ्या मुलामुलींना कधी एकदा घरी जाऊ आणि आईबाबांना हे सांगू, असं होऊन जाणार, पण सुरेखा सारख्या वसतीगृहात राहणाऱ्या मुलींच्या बाबतीत, इतकं साधं सुख सुद्धा विलंबानं येतं, म्हणजे आनंदाची बातमी एकतर फोनवरून, पत्रातून कळवावी लागते, किंवा प्रत्यक्ष भेट होईपर्यंत कळ काढावी लागते.
आनंदाच्या पाठोपाठ तिच्या मनात विचार आला तो वडिलांकडे पैसे कसे मागायचे याचा. जाण्या येण्याचा, राहण्याचा खर्च जरी सरकार करणार असलं तरी वरखर्चाला तीस पस्तीस हजार बरोबर ठेवा, असं यांना सांगण्यात आलं. इतर मुलींनी ताबडतोब घरी पैसे मागितले, सुरेखाला आपल्या वडिलांची परिस्थिती दिसत होती. मोठ्या बहिणींच्या लग्नात त्यांचा खर्च झाला होता, नगर जिल्ह्यात दुष्काळ तर पाचवीला पुजलेला. हिनं केवळ दहा-पंधरा हजाराची मागणी केली. वडिलांना तेवढे उभे करणं सुद्धा जड जातंय हे दिसल्यावर, बक्षिसाच्या रकमेतून हिच्या आईनं हिच्यासाठी केलेली गळ्यातली साखळी तारण ठेवून पैसे उभे केले.
चीन मधल्या आशियाई स्पर्धां हा सुरेखा साठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा अनुभव. सुरुवात झाली प्रवासापासून. विमानात ती पहिल्यांदा बसली. तिसरीत पहिल्यांदा पुण्यात येताना जसे तिचे डोळे दिपले होते, तसं आता तिचं या देशात झालं. इथले रस्ते, वाहतूक व्यवस्था, खेळण्याची स्टेडियम्स..तिथल्या सोई-सुविधा. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू. कशाकशाबद्दल नवल वाटून घ्यायचं असं होऊन गेलं. तिथल्या खेळाडूंचा खेळ तिला चकित करून गेला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळणं, जिंकणं आणि असं आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणं यात केवढं प्रचंड अंतर आहे, याची तिला जाणीव झाली. महिनाभर तिथे सरावससत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली. आपला खेळ किती प्राथमिक आहे, आणि तो केवढा तरी उंचावू शकतो, याचं भान तिला या स्पर्धेच्या सहभागानं दिलं.
“हा आयुष्यात मिळालेला सर्वात मोठा धडा.” असं तिचं मत.
चीनच्या आशियाई स्पर्धेत निवड, मग इथली सराव शिबिरं..प्रत्यक्ष चीनला जाणं, तिथलं शिबीर, प्रत्यक्ष स्पर्धां या सगळ्यात सात आठ महिने गेले. दहावीच्या परीक्षेला दोन अडीच महिनेच उरले. पाचवीत प्रबोधिनीच्या शाळेत आल्यापासून प्रत्येक वर्षी किमान सहा महिने शाळा बुडत असे. गणित-शास्त्र-इंग्रजी हे विषय स्वतःच्या स्वतः अभ्यासानं नीट समजत नसत. त्यामुळे परीक्षा आली की पोटात गोळा ठरलेला. इतर सर्वसामान्य मुलं पूर्ण शाळेत हजर राहतात, शिवाय शिकवणी वर्गांना जातात, शिवाय काही अडलं तर पालकांना विचारतात, तरी ऐन परीक्षेची सर्वांना भीती वाटते. मग हिच्या बाबतीत तर कायमच शाळा बुडणं, शिकवणी वर्गाची सोय नाही, ना पालकांना शंका विचारण्याची. हिला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं किती दडपण आलं असेल, याची कल्पना आपण करू शकतो. त्यात चीनहून परतल्यावर शाळेतले शिक्षक म्हणाले, “सहा महिने शाळा बुडलीय. आता दोन महिन्यात सगळा अभ्यास भरून काढणं सोपं नाही. सगळे विषय तू तयार करूच नकोस. थोडेच विषय सुटतील अशी तयारी कर. तेवढ्याच विषयांची तयारी कर. बाकीचे विषय ऑक्टोबरला दे.” हे ऐकून हिची जिद्द जागृत झाली. आईच्या इच्छेसाठी शाळेत जायला सुरुवात केली ती काय दहावी नापास असा शिक्का कपाळावर मारून घ्यायला? तिनं बाकीचे सगळे विचार बाजूला सारून फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि शिक्षकांना अशक्य वाटणारं “पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण” हे आव्हान पेलून दाखवलं.
पुढे आठव्या आशियाई स्पर्धात सुद्धा निवड झाली. तिथेही प्रबळ प्रतिस्पर्ध्यांसमोर पदकानं हुलकावणी दिली. खेळ मात्र सुधारत होता.
राष्ट्रीय स्पर्धात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळत होतेच.
२००७ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मॉरिशसला जायची संधी मिळाली. परदेशी स्पर्धकांविषयी दडपण एव्हाना कमी झालं होतं, त्यामुळे या स्पर्धेत पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरण्याचा मान मिळाला. प्रबोधिनीत खूप कौतुक झालं.
घरच्या आघाडीवर एव्हाना बहिणी आपापल्या संसारात स्थिरावल्या होत्या. मधली बहीण मुंबईला राहात होती. तिच्यावर फारशा कौटुंबिक जबाबदाऱ्या नव्हत्या. तिनं या आपल्या धाकट्या बहिणीच्या गरजेला उभं राहण्याची जबाबदारी आनंदानं उचलली. जेंव्हा जेंव्हा सुरेखाला पैशाची गरज भासे तेंव्हा तेंव्हा ती मदत करू लागली. “आपल्या थकलेल्या वडिलांना यापुढे तू पैसे मागू नकोस, मी आहे नं.” हा शब्द तिनं दिला आणि वेळोवेळी तो पाळला. प्रसंगी तिनंही आपलं किडूकमिडूक गहाण ठेवून पैसे उभे केले पण ती सुरेखाच्या पाठीशी ठाम उभी राहिली. “ ती माझ्या आईच्या जागीच आहे.” सुरेखा अत्यंत कृतज्ञतेनं म्हणते.
शालेय स्तरावरच्या लहान, कुमार गट आणि ओपनच्या अनेक राष्ट्रीय (बायो-डेटा असंख्य स्पर्धांनी आणि तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांनी भरलेला आहे) स्पर्धां खेळल्यावर “शिवछत्रपती पुरस्कार” मिळणं ओघानं आलंच. २००९ मध्ये ज्युदो या खेळासाठी तिला तो जाहीर झाला.
गावाकडचे लोक “आता सुरेखाचे लाडू कधी देणार?” अशा चौकशा करू लागले होते, पण हिला अजून खेळायचं होतं. तिनं वडिलांना सांगितलं, बी.कॉम. होऊ दे, मग लग्न. पण बी. कॉम. च्या शेवटच्या वर्षात वडील आजारी पडले आणि त्यांनी हिला लग्नाचा आग्रह केला.
आर्मीमध्ये नोकरीला असलेल्या पण मूळच्या शेतकरी कुटुंबातल्या “सीताराम आव्हाड” यांच्याशी सुरेखाचा २०११ला रीतसर स्थळ बघून वगैरे पारंपारिक पद्धतीनं विवाह झाला. होणाऱ्या पतीला सुरेखाच्या खेळाडू असण्याचं कौतुक असल्यानं पूर्वनियोजित स्पर्धांसाठी लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सुरेखा बालेवाडीत परतली, आणि पुढचे सहा महिने ती तिथेच राहात होती.
नंतर पतीचं पोस्टिंग पंजाबात असल्यानं पुढची तीन वर्षं ती त्यांच्या सोबत राहिली. २०१२ मध्ये मुलाचा, सुमितचा जन्म झाला. १९९९ पासून म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रीडा प्रबोधिनीत राहिल्यानंतर असं घरात कुटुंबात राहणं तिनं मनापासून एन्जॉय केलं.
पण आर्मीत असल्यानं पतीची लेह-लडाख ला बदली झाली, तिथे कुटुंब नेण्याची परवानगी नसल्यानं सुरेखा आता मुलासह नगर जिल्ह्यातल्या अव्हाद्वाडीत सासू सासऱ्यांबरोबर राहते. शेतात कामं करते.
नगरच्या नरेंद्र फिरोदिया या उद्योगपतींनी एका क्रीडा अकादमीची स्थापना केली आहे, “मॅक्झिमम स्पोर्ट्स अॅकॅडमी” तिथे त्यांनी सुरेखाला प्रशिक्षक म्हणून कामाची संधी दिलीय. यापूर्वी तिनं दोन वर्षं बालेवाडीच्या प्रबोधिनीत प्रशिक्षक म्हणून काम केलं असल्यानं तिला याचा अनुभव आहे. ती म्हणते, “घरच्या शेतात काम करण्यात कमीपणा अजिबात वाटत नाही, पण प्रशिक्षक म्हणून काम केल्यामुळे आत्मसन्मान वाढतो.”
उपजत खेळानं तिला नवी वाट दाखवली आणि पुढे अखंड कष्टानं तिनं त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं.
आईवडिलांना हिचं खूप कौतुक होतं, पण ते बिचारे इतके अशिक्षित की हिच्या कामगिरीचं यथोचित महत्त्व त्यांना उमजतच नव्हतं, त्यांचं होतं ते भाबडं प्रेम.
नशिबानं सैनिक पती मिळाल्यामुळे त्यांना हिच्या खेळाडू असण्याचं योग्य भान आहे, त्यामुळे त्यांना हिचं असलेलं कौतुक ते “कळूनसवरूनचं”
मधल्या सहा सात वर्षांच्या खंडानंतर तिनं यंदा पुन्हा “सिनिअर स्टेट चँपिअन” स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदकाची कमाई केली. आणि आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे हे सिद्ध केलं.
लहान लहान गावात, वाड्या वस्त्यात अशा कित्येक उभरत्या सुरेखा असतील, त्यांना पण अशाच संधी मिळोत, त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आपल्या देशाचं नाव क्रीडाक्षेत्रात “रोशन” होवो, ही शुभेच्छा.
नीलिमा बोरवणकर
२०१ अद्वैत, १२ रघुकुल सोसायटी. गिरिजाशंकर विहार समोर. भागीरथी हॉस्पिटल शेजारी.
कर्वेनगर. पुणे ४११०५२.
फोन: (०२०)२५४४२११८ मो: ९८२२५५६२५१
सुरेखा शिरसाठ-आव्हाड.
मो: ९७६६४९३२९३