हाऊ इज दॅट
“पश्चिम विभाग महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने चार वर्षात प्रथमच मुंबईचा पराभव करून आपले विजेतेपद निश्चित केले आहे.
नाणेफेक जिंकलेल्या मुंबई कर्णधार चंद्रिका केणी हिने फलंदाजीचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या सुजाता गायकवाड (२0) शुभांगी कुलकर्णी(१८) भारती दाते (१३) यांनी तो चुकीचा ठरवला. मुंबईचा डाव उपाहारापूर्वी अवघ्या ६१ धावात संपला. फक्त ३ खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले. महाराष्ट्राने ही धावसंख्या केवळ २ गड्यांच्या मोबदल्यात २३.५ षटकात पार केली. सुजाता गायकवाड (१८) व भारती दाते (२१) या नाबाद राहिल्या.” २४ डिसेंबर १९८१ च्या नागपूरच्या वर्तमानपत्रातली ही एक बातमी.
तब्बल ३६ वर्षं जुनी बातमी इथे देण्याचं कारण? नक्कीच महत्त्वाचं आहे. नुकताच भारतीय महिला क्रिकेट टीमनं विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना हरून आल्यावरही त्यांचं विमानतळावर प्रचंड, भव्य स्वागत झालं. त्यांना मोठी पारितोषिकं दिली गेली, पुरुष क्रिकेटपटूंइतकं नसलं तरी त्यांचं भरपूर कौतुक झालं.
या निमित्तानं मनात आलं की मुली जेंव्हा नव्यानं क्रिकेट खेळू लागल्या असतील, तेंव्हा कशी असेल परिस्थिती? ३५-४० वर्षांपूर्वी मुळात मुलींना बॅट बॉल हातात घेऊन खेळावंसं कसं वाटलं असेल? घरच्यांनी त्यांना पाठिंबा दिला असेल का? सुविधा होत्या का? स्पर्धां व्हायला मुळात इतक्या टीम असतील का?
आम्हा लेखकांना फार प्रश्न पडतात, आणि विशेषतः एखादा विषय डोक्यात आला की मन सारखं त्याचा मागोवा घेत राहतं. या महिला क्रिकेट बाबत असंच काहीसं झालं. सारखे त्या काळातले विचार. उदा. द्यायचं तर आम्ही शाळेत असतांना १९७५ पर्यंत ज्या मुली ११ वी मॅट्रिक झाल्या त्यांना गणवेश म्हणून साडी नेसावी लागे. ११वी संपून १० वी मॅट्रिक सुरु झाल्यावर गणवेशातून साडी कटाप झाली. तोपर्यंत व्हायचं काय की एकदा का शाळेत साडीची सवय झाली की त्यातल्या बऱ्याच जणी कॉलेजमध्ये पण साडी नेसत असत. तर अशा काळात क्रिकेट खेळणाऱ्या मुलीनी पँटशर्ट घालणं हे सुद्धा वेगळं दिसत असणार. कळत नकळत असे विचार मनात घोळत असतांना योगायोगानं एका ठिकाणी दोन ज्येष्ठ नागरिक बायका क्रिकेटच्या गप्पा मारताना दिसल्या. तेही आदल्या दिवशी झालेल्या एका मॅचबद्दल बारीकसारीक तपशीलात जाऊन. की त्या अमुक बोलरनं असा बॉल कसा टाकला? तिकडे फिल्डिंगला कुणी लावलं नसतांना? वगैरे.
कसं आहे आपण भारतीय राजकारण आणि क्रिकेट बद्दल बोलणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार समजतो, पण सहसा हे विषय पुरुषांचे चर्चा करायचे. इथे दोन बायका बोलताहेत म्हणताच मी कान टवकारले. सहजपणे त्यांच्या गप्पात सामील झाले, आणि..माझ्या डोक्यात घोळत असलेल्या विषयावर अधिकारवाणीनं बोलू शकणारी एक राष्ट्रीय क्रिकेटपटू महिला अचानकपणे मला भेटली.
१९७२ ते १९८१ अशी सलग ९ वर्षं राष्ट्रीय पातळीवर असंख्य सामने खेळलेली, तो काळ गाजवलेली खेळाडू “भारती दाते.” आताच्या “भारती अकोलकर.”
ज्येष्ठ नागरिक वयोगटात मोडणाऱ्या भारतीताई अगदी मध्यमवर्गीय, साध्याशा गृहिणी दिसतात. क्रिकेटपटू असल्याचा कुठलाही आब त्यांच्या व्यक्तिमत्वात नाही. “या इतकी वर्षं स्पर्धात्मक क्रिकेट खेळल्यात?” हा माझ्यासाठी पहिला धक्का होता, आणि मग जेंव्हा प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं भेटून त्यांची कारकीर्द जाणून घेतली तेंव्हा तो आदरात परावर्तीत होऊन गेला. खेळण्याची, देशभर खेळण्यासाठी फिरण्याची, यशाची एकप्रकारची झिंग असते. ती उतरवून सर्वसामान्य आयुष्य आनंदात जगणं सोपी गोष्ट नसणार. भारतीताई आयुष्यातली ही सेकन्ड इनिंग सुद्धा मजेत व्यतीत करताहेत.
भारती दाते, पुण्यातली टिपिकल “सदाशिवपेठी” मुलगी. वडील शिक्षणानं वकील आणि पेशानं शिक्षक. ओळीनं ८ मुलांनंतर ४ मुलीतली भारती दुसऱ्या नंबरची. वाड्यातल्या २ खोल्यातलं घर. मोठे भाऊ असल्यानं ही लहानपणापासून मुलांमध्येच खेळली. इतक्या माणसांचं घर चालवणं म्हणजे केवढा व्याप असणार, पण “आईनं कधीच आम्हाला खेळण्यातून किंवा अभ्यासातून घरकामासाठी हाक मारली नाही.” भारतीताई सांगतात. सगळी भावंडं अभ्यासात हुषार. “हवं ते शिकायची, करायची घरातून मोकळीक.”
मुलांमध्ये खेळतानाच कधीतरी भारतीच्या हातात बॅट, बॉल आला. “तू आमच्यात खेळू नको” असं मुलंही कधी म्हणाली नाहीत कारण भारती त्यांच्या बरोबरीनं खेळू शकत असे. शाळेत खोखो कबड्डी अशा खेळात विशेष लक्ष. मॅट्रिकनंतर स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथलं भलंमोठं क्रीडांगण बघूनच भारतीला मजा यायची. पहिल्या वर्षाला असतांना नेहरू स्टेडीयममध्ये महिला क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धां सुरु असतांना भारतीला वाटलं बघू तरी काय असतं हे महिला क्रिकेट? म्हणून मग काही मैत्रिणींसोबत स्पर्धां बघायला गेली. पांढऱ्याशुभ्र शर्ट पँट घातलेल्या हातात बॅट घेऊन येणाऱ्या बॅटसमन (खरंतर बॅटसवूमन) मैदानात यायला लागल्या की प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत होते. वातावरणात उत्साह भरून राहिलेला.
भारतीताईंच्या कानात आताही तो कडकडाट घुमू लागल्याचं मला जाणवलं.
“मुलींच्या क्रिकेटच्या स्पर्धां बघायला एवढे प्रेक्षक यायचे?” माझा प्रश्न. कारण आजच्या काळात, अशा स्पर्धांना मैदानं रिकामी असतात, हेच बघायची सवय.
“तेंव्हा टी. व्ही. वर घरबसल्या खेळ बघायची सोय नव्हती. तशीही करमणुकीची साधनं फारशी नसायची, त्यामुळे गाण्याचे कार्यक्रम, भाषणं याबरोबर खेळांच्या स्पर्धांना सुद्धा प्रेक्षक गर्दी करायचे. मीही स्पर्धां बघायला गेले होतेच की.”
मुलींचा तो खेळ बघून आपणही क्रिकेट खेळावं असं तिला वाटायला आणि नेमकं कॉलेजच्या नोटिसबोर्डवर “ज्यांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे त्या मुलींनी जिमखान्यावर यावे” ही सूचना लागायला एक गाठ पडली.
भारतीसारख्या उत्साही ५-६ मुली मैदानावर जमल्या. प्रभाकर करमरकर नावाचे कोच होते, त्यांनी यांना थोडेफार प्रश्न विचारले, “नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धां बघितल्या का?”
“बॅटिंग आवडतं की बोलिंग?”
“फिटनेस साठी कुठला व्यायाम करता?” त्यापैकी भारतीला एकाच प्रश्नाचं उत्तर देता आलं, “स्पर्धां पाहिल्या.” फिटनेस वगैरे शब्द सुद्धा तेंव्हा कानावर पडले नव्हते. सरांनी मुलींना बॅटिंग आणि बोलिंग करायला सांगितलं. क्रिकेट खेळणाऱ्या २-४ मुलांना या मुलींना बोलिंग टाकायला बोलावलं. आता जो लेदर बॉल वापरला जातो तशाच बॉलनं खेळायला दिलं होतं. भारतीला वाड्यात मुलांसोबत खेळायची सवय असल्यानं ती त्या बॉलचा सामना करू शकली. पाय पुढे टाकून तिनं आरामात बॅट फिरवली. बोलिंग तर तिनं मस्तच टाकलं. सर म्हणाले, “तुझी बॅट पकडायची ग्रिप चांगली आहे. बोलिंग स्टाईल ओरिजिनल आहे.”
अशा रीतीनं भारतीचं क्रिकेट खेळणं सुरु झालं. सकाळी कॉलेज आणि दुपारी ३ पासून जिमखान्यावर. मैदानात पळणे, हाच मुख्य व्यायाम. तेवढं करायचं आणि नंतर क्रिकेट शिकणं. क्रिकेट खेळणारी मुलंच या मुलींना सराव द्यायची. नेट मध्ये सराव, झेल पकडायचा सराव, इतपतच ते ट्रेनिंग होतं. मुख्य भर होता तो खेळण्यावर. थोडं बॅटिंग, थोडं बोलिंग आणि क्षेत्ररक्षण. रोजचा खेळ नियमित सुरु झाला. सर स्वतः बघायला यायचे. २-३ मुली चांगल्या तयार होतील असं त्यांना जाणवलं, मग त्यांनी मधू तापीकर नावाच्या महाराष्ट्राच्या कोचना बोलावलं. अधूनमधून ते किंवा दुसरे कुणी कोच या मुलींना शिकवायला यायचे. मधू तापीकर सिलेक्टर टीम पैकी होते. त्यांनी स. प. च्या ३ मुलींना निवडून पोलीस ग्राउंडवर चालणाऱ्या सरावासाठी बोलावलं. तिथे अधिक पद्धतशीरपणे ट्रेनिंग दिलं जायचं. “कॅच कसे घ्यायचे? कॅच म्हणजे बॉल आधी नीट बघायचा, मग रिसिव्ह करायचा. कोंबडी पकडल्यासारखा नाही पकडायचा.” सरांनी आधी समजावलं आणि मग प्रत्यक्ष खेळायला लावलं. त्यातून भारतीची “महाराष्ट्र महिला क्रिकेट टीम” मध्ये निवड झाली.
“थेट महाराष्ट्राकडून? आंतर महाविद्यालयीन, विद्यापीठीय पातळीवर नाही?” या माझ्या प्रश्नाला अनपेक्षित उत्तर होतं, “तेंव्हा या पातळीवर स्पर्धाच नव्हत्या. महिला क्रिकेटची सुरुवात होती. मुली का क्रिकेट खेळतात? असं वाटण्याचा काळ होता तो. स.प. फर्ग्युसन, गरवारे आणि वाडिया एवढ्याच महाविद्यालयांच्या मुलींच्या क्रिकेट टीम होत्या.”
एखाद्या नव्या क्षेत्रात सुरुवातीला प्रवेश करण्याचे काही फायदे असतात तर काही तोटे. तुम्हाला प्रवेश सहज मिळतो हा प्रमुख फायदा असला तरी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा कमी असतं, तुमचा रस्ता तुम्हालाच शोधायला लागतो, हा म्हटलं तर तोटा असतो.
स.प. च्या मुलींची टीम दररोज मैदानावर सराव करत असे. “कधी एकदाचे ३ वाजतात आणि आम्ही मैदानावर जातो, असं होऊन जायचं आम्हाला.” भारतीताई तेव्हाच्या सरावाबद्दल सांगतात. त्याकाळातले रणजी क्रिकेटपटू मिलिंद गुंजाळ, अरुण आणि अविनाश घाटपांडे हे या मुलींना कोचिंग द्यायला यायचे. “ते आम्हाला हाय कॅचेस द्यायचे. अक्षरशः मैदानावर खेळणारी इतर मुलं आमची प्रॅक्टिस बघायला यायची की या मुली हे एवढे उंच कॅच कसे पकडणार? पाऊस असला तरी सराव कधी चुकला नाही. त्यावेळी सर रोलिंग लावायचे, त्यावर बॉल टाकला की तो कुठेही उडायचा. तो पकडायची प्रॅक्टिस. यातून एकाग्रता साधली जायची. सर फास्ट बोलिंग टाकायचे, कारण एव्हाना त्यांना कळलं होतं की या मुली आता पक्क्या झाल्या आहेत. ज्यांना हाताला बॉल लागलेला सहन होत नसे अशा नाजूक मुली एव्हाना क्रिकेट सोडून गेल्या होत्या. आमच्या सारख्या ज्या टिकून राहिल्या त्यांना मुळातूनच क्रिकेटचं वेड होतं. फारसं न शिकवताच आम्हाला क्रिकेट येत होतं. जी ती आपापल्या शैलीत ड्राईव्ह, स्क्वेअर कट किंवा बोलिंग अॅक्शन घेत असे. बहुतेक जणी अंगभूत क्रिकेट घेऊन आलेल्या. ज्याला “ओरिजिनल” म्हणतो तशा. रणजीच्या मॅचेस बघून स्क्वेअर कट, ड्राईव्हज् आम्ही आमचंच मारायला शिकलो.”
महाराष्ट्राकडून संघात निवड झाल्यानंतर कमल भांडारकर, प्रभाकर करमरकर, दत्ता खेर यासारख्या कोच नी खास ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.
भारती ओपनिंग बॅटसमन आणि बोलर. बॉल ला सुरुवातीला खूप चकाकी असते. तो पिच झाला की कसा वळू शकतो, कुठे जाऊ शकतो तोही स्वतःच विचार करायचा. तेंव्हा ना हेल्मेट होती ना कुठले गार्ड्स. इतर राज्यातल्या खेळाडूंशी स्पर्धात्मक खेळताना लक्षात येत गेलं की काही राज्यातल्या खेळाडू अतिशय स्पीडनी बोलिंग टाकतात. बंगाल, दिल्ली, पंजाबच्या ५-६ खेळाडू भयानक फास्ट बोलिंग टाकणाऱ्या. पुरुष बोलर्स सारखा मोठा रनअप घेणाऱ्या.
“मुंबईची बेहरोज म्हणजे डायना एडलजीची बहीण. डायना डावखोरी, आणि फिरकी गोलंदाज. बेहरोज चांगली उंचनीच फास्ट बोलर. मी बुटकी. ओपनिंगला मी क्रीजवर उभी आणि बेहरोज लांब ढांगा टाकत, मोठा रनअप घेऊन इतका जोरात बॉल टाकायची, की बघणाऱ्याच्याही छातीत धडधड व्हावी, पण मी कधी घाबरले नाही. मला उलट मजा यायची त्या बॉलला सामोरं जातांना. मी घाबरत नाही कळल्यावर ती बाहेर बॉल टाकायला लागली आणि ती जसे बाहेर टाकायला लागली तसं मी धाडकन स्क्वेअर कट मारायला लागले. स्क्वेअर कट ही माझी खासियत. सगळे विचारायचे, कसा मारते स्क्वेअर कट. मलाही कळायचं नाही, पण परफेक्ट होता माझा स्क्वेअर कट.”
भारतीताई बोलत असतांना मला जाणवलं की काळ किती बदलला. आता वर्षभर कसल्या ना कसल्या क्रिकेटच्या स्पर्धां सुरु असतात, घरबसल्या दूरदर्शनवर त्या बघता येतात. शहरात अनेक ठिकाणी क्रिकेट कोचिंग देणाऱ्या संस्था असतात. शिकण्यासाठी केवढ्या सुविधा असतात.
भारती खेळत होती त्या काळात यापैकी काहीही नव्हतं. कधीतरी कोच यायचे, स्पर्धां खेळायला गावोगावी जातांना सुद्धा सोबत कोच नसत. या १५ मुली आणि एक मॅनेजर. सगळीकडे आरक्षण नसलेला रेल्वेचा प्रवास.
“आणि हे आम्ही अत्यंत आनंदानं करायचो. घरचे सुद्धा म्हणायचे नाहीत की आरक्षण नसतांना एवढ्या लांबचा प्रवास तुम्ही मुली कसा करणार वगैरे. पैसे मिळणं फार दूरचं, आम्ही आमच्या पैशानं सगळीकडे जात असू. नंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून प्रवास खर्च तेवढा मिळू लागला, तरी वरखर्च आमचा आम्हीच करायचो. आधी महाराष्ट्राकडून खेळत असतांना राष्ट्रीय स्पर्धांसाठी कलकत्ता, डेहराडून, जमशेदपूर, लखनौ, दिल्ली, ग्वाल्हेर, अंबाला, मद्रास, शिमोगा, बंगलोर, अहमदाबाद, बडोदा, गोरखपूर.ई. ठिकाणी खेळायला मिळालं. स्पर्धा साखळी पद्धतीनं होत असल्यानं विविध गावात सामने होत… मी एकूण ९ राष्ट्रीय स्पर्धां खेळलेली आहे.
महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, गुजराथ या चार टीम्स मधून, नॉक आऊट मॅचेस खेळून, इंटर झोनल साठी वेस्ट झोन टीम निवडली जायची. १९७४ मध्ये माझं वेस्ट झोन साठी सिलेक्शन झालं ते ८१ पर्यंत मी वेस्ट झोन साठी खेळत होते. ही आठही वर्षं “राणी झाशी करंडकाच्या” आम्हीच मानकरी होतो. ओपनिंग बॅटिंग आणि ओपनिंग बोलिंगसाठी माझी सर्वोत्तम कामगिरी याच स्पर्धात होत गेली. माझे बॉल छान स्विंग व्हायचे. बोलिंगचं तंत्र कुणी शिकवलं नाही, ते उपजत होतं. पहिली इंटर युनिव्हर्सिटी खेळायला आम्ही राजकोटला गेलो असतांना ५-६ सामन्यात मी एकूण १८ बळी घेतले होते, ५० धावा केल्या होत्या. “बेस्ट ऑलराउंडर” चं पारितोषिक मिळालं होतं. १३ धावात ५ बळी, ९ धावात ४ बळी, विकेट मेडन्स, असा माझाच परफॉर्मन्स आठवला तरी मस्त वाटतं.
इंडिया ११ टीम मध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड टीम समोर खेळायची संधी मिळाली. तिथेही मी ओपनिंग बॅटसमन आणि ओपनिंग बोलरच असे.
ऑस्ट्रेलियाच्या बोलर्स इतक्या उत्तम होत्या की त्यांच्याशी खेळणं हा एकदम जबरदस्त अनुभव होता. खेळायची संधी मिळत होतीच, पण खेळाच्या निमित्तानं एवढा प्रवास, इतक्या वेगवेगळया लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, वावरणं हा अनुभव सुद्धा केवढा समृद्ध करणारा होता. माझ्या बरोबरीच्या इतर मुलींच्या तुलनेनं मला केवढं जग दिसत होतं. मनुष्य स्वभावाच्या वेगवेगळया छटा अनुभवायला मिळत. आमची महाराष्ट्राची आणि वेस्ट झोनची टीम खूप छान, एकोप्यानं राहणारी होती. आम्ही जिकडेतिकडे सगळ्या पंधराच्या पंधरा जणी एकत्र असू, बाहेर जाणं, खाणं पिणं सगळं बरोबर. आमच्यातल्या कुणी श्रीमंत, हातात हवा तेवढा पैसा असणाऱ्या, तर कुणी भाड्याला सुद्धा कसेबसे पैसे जमवलेल्या. पण त्यानं काही फरक पडत नसे. कुणी ना श्रीमंतीचा तोरा दाखवे, ना कुणाला गरिबीची लाज वाटे. गप्पा असत त्या खेळाच्या, खेळ सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्या. ऑस्ट्रेलियन टीमला आमच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधांचं खूप कौतुक वाटलं होतं. “तुम्ही कशा खेळलात त्यापेक्षा तुम्ही किती छान वागता तेच आम्हाला आठवत राहील,” असं त्यातली एकजण म्हणाली होती.”
कमी सुविधा, पैसे अजिबात मिळत नसतांना त्या काळातल्या मुली निव्वळ आनंदासाठी खेळत होत्या ही भावना भारतीताईच्या बोलण्यातून वारंवार जाणवत होती. तेंव्हा भरपूर स्पर्धां असत, वर्षात १५-१६ म्हणजे जवळपास दर महिन्यात एकदा तरी त्या स्पर्धात्मक खेळण्यासाठी कुठल्यातरी गावी जात असत. मुलींचं क्रिकेट अतिशय नवीन असल्यानं प्रत्येक ठिकाणी सामने बघायला प्रेक्षक भरपूर गर्दी करत, प्रोत्साहन देत. क्षेत्ररक्षण करण्यासाठी बाउंडरीलाईनला उभं राहिलं की प्रेक्षक बाहेरून चौकशा करत, नाव, गाव विचारत.
मधल्या वर्षात हे चित्र बदलत गेलं. स्पर्धां कमी झाल्या, प्रेक्षकांच्या अभावी सामने खेळण्यातली मजा कमी झाली. सामन्यांचे नियम बदलले, तंत्र बदललं. बदल तर प्रत्येक क्षेत्रात होणारच, पण महिला क्रिकेटचं महत्त्व कमी होत गेलं. विश्वचषकाच्या चमकदार कामगिरीनंतर हे चित्र बदलावं, पुन्हा जुनं वैभव प्राप्त व्हावं ही भारतीताईची इच्छा.
१९७१ मध्ये पुण्यात पहिली महिला क्रिकेट राष्ट्रीय स्पर्धां झाली ती बघून प्रेरणा घेऊन भारती दातेनं क्रिकेट खेळायचं ठरवलं आणि अवघ्या दोन वर्षात राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला, तो ओळीनं आठ वर्षं. स.प. महाविद्यालयाचा प्रचंड पाठींबा मिळाला. प्राचार्य मंगळवेढेकर सर अनेकदा मैदानावर सराव बघायला येत. राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या मुलींना दरवर्षी दीडशे रुपये शिष्यवृत्ती मिळायची. भारती आणि इतर काही खेळाडूंकडे स्वतःचं किट नव्हतं, महाविद्यालय त्यांना ते उपलब्ध करून देत असे. इतकी वर्षं क्रिकेट खेळून स्वतःचं किट नसणं, ही गोष्ट आजच्या काळात किती आश्चर्याची वाटते, पण तेंव्हा ते स्वाभाविक वाटे. पांढरी पँट, पांढरा शर्ट, स्वेटर हा क्रिकेटचा गणवेश सुद्धा सुरुवातीला स्वतःच्या पैशातून घ्यावा लागे, नंतर महाराष्ट्र महिला क्रिकेट असोसिएशन कापड पुरवू लागलं.
मानसशास्त्रात बी. ए. पदवी मिळाली, एम. ए. ला तो विषय स.प. मध्ये नसल्यानं स्पोर्ट्स अॅडमिशन घेतली. त्याकाळात फक्त खेळण्यासाठी असा प्रवेश देण्याची परवानगी होती.
तब्बल ८ वर्षं खेळल्यानंतर घरच्यांनी सल्ला दिला की आता लग्नाचा निर्णय घ्यावा. तो काळ लक्षात घेता आईवडिलांनी २६-२७ वय होईपर्यंत खेळू दिलं, हे निश्चित कौतुकास्पद वाटतं. घरच्यांना मुलीच्या खेळाचं खूप कौतुक होतं. भारतीला अनेकदा “बेस्ट बोलर” किंवा “बेस्ट ऑलराउंडर” नी गौरवलं गेलं. तिथल्या स्थानिक पेपरात बातम्या छापून यायच्या, मुलाखती घेतल्या जात. आकाशवाणीवर मुलाखत होई. ही सगळी कात्रणं वडील व्यवस्थित कापून फायलीत लावून ठेवत असत. पण नंतर त्यांना वाटू लागलं की ठराविक वयात लग्न व्हावं. भारतीचं लक्ष इतकी वर्षं फक्त खेळण्यात होतं, आता तिनं पालकांचा सल्ला मानायचा ठरवलं.
व्यवसायानं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या श्री. विकास अकोलकरांशी पारंपारिक पद्धतीनं बघून वगैरे लग्न ठरलं.
लग्न ठरल्यावर भारती शेवटची मॅच खेळण्यासाठी चंदीगढला गेली होती. वेस्ट झोन तर्फे राणी झाशी करंडकासाठी.२-३ बळी, २-३ हाय कॅचेस घेऊन, शेवटच्या सामन्यात सुद्धा दैदिप्यमान कामगिरी करत तिनं स्पर्धात्मक क्रिकेटचा निरोप घेतला.
तिच्या टीममधल्या मैत्रिणींनी भारती निवृत्त होणार म्हणून तिच्या सन्मानार्थ एक मॅच ठेवली. ती बघायला भारतीचे पती, नणंद आणि सासरचे कुटुंबीय उपस्थित होते. तिचा खेळ, तिला मिळत असलेला मान बघून त्यांना खूप कौतुक वाटलं होतं. मॅच संपल्यावर त्याच ड्रेसमध्ये भारतीला ते घरी घेऊन गेले. ही एक छान आठवण भारतीताईनी अजून जपली आहे.
नंतर मात्र घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचं खेळणं पूर्ण बंद झालं. ऑस्ट्रेलिया बरोबर एका प्रदर्शनीय सामन्यासाठी त्यांची निवड झाल्याची बातमी घेऊन एक सिलेक्टर घरी आले होते. भारतीनं घरी परवानगी मागितली तेंव्हा सासूबाई म्हणाल्या, “अगं, नेमकी तेंव्हा तुझी मंगळागौर ठरवली आहे.” ती संधी हुकली, पण त्याचं त्या दुःख वाटून घेत नाहीत. “खेळत होते तेंव्हा घरात लक्ष घातलं नाही, आता घराकडे लक्ष द्यायचं तर क्रिकेट जमणार नाही,” अशी त्यांनी स्वतःची समजूत घालून घेतली. लग्नानंतर काही दिवस त्यांनी कोचिंग केलं पण मुलीच्या जन्माच्यावेळी तेही बंद झालं. दोन मुली, त्यांची जडणघडण, शिक्षणं यात भारतीताई पूर्णपणे गुंतून गेल्या.
आता दोघींची लग्न होऊन त्या आपापल्या संसारात मग्न आहेत. थोरलीनं म्हणजे सोनल ओकनं मुलासाठी बँकेतली नोकरी सोडली आणि धाकटी मीनल वरसकर आर्टस अँड क्राफ्ट्स ची शिबीरं घेते. मुली क्रिकेट खेळल्या नाहीत, पण क्रिकेटची आवड मात्र भरपूर आहे, योगायोगानं दोन्ही जावई खेळाडू आहेत.
या क्रिकेटनं त्यांना आत्यंतिक समाधान मिळवून दिलं, भारतभर प्रवास घडवले. पण आर्थिक लाभ बिलकुलच झाला नाही. कुठल्याही सरकारी खात्यात अथवा बँकेत कुठेही महिला क्रिकेटची टीम नसल्यानं त्यांना नोकरी मिळाली नाही. खेळाडू म्हणून पेन्शन नाही. ५० च्या पुढच्या खेळाडूंना पेन्शन योजना लागू झाली, त्या अंतर्गत अगदी तुटपुंजं मानधन त्यांना मिळतं. १०% कोट्यातून त्यांना एक घर संमत झालं होतं, पण वानवडीमध्ये आणि तेही चौथ्या मजल्यावर असल्यानं त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्यामुळे ज्या महाराष्ट्राकडून आठ राष्ट्रीय स्पर्धां खेळलो त्या महाराष्ट्रानं आपल्याला काही दिलं नाही, अशी किंचित खंत त्या बाळगून आहेत.
पण आजही कधीतरी अचानक कुणीतरी त्यांना एखाद्या शिबिरात बोलावतं आणि स्क्वेअर कटचं प्रात्यक्षिक मुलांना दाखवा, असा आग्रह करतं, तेंव्हा त्या भरून पावतात. मधली कित्येक वर्षं हातात बॅट बॉल धरलेला नसतांना आजही त्यांची बॅट कडक स्क्वेअर ड्राईव्हचा फटका मारू शकते, हाच त्यांच्यासाठी पूर्ततेचा क्षण असतो.
भारतीताईंशी भेट झाल्यामुळे महिला क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात डोकावून बघता आलं. चाळीस वर्षांपूर्वी एखादी तरुण मुलगी खेळाडू होण्याची इच्छा करते, आणि पुरुषांच्या मानल्या गेलेल्या खेळात नाव मिळवते, हे फार विलक्षण वाटलं. अनेक राष्ट्रीय स्पर्धां खेळून आज विस्मृतीत गेलेल्या अशा कित्येक खेळाडू असतील.
दर महिन्यात भेटत राहू अशाच काही खेळाडूंना.
नीलिमा बोरवणकर
फ्लॅट नं २०१, प्लॉट नं. १२ रघुकुल सोसायटी. गिरिजाशंकर विहार समोर. कर्वेनगर पुणे ४११०५२
फोन: ९८२२५५६२५१
भारती अकोलकर
फोन: ८०८७४२१६९०