पिया का घर ©मुकुंद कुलकर्णी

बासुदांच्या सदाबहार चित्रपटांच्या मालिकेतील आणखी एक चित्रपट ‘ पिया का घर ‘ वपुंच्या कथेवर आधारित मराठी ‘ मुंबईचा जावई ‘ या चित्रपटावर बेतलेला आहे हा सिनेमा . वपु आणि बासुदा एका नाण्याच्या दोन बाजू , एवढं साधर्म्य आहे त्यांच्या कलाकृतींमध्ये . सुशिक्षित , सुसंस्कृत , पापभिरू मध्यमवर्गीय चाकरमान्यांच्या भावपूर्ण कथा वपुंच्या साहित्यात आढळतात , नेमक्या याच सर्वसाधारण मध्यवर्ती कल्पनेवर आधारित असतात बासू चटर्जींचे चित्रपट . अरुण सरनाईक , सुरेखा , शरद तळवलकर , रत्नमाला यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला मुंबईचा जावई तर , जया भादुरी , अनिल धवन ,राजा परांजपे , आगा , पेंटल आदि कलाकारांनी साकारलेला पिया का घर . आपल्या अप्रतिम अभिनयाने जया भादुरीने हा चित्रपट खऱ्या अर्थाने क्लासिक चित्रपटांच्या यादीत नेऊन ठेवला आहे .

राम आणि मालती या जोडीची ही प्रेमकहाणी . खेड्यातील प्रशस्त घरातून मुंबईतील चाळीच्या खुराड्यात आलेली मालती , तिची झालेली कुचंबणा , सासरची मंडळी आणि नवरा या मात्र जमेच्या बाजू असतात . एक वेळ अशी येते की , जागेच्या समस्येला कंटाळून मालती परत माहेरी जाणार , पण सासरच्या संवेदनशील मंडळींचं प्रेम तिला तसं करू देत नाही . या समस्येचे निराकरण होऊन सर्व काही सुखांत कसे होते याचे मनोरंजक चित्रण घडते राजश्री प्रॉडक्शनच्या या रोमँटिक कॉमेडीतून . पुलंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मुंबईकर व्हायचं असेल तर , बाकी काही हरकत नाही पण , जागेचा प्रश्न मात्र तुमच्या वडिलांनीच सोडवलेला असला पाहिजे हेच खरं .

मालतीसाठी ‘ स्थळ ‘ घेऊन आलेले असतात पंडितजी . पहिल्याच फ्रेममध्ये बासुदा मालतीच्या प्रशस्त घराची ओळख करून देतात . रामच्या दादरमधील भारत महल चाळीचं अवास्तव वर्णन करतात पंडितजी . तरुण , सुंदर , सोज्वळ मालती हे वर्णन ऐकून आणि नवऱ्या मुलाचा फोटो बघून खूष होते . सत्तरच्या दशकात बऱ्याच मुंबईकर मध्यमवर्गीयांचं वास्तव्य चाळीतच असायचं . छोट्या आकाराच्या दोन तीन खोल्यांमध्ये दहा दहा जणांचं कुटुंब वास्तव्याला असायचं . आता आश्चर्य वाटतं पण खरंच कसं काय मॕनेज करत होते तेंव्हा लोक . लोक कशाला , आमच्या पिढीतील बहुतेक लोकांच्या तारुण्याचा थोडाफार काळ चाळीतच व्यतीत झाला आहे . फ्लॅट संस्कृती , टॉवर्स अजून फोफावली नव्हती . पण , एक मात्र नक्की जागेची अडचण सोडली तर चाळीतलं वास्तव्य सुखदायकच होतं . आजची पिढी त्याची कल्पनाही करू शकणार नाही .

सुरुवातीलाच दाखवलेल्या दादरस्थित ‘ भारत महल ‘ चाळी सारख्या अनेक चार पाच मजली चाळी तेंव्हा मुंबईच्या उपनगरात होत्या आणि लाखो कुटुंबं तिथे सुखेनैव नांदत असत . पहिलं दृश्य पाहताना पुलंच्या बटाट्याच्या चाळीची आठवण होते . आता तशाच इरसाल चाळकरी मंडळींबरोबर विनोदाची एक सुंदर सफर आपल्याला घडणार आहे याचा अंदाज येतो . एकाला एक चिकटून बिऱ्हाडकरूंच्या खोल्या . पुढे जाण्यायेण्यासाठी पॅसेज  , गॅलरी . गॅलरीत दोऱ्यांवर वाळत टाकलेले कपडे , डालडाच्या डब्यांमध्ये टांगलेली तुळशीची रोपं , छोट्या कुंड्या , एकमेकांशी गप्पा छाटणारे निवांत चाळकरी , टिपिकल चाळ आपल्या समोर उभी राहते . पंडितजी मुलीकडच्यांच्या पसंतीची खुषखबर घेऊन आलेले असतात . सोबत त्यांनी मुलीची कुंडली आणि फोटो आणलेला असतो . फोटोतील शालीन मुलगी पाहून रामचे आई वडील खूष होतात . भक्कम दक्षिणा घेऊन गुरुजीही खूष ! रामच्या मोठ्या भावाला , श्रीला एकच शंका असते मुलगी खेडवळ असेल तर कसं होणार बिचारीचं मुंबईत . श्री आणि शोभाचा प्रेमविवाह असतो . शोभा चटपटीत शहरी मुंबईकर मुलगी असते .

दूरदर्शनच्या आगमनापूर्वीचा जमाना , क्रिकेटची रेडिओ कॉमेंट्री ऐकताना साठीच्या आसपासचे प्रेक्षक नॉस्टॅल्जिक होणार ! रामचे वडील गिरिधारीलाल शर्मा ( आगा ) , सख्खे शेजारी बाबूराव कुलकर्णी ( केस्टो मुखर्जी ) , कन्हैया ( मुक्री ) हे रमी पार्टनर . रमीच्या डावाबरोबर त्यांनाही मुलीचा फोटो दाखवला जातो . सोज्वळ मालती आपल्या सालस रामसाठी योग्यच आहे यावर सर्वांचे एकमत होते . इथेच रिश्ता पक्का करण्याचा सल्ला शेजारी देतात . चाळ संस्कृतीमध्ये घरातील सदस्यांएवढेच शेजाऱ्यांचे मतही महत्वाचे असते . फ्लॅट संस्कृती अजून रुजण्यापूर्वीचा जमाना होता तो . दरवाजे सगळ्यांचे कायमच उघडे असायचे . बैठकीच्या खोलीत रामच्या वडिलांचा रमीचा अड्डा सुरू असतो , त्याच खोलीत एकीकडे रामचा मोठा भाऊ श्री आपल्या नाटकाची रिहर्सल करत असतो . सगळ्यांनी मुलीचा फोटो पाहिलेला असतो , बिचाऱ्या रामने मात्र अजून मुलीचा फोटो पाहिलेला नाही , शेवटी एकदाचा फोटो येतो रामच्या हातात . फोटो बघून रामची विकेट पडते . ‘ ये जुल्फ कैसी है ….. वो कैसी होगी जिसकी तसबीर ऐसी है ….. ‘ हे सुंदर गीत आहे या सिच्युएशनवर . फोटोवरून दोन्हीकडील पसंती तर आली . मुलाकडच्यांना देण्याघेण्याची काही अपेक्षा नसते . दोघांच्या विवाहाची तारीख निश्चित होते . केसांचा लांब शेपटा , साध्या साडीतील शालीन शिडशिडीत जया खूपच सुंदर दिसते .

मालतीचे मोठे काका ताऊजी , गौरीशंकर ( राजा परांजपे ) यांना मुंबईचं स्थळ पसंत नसतं . घरातील कर्ते पुरुष गौरीशंकर यांच्या परस्पर लहान भावाने ठरवलेलं लग्न त्यांना आवडत नाही . आपल्या लाडक्या पुतणीला एवढ्या लांब बकाल मुंबापुरीत द्यायचं हे काही त्यांना मंजूर नसतं . शेवटी मालतीची पसंती आहे म्हणून तेही तयार होतात . राजा परांजपे यांनी या छोट्या पण महत्वाच्या रोलचं सोनं केलंय . नवऱ्याकडची मंडळी , वऱ्हाडी येतात . हारतुऱ्यांनी त्यांचं स्वागत होतं . मुलीचा प्रशस्त बंगला बघून मुंबईकर हरखून जातात . अठरा खोल्यांचं घर आणि पाहुण्यांनी केलेली सरबराई बघून मुंबईकर खूष होतात . रामची मोठी वहिनी शोभा , मालती , तिचं प्रशस्त घर , अगत्यपूर्वक स्वागत करणारे सोयरे हे सगळं बघून प्रभावित होते . आपला राम मालतीला पसंत आहे की नाही याचीही खातरजमा करून घेते . आंब्याच्या पानांची तोरणं , पताका जोरदार स्वागत होतं पाहुण्यांचं . एका खोलीत श्रीच्या नवीन नाटकाची तालीम , एकीकडे रामचे वडील गिरिधारीलाल शर्मा यांनी मित्रमंडळींसमवेत जमवलेला पत्त्यांचा अड्डा बघून ताऊजी नाराज होतात . मुंबईकरांची ही थेरं त्या बिचाऱ्या रांगड्या भूमीपुत्राला खटकतात . वऱ्हाडाचा एकंदरीत रागरंग बघून अशा अतरंगी मंडळींमध्ये आपल्या साध्याभोळ्या मालतीचा निभाव काय लागणार असा विचार करून ताऊ लग्न मोडायला निघतात . गिरिधारीलाल कशीबशी ताऊंची समजून काढतात . आता ती आमची मुलगी होणार तुम्ही काळजी करू नका असे अश्वस्त करतात . गावात लग्नाआधी नवरा बायकोची समोरासमोर गाठ घडवून आणणं अवघडच असतं पण शोभा काहीतरी क्लृप्ती लढवून राम मालतीची गाठ घालून देते . या पहिल्या भेटीचे संयमित चित्रण सुंदरच . प्रथम तुज पाहता विसरलो भान मी अशी अवस्था होते रामची आणि मालतीची सुद्धा . ताऊजींना मनवून राम मालतीचं शुभमंगल मोठ्या थाटामाटात पार पडतं . बँड , बाजा , बारात साग्रसंगीत बिदाई होते मालतीची . वऱ्हाडी ट्रेनने मुंबापुरीत दाखल होतात . वधूवेषात मस्त दिसते जया . जोडा शोभून दिसतो .

वऱ्हाडाचं चाळीत आगमन होतं . गृहप्रवेश करते मालती . काड्यापेटी एवढ्या खोल्या , त्यातही बेडरूम म्हणून राम मालतीच्या वाट्याला येतं स्वैपाकघर . प्रशस्त घरात लहानाची मोठी झालेली मालती हा प्रकार बघून हतबुद्ध होते . किचनची उघडी खिडकी , खिडकीतून कायमचा येणारा उजेड . हात लांब केला तर भांडी हाताला लागतील अशी अवस्था , गॅसची शेगडी हाताच्या अंतरावर , कुरकुरणारा पलंग कशी होणार बिचाऱ्यांची ‘ सुहागरात ‘ अपरात्री नळाला आलेलं पाणी ते भरायला किचन ओपन . सगळंच ओम फस् ! मालतीला आणलेला गजरा माळण्याएवढी प्रायव्हसीही मिळत नाही रामला . मालती रामची रवानगी बाल्कनीत करते .

एवढ्याशा घरात एवढ्या लोकांचं वास्तव्य . सासऱ्यांचा पत्त्याचा अड्डा , मोठ्या दिराची नाटकाची तालीम , छोटा दीर हरी , त्याचं क्रिकेट थोडाही एकांत मिळत नाही राम मालतीला . जीव घुसमटतो मालतीचा . ती रामला पहिल्या सारखं गॅलरीतच झोपायचं सुचवते . मालती किचनमध्ये राम गॅलरीत . ‘ ये जीवन है ईस जीवनका यहीं है रंगरूप ‘ हे या सिच्युएशनला एकदम फिट बसणारं सुंदर गीत . रेडिओच्या जमान्यात बॅकग्राउंडवर , विविध भारतीवर लागणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांचा सुरेख वापर केला आहे बासुदांनी वातावरण निर्मितीसाठी .

गिरिधारीलाल शर्मा , त्यांच्या पत्नी , मोठा मुलगा श्री , त्याची पत्नी शोभा , राम आणि छोटा शाळकरी भाऊ हरी त्यात आता नवीन भर मालती . हे एवढे सगळे लोक दोन छोट्या खोल्या आणि त्याहून लहान किचन एवढ्या टीचभर चाळीतल्या जागेत रहात असतात . अवघडच असतं मालतीसाठी हे सगळं , तरीपण ती हळूहळू सगळ्या घरच्यांशी जुळवून घ्यायला शिकते . धाकट्या दिराबरोबर , हरीबरोबर तिची चांगली गट्टी जमते . त्याला ती आपल्या बाळपणातल्या आठवणी सांगत असते . राम मालती दोघांना हवाहवासा वाटणारा एकांत मात्र त्यांना मिळत नसतो .

रामचा जिगरी दोस्त अरुण (पेंटल ) , रामच्या नवविवाहित आयुष्याबद्दल चौकशी करतो . राम आपली व्यथा त्याला सांगतो . त्याला समजतं राम मालती एकत्र येऊ शकत नाहीयेत . राम बिचारा अजूनही रात्री गॅलरीत  झोपत असतो . मालती रामपेक्षा जास्तवेळ धाकटा दीर हरीबरोबर असते .तशी मालती अजूनही अल्लडच असते . आकाशातून विमान जात असेल तर , धावत खिडकीपाशी जात असते . रामला कळत असतं परिस्थितीच अशी आहे की , त्यात मालतीचा काही दोष नाही . अरुण रामला सल्ला देतो , तू आता मर्द पुरुषासारखा दबंग वाग . हिंदी सिनेमातल्या धर्मेंद्र सारखा डॅशिंग  हो वहिनीला बळजबरीने जवळ घे , तिचा लटका राग पळून जाईल . अरुण अजून अविवाहित असला तरी हिंदी पिक्चर्स बघून बघून त्याच्या डोक्यात अशा भन्नाट कल्पना येत असतात . घरी गेल्यावर हाचं प्रयोग करून पहायचं राम ठरवतो . मस्तपैकी पान वगैरे खाऊन तयारीनिशी घरी जातो . झोपायच्या वेळेला हा प्रयोग मात्र फेल जातो ! मालती रामची रवानगी बाहेर करते .

आता अरुणचा दुसरा उपाय , मालती जवळ जायचा प्रयत्नच करू नकोस . तिच्यापासून लांबच रहा . रोजच्यासारखं संध्याकाळी साडेसहा ऐवजी रात्री उशिरा साडेनऊ नंतर घरी जा , मग बघ , ती स्वतःहून तुझ्याकडे पळत येते की नाही . अचानक घरच्या सगळ्यांचा श्रीचे नवीन नाटक पाहण्याचा प्रोग्रॅम ठरतो . राम अजून आलेला नसतो , वहिनी नाटकाची दोन तिकिटे मालतीच्या हातात ठेवते . बाकीचे सगळे पुढे होतात . दोघांना एकांत मिळावा म्हणून शोभा मालतीला सूचकपणे सांगते नाटकाला यायला पाहिजेच असं काही नाही . घरात मालती एकटीच , सुवर्णसंधी ! मालती अधीरतेने रामची वाट बघायला लागते . या सिच्युएशनवर ‘ पिया का घर है ये रानी हूं मैं ‘ हे सुंदर गीत . आपल्या लाजवाब अभिनयाने जया या गाण्यात जान भरते . मस्त जरीची साडी नेसून नटूनथटून मालती रामची वाट बघत असते . घड्याळाचा काटा साडेनऊ पर्यंत सरकलेला असतो , मालती सहा वाजल्यापासून वाट पहात असते . ठरल्याप्रमाणे उगाचच टाईमपास करून इकडेतिकडे भटकंती करून राम उशिरा साडेनऊ नंतर घरी येतो . वाट बघून बघून बिचारी मालती विझून गेलेली असते . चेहरा पार उतरलेला असतो . ती सांगते मी संध्याकाळी सहा वाजल्यापासून वाट पहात होते . दरवाजा वाजतो . घरची सर्व मंडळी नाटकाहून परततात . वहिनी रामला चिडवते मला माहिती होतं , तुम्ही दोघं नाटकाला येणार नाही . हा उपायही फेल !

श्री , वहिनी , अरुण सगळे विचारात पडतात या दोघांना कसं एकत्र आणायचं . वहिनी प्लॅन करते . श्री , वहिनी , आईबाबा सहाच्या सिनेमाला जायचं ठरवतात . म्हणजे राम मालतीला तेवढा तरी एकांत मिळेल . पण हरीचं काय करायचं ? योगायोगाने हरीच्या शाळेची दोन दिवसांची अजिंठा वेरूळ ट्रिप ठरते .गिरिधारीलाल पैसे द्यायला तयार नसतात . राम ही संधी कशी सोडेल . तो ताबडतोब हरीला ट्रिपसाठी पैसे देतो . आपला कंजूष दादा न मागताच पैसे कसे काय देतो हे मात्र हरीला कळत नाही ! त्याच संध्याकाळच्या शो चा प्लॅन ठरतो . शंकर पार्वतीचा पौराणिक सिनेमा आहे म्हणल्यावर आई तयार होते . चौघे सिनेमाला जातात . श्री , शोभालाही एकांत हवा असतो . ते दोघे आईबाबांना हिंदी सिनेमाला बसवतात आणि आम्ही मॕकेनाज गोल्ड पाहणार म्हणून कलटी मारतात ! अधीर राम ऑफिस सुटताच टॅक्सीने घराकडे निघतो . जिसका हमे था इंतजार वो घडी आ गयी अशी अवस्था होते दोघांची . मिळालेले चार पाच तास सत्कारणी लावायचा त्यांचा इरादा असतो . भारतीय बैठक मांडून एकाच ताटात जेवायचा रोमँटिक प्लॅन करतात . दारावर टकटक , दोघेही चमकतात . निवडणूक प्रचारासाठी उमेदवार कार्यकर्त्यांसह आलेला असतो . राम कसेबसे त्यांना कटवतो . रोमँटिक डिनरचा पहिला घास घेणार एवढ्यात दारावर पुन्हा टकटक . शेखर ( असरानी ) सपत्निक टपकतो . शेखरची पत्नी शोभाची बहिण असते . पुण्याला जाण्याआधी एक रात्र मुक्काम करून रामची नववधू बघून पुढं जायचं असा त्यांचा विचार असतो , त्यासाठी ते नेमका आजचाच दिवस निवडतात . अर्थात हा प्लॅनही फेल ! मिळालेल्या संधीचा फायदा उठवतात शेखर आणि त्याची पत्नी ! ये जीवन है ….. राम मालती बिचारे रडकुंडीला येतात . रामच्या हातात पुन्हा गॕलरीत झोपण्यासाठी अंथरूण .

श्री रामला सुचवतो चांगल्यापैकी हॉटेल बुक कर आणि तिथे घेऊन जा मालतीला . पश्चिम रेल्वेच्या चक्क रिकाम्या लोकलमधून प्रसन्न मूडमधे दोघे चर्चगेट स्टेशनवर येतात . बंबई नगरी बघून अल्लड मालती हरखून जाते . ‘ बंबई शहरकी तुझको चल सैर करा दूं ‘ चर्चगेट , फ्लोरा फाऊंटन , कुलाबा , फोर्ट , गेट वे ऑफ इंडिया , दक्षिण मुंबई , राणीचा बाग , धर्मेंद्रच्या सिनेमाचे शूटिंग , एअरपोर्ट , रेस्टॉरंटमध्ये कोक मजा करतात दिवसभर . लॉजवर रुम बुक करताना या प्रसंगातून कधीही न गेलेला राम गोंधळून जातो . रिसेप्शनवर जाऊन रुम बुक करायचं धाडस होत नाही . कशीबशी एका ठिकाणी एक रुम रिकामी मिळते . खिडकीतून समुद्र दिसत असतो , हवेशीर असते रुम . इथेही दरवाजावर टकटक , बाहेर पोलीस . त्यांच्या आधीचा कस्टमर क्रिमिनल असतो . त्याला पकडायला आलेले असतात पोलिस . ॲरेस्ट वॉरंट म्हटल्यावर मालती रडायलाच लागते . तो हा नाही हे समजल्यावर पोलिस निघून जातात पण तोपर्यंत रंगाचा बेरंग झालेला असतो . सगळ्या प्रकाराला मालती वैतागते . झोपडी चालेल पण स्वातंत्र्य हवं . ताऊजी बरोबरच सांगायचे मुंबई हे ठिकाण चांगलं नाही . रामला जिथे प्रायव्हसी मिळेल अशी दुसरी जागा बघ म्हणून सुचवते . पण मुंबईत दुसरी जागा ही गोष्ट तेंव्हाही आणि आताही कनिष्ठ मध्यमवर्गाच्या आवाक्याबाहेरच आहे . मुंबईत चाळीतल्या वास्तव्याला मालती कंटाळून जाते . काही दिवसांसाठी माहेरी सोडून ये असे रामला सुचवते . मुंबईत तिचा जीव गुदमरून जायला लागतो .

हे बाहेर असतानाच गावाकडून ताऊजी अचानक येतात . राम मालती घरात नसतात . त्यांचं खुराड्यासारखं घर बघून काका व्यथित होतात . त्यांना आश्चर्य वाटायला लागतं लाडाकोडात वाढलेली आपली लाडकी लेक इथे राहते कशी ? उद्विग्न अवस्थेत घराकडे परतलेली आधीच वैतागलेली मालती अचानक समोर ताऊंना बघून हळवी होते . त्यांच्या गळ्यात पडून रडायलाच लागते . बासुदा परंपरेनुसार इथे कहानीमे ट्विस्ट ! मालती रडायला लागते तसे काका अस्वस्थ होतात . रामला तिच्या रडण्याचा जाब विचारतात . असल्या खुराड्यात आपली पुतणी राहणार नाही असे ठणकावतात . तिला ते आल्यापावली माहेरी घेऊन जायला निघतात . रामची आई विनवते निदान आज तरी जाऊ नका अमावास्या आहे . ताऊ त्याला तयार होतात .उद्या संध्याकाळी सातच्या ट्रेनने मी मालतीला घेऊन जाणार . मुंबईचं स्थळ नको असं मी आधीपासूनच म्हणत होतो असं म्हणून तणतणत ते घराबाहेर पडतात . काय होणार आता राम मालतीचं ? या देखण्या जोडीची ताटातूट होणार की मीलन ?
 
बिचाऱ्या मालतीचा आपण कुणीच विचार केला नाही असं सर्वांना वाटायला लागतं . आईवडील ठरवतात आपण तीर्थयात्रेला बाहेर पडू मग ताऊजी मालतीला इथे ठेवायला तयार होतील . श्री ची पत्नी शोभा श्रीला सुचवते मी काही दिवसांसाठी माहेरी जाते , आपली खोली त्या दोघांना देऊ म्हणजे तिचे काका तिला मुंबईत ठेवायला तयार होतील . सगळे मिळून ताऊंची मनधरणी करून मालतीला इथेच ठेवण्याची विनंती करायची असं ठरवतात . ठरल्याप्रमाणे ताऊ मालतीला घरी घेऊन जायला येतात . हे सर्व उपाय वरवरचे आहेत , एक तर वेगळं मोठं घर बघा नाहीतर मी आजच मालतीला आपल्या बरोबर घेऊन जाणार असे ताऊ रामच्या वडिलांना सुनावतात . आईबाबा , श्री , शोभा ताऊंसमोरच आम्ही जागा सोडून जाऊ , किमान दोन महिन्यांसाठी तरी राम मालतीचा जागेचा प्रश्न सुटेल असं सुचवतात . ताऊंना हे पटत नाही , दोन महिन्यानंतर काय हा त्यांचा रास्त प्रश्न असतो . त्यापेक्षा मी रामलाच तिकडे घेऊन जातो , त्याला तिकडे चांगली नोकरीही मिळवून देतो , दोघेही सुखासमाधानाने राहतील हा पर्याय ठेवतात . मालतीला ते घरी निघण्यासाठी बोलावतात . मालती ताऊंसमोरच जावेला सांगते कुणीही कुठेही जाण्याची गरज नाही . पहिल्यासारखेच आपण याच जागेत एकत्र राहूया . ताऊजींना ती नकार देते , सुखात दुःखात आता हेच माझं घर ‘ पिया का घर ‘ आहे . असं ती ताऊजींना सांगते . शेजारी आपली टॅक्सी  गहाण ठेऊन यांच्या नव्या जागेसाठी पागडीची व्यवस्था करतो , आम्हाला पंधरा दिवसांची मुदत द्या अशी विनंती करतात . सहवासाने मालतीलाही सर्वांचा लळा लागलेला असतो आईवडिलांसमान प्रेमळ सासू सासरे , दीर जाऊ , जीवाला जीव देणारे सख्खे शेजारी यांना सोडून जायला ती तयार होत नाही . ताऊंना ती विनंती करते कसंही असलं तरी आता हेच माझं घर आणि हीच माझी जिवाभावाची माणसं , मी इथेच राहणार . सर्वांच एकमेकांवरचं प्रेम बघून ताऊ पण गहिवरून जातात . मालतीच्या खुशीतच माझी खुशी म्हणून तेही अनुमती देतात . मालतीवर माझं जिवापाड प्रेम आहे , त्यापोटी मी तुमचा अपमान केला म्हणून ते रामच्या वडिलांची क्षमा मागतात . चाळकऱ्यांचं एकमेकावरचं प्रेम , आपुलकी बघून ताऊंचं मत परिवर्तन होतं . मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली , मला माफ करा असं म्हणतात . माझ्या समंजस मालतीची मला आता काळजी वाटत नाही , मी समाधानाने जातो असं सांगून ते निघतात जाताना राम मालतीला नांदा सौख्यभरे असा आशीर्वाद देतात . मालती राम दोघांच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं . दोघांना आत अडकवून बाहेरून कुलुप लावून सगळे श्रीच्या नवीन नाटकाची रिहर्सल पहायला बाहेर पडतात . ये जीवन है ….. या धूनवर किचनमध्ये राम मालती एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध होतात . या हॕपी नोटवरच ही सुखांतिका संपते . निखळ निर्व्याज फॅमिली  ड्रामा असलेली ही रोमँटिक कॉमेडी नक्कीच आवडेल !
मुकुंद कुलकर्णी©
PC: Google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu