शालेय श्रीगणेश………. १९४६
एकदा मी एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान पहाटे बाहेर गावाहून परत येत होतो. साधारण पहाटेचे पाच दिसले. इतक्या पहाटे दुधवाले आणि वर्तमानपत्रवाले सोडले तर इतर कोणाचीही वर्दळ नसलेल्या पुण्यातील या मध्यवर्ती ठिकाणी जमलेली गर्दी बघून ही एवढी गर्दी कशाची? असा मला प्रश्न पडला. सहज चौकशी म्हणून मी रिक्षावाल्यास म्हणालो,•• •‘अरे जरा थांब काय झालेय ते पाहूया’ तेव्हा रिक्षावाला म्हणाला, ‘काही नाही साहेब उद्यापासून या शाळेचे ज्युनियर के.जी.चे अॅडमिशन फॉर्म मिळणार आहेत. हे सगळे लोक ते फॉर्म्स घेण्यासाठीच रांग लावायला जमलेले आहेत.
त्यावर मी त्याला विचारले,‘अरे पण मग इतक्या पहाटे यायची काय गरज आहे.’
आमच्या या संभाषणादरम्यान मी घराजवळ पोहोचलो त्याला पैसे दिले आणि नंतर तो रिक्षावाला निघून गेला. मी घरात आलो. रात्रीच्या प्रवासाने जागरण झाले होते व थोडा शीण आला होता म्हणून मी माझ्या पत्नीला म्हणालो,‘ मला एक कप चहा करून दे. मग मी थोडा वेळ आराम करतो.’
मी चहा घेऊन माझ्या बेडरूममध्ये आराम करण्यासाठी गेलो. जेव्हा मी अंथरूणाला पाठ टेकली तेव्हा असे वाटल की आता मला गाढ झोप लागेल पण माझ्या ही नकळत मला माझ्या शाळेचे ते रम्य दिवस आठवले आणि माझे मन भूतकाळातील माझ्या शालेय जीवनाभोवती घुटमळू लागले.
आम्ही त्यावेळी बेळगावला केळकरबाग गल्लीत राहात होतो. त्या संपूर्ण गल्लीमध्ये केळकर नावाचं कोणीचं राहायला नव्हतं किंवा त्या नावाची तिथं बागही नव्हती तरीपण त्या गल्लीला आजही केळकरबागच म्हणतात. आमच्या वाड्यासमोर एक बैठी चाळ होती. त्यामध्ये पंडीत कागलकर राहत असतं. त्यांच्याकडे बरीच नावाजलेली लोक येत असल्याकारणाने गल्लीतील वातावरणही समृद्ध होत असे.
केळकर बागेला लागूनच बेळगावातील प्रसिद्ध रामदेव गल्ली होती. तेथे रामाचे एक सुंदर मंदिर होते. त्या मंदिरावरून त्या गल्लीला रामदेवगल्ली असे म्हणत असतं. रामदेव गल्लीमधील भारतरत्न महर्षी धोंडोपंत कर्वे यांच्या महिलामंडळाच्या संस्थेने चालवलेली मुला मुलींची ‘नूतन मराठी’ या नावाची पहिली ते चौथीपर्यंत एक प्राथमिक शाळा होती. अहोबाई या कर्वेच्या एक प्रतिनिधी होत्या व त्या शाळेच्या व्यवस्थापक या पदावर कार्यरत होत्या. त्या प्रेमळ होत्या. आमच्या शाळेत पहिली ते चौथीचे असे एकूण चार वर्ग होते.
प्रत्येक वर्गात साधारण मुलांची संख्या पन्नासच्या आसपास असायची म्हणजे शाळेत साधारण २०० च्या आसपास विद्यार्थी होते. पण अहोबाईंना प्रत्येक विद्यार्थ्यांला नावाने हाक मारत असत. आमच्या घराच्या आसपास असलेली सर्व मुले-मुली त्याच शाळेत शिक्षण घेत असतं. महर्षी कर्वे यांच्या शाळेत शिक्षण घेणे हे तेव्हा एक मानाचे लक्षण समजले जात असे. त्यावेळी आजच्यासारखे प्लेग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी असे प्रकार नव्हते. त्यामुळे मी सहा वर्षांचा झाल्यानंतर माझ्या आई-वडिलांनी मला त्याच शाळेत घालायचे ठरवले.
भारंभार पुस्तकांचे ओझे विद्यार्थ्यांच्या पाठीवर नव्हते. एकच पुस्तक असायचे. तर पहिली पासून ते अकरावी पर्यंत मन्वंतर वाचनमाला नावाची पुस्तके असायची, जी पहिली ते अकरावी म्हणजे त्याकाळच्या मॅट्रिक पर्यंतच्या अभ्यासक्रमात येत असत. पहिली ते तिसरी शाळेमध्ये •फक्त पाटीचाच वापर असायचा. त्यावेळी पाटीचे तीन प्रकार होते ते म्हणजे दगडी पाटी, पुठ्ठ्याला काळ्या रंगाचा मुलामा असलेली पाटी आणि थोडी महागडी म्हणजे पत्र्याची पाटी. या तीनही प्रकाराच्या पाट्यांना लाकडी फ्रेम असायची. कारण त्यावेळी प्लॅस्टिकचा जन्म झालेला नसावा किंवा झाला असला तरी आमच्या बेळगावपर्यंत प्लॅस्टिक अजून पोहचलेले नव्हते. पाटीवर लिहिण्यासाठी पांढऱ्या रंगाची पेन्सिल असायची. त्यावेळी बेळगावात पाटीवर लिहिण्यासाठी काळ्या रंगाचा दगड मिळायाचा. तो दिसायला जरी काळा असला तरी पाटीवर लिहिताना मात्र त्याच रंग पांढरा उमटायचा. त्याला आम्ही ‘बळू’ म्हणायचो.
पाटीवर लिहिलेला गृहपाठ पुसू नये म्हणून आम्ही पाटीच्या दोन्ही बाजूला कागदी पुठ्ठे लावायचो. त्यावेळी शांता सोप नावाचा कपडे धुण्याचा साबणाचा चुरा एका गोणपाटाच्या पिशवीत मिळत होता. त्या पिशवीचा आकार साधारण आमच्या पाटीच्या आकाराएवढाच असायचा त्यामुळे शाळेतील जवळजवळ सर्वच मुले त्या पिशिवीचा वापर पाटी ठेवण्यासाठी करायची. त्यामुळे माझी अशी समजुत झाली होती की, ती पिशवी फक्त आमची पाटी ठेवण्यासाठीच बनवलेली आहे.
तेव्हा बाजारात कदाचित स्कूल बॅग्जही मिळत असतील पण, ही एवढी चांगली पिशवी उपलब्ध असताना आणि आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरविण्याची तेव्हा पद्धत नसल्याने शाळेतील बहुतेक सर्वच मुलांकडे शांतासोपचीच पिशवी असायची. पहिलीच्या मन्वंतर भाग-१ या पुस्तकाची किंमत आठ आणे (पन्नास पैसे) एवढी होती. त्यावेळी एक आण्यात अंकलिपी देखील मिळायची जिच्याकडे पाढे असायचे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्यामुलाचा एकूण ऐवज म्हणजे शांतासोपची पिशवी, तिच्याकडे एक पाटी आणि तिच्यावरील गृहपाठ पुसू नये म्हणून पाटीच्या दोन्ही बाजूला ठेवलेले दोन पुठ्ठे, पाटीवरची पेन्सिल, मन्वंतर भाग-१ चे पुस्तक, अंकलिपी आणि खाऊच्या पितळी डब्बा एवढाच असायचा. (त्यावेळी कदाचित स्टेनलेस स्टीलचा वापर सर्वसान्यांपर्यंत पोहचलेला नसावा.) बेळगाव जवळ नदी नसल्यामुळे त्यावेळी बेळगावात नळ नव्हते.
सर्वत्र विहिरीच्या पाण्याचाच वापर होत असे. रस्ते, मातीचे व भरपूर पाऊस त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत भरपूर मुरायचे. म्हणून विहिरीच्या पाण्याची पाताळी खूप वर असायची. त्यामुळे आम्हां मुलांना ही पाणी सहज काढता यायचे. त्यापाण्यात वेळोवेळी पोटॅशिअम परमॅगनेट घातले जात असे.
शाळेमध्ये शाळेतील विहिरीचे पाणी तलम फडक्याने गाळून माठात स्वच्छ भरून झाकून ठेवलेले असायचे. शेजारी एक छोटे फुलपात्र व एक ओघराळे ठेवलेले असे. त्यामुळे बेळगावात कॅम्प परिसरात एक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले तरच त्यांची प्रगती होईल असा गैरसमज त्यावेळच्या लोकांच्या मनामध्ये नसायचा. तो काळ पारतंत्राचा होता. इंग्रजी शाळांमधून जे शिक्षण दिले जात ते फक्त कारकून निर्मितीपुरते असे. त्या शाळेत बाकीचे काही ज्ञान मुलांना दिले जात नसे.
देशभक्तीपर बोलणे तेथे गुन्हा समजला जात असे. इंग्रजांना कडक वचक त्या शाळांवर असायचा. त्यामुळे काही श्रीमंतांची व मध्यवर्गीयांची मुले आपल्या मातृभाषेतच शिक्षण घ्यायची. बेळगावात कानडी लोक बऱ्यापैकी असले तरी आम्ही मित्रांमध्ये खेळतांना दुरावा आला तरी कधीही कानडी मराठीवरून वाद करून नसायचा. आपले पाढे ही आपल्याला मिळालेली एक उच्चप्रतीची सांस्कृतिक देणगी आहे. कारण, संपूर्ण वर्गाने एकाच ताला-सुरात म्हटलेले पाढे म्हणजे एखादी संगीतमय मैफिलच वाटायची.
वाचकांना कदाचित कल्पना नसेल पण, कानडीमध्ये पाढे हा प्रकार प्रचलित नाही आणि जरी असला तरी तो तितकासा संगीतमय नाही. त्यामुळे अगदी कट्टर कानडी भाषिक माणूसदेखील पाढे मराठीतूनच म्हणतो. आपण सांगताना नेहमी सांगतो की, मुलगा मातृभाषेत शिकत आहे. पण, बेळगावात मात्र वडिलांच्या पितृभाषेतूनच मुलाला शिक्षण दिले जाते. कारण, तेथे बऱ्याचदा असे होते की, आई मराठी भाषिक तर वडिल कानडी भाषिक पण, असे असले तरीदेखील मुलाला वडिल जी भाषा बोलतात त्या भाषेतूनच शिक्षण दिले जाते. याचे कारण म्हणजे घरामध्ये वडिलांचेच वर्चस्व असायचे.
तरीदेखील मुलाला पाढे मात्र मराठीतूनच शिकवले जायचे. त्यामुळे मराठीचा अभिमान असलेल्या आम्हा मुलांना याचा फार आनंद व्हायचा. मराठीतील पाढे एका ताला- सुरात म्हणताना एखादे समुहगीत म्हटल्याचा भास होत असे. कानडी भाषेतले पाढे यर्ड वंदू यर्डू, यर्डू यर्डू नाक तसेच इंग्रजीत वन टू, टू टूजा फोर या पाढ्यांमध्ये कुठलीच लयता येत नाही. म्हणूनच मराठी पाढे म्हणायला तसेच लक्षात ठेवायला सोपे असत.
आजही मला काही हिशोब करताना कॅलक्युलेटरची गरज पडत नाही. मी पहिलीत जायच्या आधीच वाड्यातल्या आमच्यापेक्षा मोठ्या मुलांबरोबर संध्याकाळी ते जेव्हा परवचा म्हणत त्यावेळी मीही म्हणायचो. त्यामुळे मला शाळेत जायच्या आधीच १ ते १०० उजळणी आणि २ ते १० पर्यंतचे पाढे पाठ होते. त्यावेळी आजच्या सारख्या कमी शिकवून सारख्यासारख्या परिक्षा घेण्याची पद्धत नव्हती. वर्षातून दोन परिक्षा घेतल्या जातं. एक सहामाही आणि दुसरी वार्षिक परिक्षा.
गणपतीच्या दिवसात शाळेकडून सर्व मुलांकडून मातीचे गणपती बनवून घेतले जात असत. गणपती बनविण्यासाठी ही लाल मातीच वापरली जायची. ज्या मुलाचा गणपती सर्वोत्कृष्ठ ठरत असे. त्या गणपतीची स्थापना शाळेच्या गणपती उत्सवात गणपतीच्या बाजूला मानाने केली जात आसे. आणि त्या विजयी विद्यार्थ्यांसाठी तो एक मानाचा भाग ठरत असे. मला मात्र मातीचा फक्त पाटा वरवंटाच बनवता यायचा पण त्याचे कुणी कौतुक करीत नसे.
जवळजवळ सर्वच घरात संध्याकाळी घरातील सर्वांनी एकत्र येऊन देवासमोर समई लावून दहा ते पंधरा मिनिटे आरती म्हणण्याचा प्रघात होता. आरतीमध्ये वेगवेगळ्या देवांची स्तोत्रे, रामरक्षा, मारूतीस्त्रोत्र इ. तसेच काही आरत्या म्हटल्या जायच्या त्यामुळे विशेष काही प्रयत्न न करतां आम्हा लहान मुलांना हे सर्व पाठ होत असे. याचा फायदा त्यावेळी जरी आम्हांला समजला नसला तरी पुढील आयुष्यात उच्च शिक्षणात व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतान त्याचा खूप उपयोग झाला.
कर्नल अरविंद वसंत जोगळेकर
४७ध३ वसंतप्रभा, संकल्प सोसायटी,
जहांगिर हॉस्पीटल समोर, पौड रोड,
पुणे – ४११ ०३८
मो.: ९८५०५०९८४७