पर्यावरण आणि जनरेशन गॅप.

‘A1 डिपार्टमेंटल स्टोर्स’मध्ये त्या वयस्कर बाईने प्रवेश केला आणि काय काय घ्यायचं आहे त्याची मनाशी उजळणी करत ती दोन मिनिटं उभी राहिली. वय असेल सत्तरीच्या आसपास. पण हालचालीत चापल्य होतं. पट्कन ती ग्रोसरी विभागाकडे वळली. धान्य, कडधान्य, साखर, चहा पावडर, गोडे तेल इत्यादी वस्तू प्लास्टिकच्या पिशव्यांत भरून व्यवस्थित रचल्या होत्या. त्या म्हातारीने आपल्याला हव्या असलेल्या वस्तू सराईतपणे निवडल्या. स्टोर्सच्याच प्लास्टिक बास्केटमध्ये भरल्या व ती काउंटरवर आली. काउंटरवर एक तरुण मुलगी बसली होती. तिने भराभर समोरच्या यंत्रावर त्या प्लास्टिकच्या पिशव्या फिरवल्या व म्हातारीला एकूण पैसे सांगितले.
बिल देऊन म्हातारी त्या मुलीकडे पाहत तशीच उभी होती.
“आज्जी, प्लास्टिकची पिशवी मिळणार नाही. तुम्ही घरून पिशव्या घेवून यायला हवं. प्लास्टिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. आपण हा हरित ठेवा जपला पाहिजे, नाहीतर कांही वर्षांतच जगाचा सर्वनाश होईल”. तिच्या आवाजांत माहिती कमी व दम जास्त होता.
“बापरे असं आहे कां ? मुली हे पर्यावरण….हरित ठेवा असे शब्द आमच्या पिढीने कधी ऐकलेलेच नाहीत.” म्हातारी गडबडून म्हणाली.
“तोच तर प्रॉब्लेम आहे ना ! तुमच्या पिढीने पर्यावरणाचा विचारच केला नाही आणि आमच्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतात.” ती थोड्याश्या वैतागाने म्हणाली”.
“बरोबर आहे तुझं. मी रहाते गोगटेवाडीत. माझ्या लहानपणी त्या एवढ्या मोठ्या परिसरांत पांच बैठ्या चाळी होत्या. एकूण सोळा बिऱ्हाडे. आणि सावित्रीबाई नांवाच्या धुणीभांडी करणाऱ्या होत्या. त्यांचे एक लहानसे एकखणी घर. बस्स एवढीच वस्ती. बाकी वाडीत चिकू, आंबा, नारळ व चिंचा या झाडांची दाटी होती. मोसमांत आम्हा लोकांना फारसे आंबे विकत घ्यायला लागायचे नाहीत, एवढे आंबे लागायचे. चिक्कू तर आम्ही कधीच विकत आणले नाहीत. वाडीतल्या एका हरहुन्नरी माणसाने तिथे भाजीचा मळा फुलवला होता. तिथे पडवळ, दोडकी, पालक, घोसाळी, लाल माठ, कोथिंबीर, मिर्च्या, तोंडली, अळू अशा अनेक भाज्या बाजारभावापेक्षा कमी भावात आम्हाला मिळायच्या. त्यापण ताज्या. गोगटेवाडीत कोणाकडेही फ्रीज नव्हता. रेडीओ फक्त दोघांकडे होता. टी.व्ही. अजून यायचा होता. आणि आला तेव्हा जेमतेम दहा घरांत. मायक्रोओव्हन, इलेक्ट्रिक टोस्टर, वॉशिंग मशीन ही नांवसुद्धा आम्ही ऐकली नव्हती. पाणी बंबात गरम व्हायचे. गिझर हा प्रकार नव्हता. वातानुकुलीत मशीन….ते काय एसी म्हणतात ते… त्याचं सोडा पण छताला टांगलेला विजेचा पंखाही कोणाकडे नव्हता. फक्त एकाच कुटुंबाकडे सायकल होती. बाकी सर्व पायी ये-जा करीत. स्टेशनपर्यंत चालणं कॉमन होतं. आम्ही मुलं तर शाळेत जाताना रेल्वे फाटक ओलांडून चालत जायचो…साधारण वीस मिनिटे. गाड्या, स्कूटर, टॅक्सी, रिक्षा कोणी वापरल्याच नाहीत. पण तू म्हणतेस ते खरं आहे. आम्हाला पर्यावरण, हरित ठेवा या गोष्टी कळल्याच नाहीत.” म्हातारी दम घ्यायला थांबली. ती मुलगी लक्ष देऊन ऐकत होती.
“ अग, त्याकाळी किराणा मालाची यादी वाण्याला द्यायची हेच काम असायचे. मग तो ही सर्व धान्ये, कडधान्ये, साखर, गूळ खाकी कागदाच्या पिशवीत भरून एका मोठ्या टोपलीत ठेवून ते सर्व घरपोंच करायचा. तेलाचे, तुपाचे डबे पत्र्याचे असत. चहा पुठ्ठ्याच्या खोक्यांत मिळायचा. त्या कागदी पिशव्या रिकाम्या झाल्या की कचरा भरायला वापरायच्या. आमच्या वाडीतच मोठ्ठा खड्डा खणलेला असायचा, प्रत्येक घरातला कचरा त्या खड्ड्यांत टाकायचा. पावसाळ्याच्या तोंडावर तो खड्डा बुजवायचा. पावसाळा संपला की मग तो खड्डा उकरायचा. आंत त्या कचऱ्याचे मस्त खत तयार होई. मग तेच खत वाडीतल्या झाडांना द्यायचे. झाडेही खूश. आता त्याच वाडीत चार-चार मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. सोळा कुटुंबांच्या जागी दिडशे फ्लॅट झालेत. चिकू आंबा, नारळ या सर्व झाडांनी त्या इमारतींसाठी स्वत:चा प्राण दिला. पण तू म्हणालीस ते खरे आहे. आमच्या व आमच्या आधीच्या पिढीला पर्यावरण, हरित ठेवा समजलाच नाही.” म्हातारीच्या प्रत्येक वाक्यागणिक त्या तरूण मुलीचा चेहरा बदलत होता. मघाशी उपदेश करताना वर चढलेली भुवई आता खूपच खाली आली होती…….
म्हातारी बोलतच होती. “आज आमच्या वाडीत प्रत्येकाकडे कार नाहीतर स्कूटर आहे. कांहीजणांकडे मोटरसायकल आहे. सायकल हा शब्दच सगळे विसरले आहेत. अगदी नाक्यावर जायचं तरी गाडी काढतात बाहेर. कोणीतरी म्हणालं या धुरामुळे पर्यावरणाला खूप हानी पोचते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळेसुद्धा पर्यावरणाची हानी होते म्हणे. म्हणजे मला त्यांतलं कांही कळत नाही. मी कांही शास्त्रज्ञ नाही. पण चार लोकं बोलतात ते कानावर पडतं. तू कुठे रहातेस बाळा ?”
“मी उन्नतनगरमध्ये. स्कूटरवरून येते कामाला.” ती उत्साहाने म्हणाली.
“वा फार छान. तुमच्या पिढीला ही वाहानं वापरण्याचं जन्मजात ज्ञान असतं. आमच्या पिढीला या सर्वांची संवयच नव्हती. पण तू म्हणतेस ते खरं आहे मुली. पर्यावरण, हरित ठेवा, शहराची फुफ्फुसं या शब्दांच्या बाबतीत आमची पिढी अगदीच अज्ञानी होती. तसा हिरवा ठेवा आमच्या आजूबाजूला भरपूर होता. आम्ही त्याच्यावर प्रेमही केलं….अगदी स्वत:च्या नातलगांसारखं. आणि त्या वृक्षराजीची जपणूक तर आपोआप होत होती. धूर नाही…विजेचा वापर नाही….त्यामुळे हवा प्रसन्न असायची. भरपूर पाऊस होता. कडाक्याची थंडी होती. सुट्टीत आम्ही वाडीतून आऱ्याच्या बागेपर्यंत चालत जायचो. आम्हीच नव्हे तर आमच्या आधीच्या पिढीतले जाणते लोकसुद्धा. तिथे दहा पैशांत कागदावर मिळणारी भेळ म्हणजे आमचा आनंदाचा ठेवा. आता मी भेळ, शेव, चणे, शेंगदाणे, बटाट्याच्या चकत्या प्लास्टिकच्या पिशवीत पहाते. त्यांच्याशी दोस्ती नाही होऊ शकत माझी. पण बरं कां मुली, तू म्हणतेस ते खरं आहे. आमच्या पिढीला पर्यावरण, हरित ठेवा हे कांही कळलंच नाही.” त्या मुलीला आता म्हातारीच्या बोलण्यात येणाऱ्या पर्यावरणाच्या पालुपदाला, विल्यम शेक्सपिअरच्या ‘ज्युलियस सीझर’ नाटकातल्या मार्क अँटनीचं “But Brutas is an Honorable Man” हे वाक्य ऐकू येऊ लागलं. अपराधी भावनेने ती त्या म्हातारीकडे पहात असतांनाच त्या म्हातारीने समोरच्या वस्तू आपल्या दुपट्ट्यात व्यवस्थित बांधल्या. “येते ग मुली. आज तुझ्यामुळे प्लास्टिक आणि पर्यावरण यावर बरीच उपयुक्त माहिती मिळाली. पण आता निघते. ऊन वाढतं आहे. आणि मी चालतच जाते नेहमी घरी.
@ © अनिल रेगे.
०२ ऑक्टोबर, २०२०.
मोबाईल : 9969610585
pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu