Famous Eating Places in Pune -पुणे – खाद्य भ्रमंती

भटकंतीच्या निमित्ताने एखाद्या सुंदर ठिकाणी जमेल त्या वेळी, जमेल तेव्हा, जमेल त्यांचा बरोबर फिरणे हा नियम मी पाळत आलेलो आहे.भटकंतीतून आनंद मिळवणे आणि आनंदातून भटकंती हे चक्र सदैव फिरत असते.अश्याच भ्रमंतीमधून मग अनेक चांगले गुण,छंद,आवडी जोपासल्या जातात.वास्तविक कुठलीही भ्रमंती ही एखाद्या विशिष्ठ स्थळाशीच एकरूप असते.पण कुठल्याही भटक्यांनी ही मर्यादितता फक्त स्थळापुरतीच मर्यादित न ठेवता तिथला निसर्ग,प्राणी-पक्षी,उत्सव,संस्कृती यांच्याशीही जुळवून घेतले पाहिजे.कुठल्याही संस्कृतीत प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात.एक म्हणजे ‘आद्यसंस्कृती’आणि दुसरी ‘खाद्यसंस्कृती’.माणूस हा पहिल्यापेक्षा दुसऱ्या संस्कृतीशी जास्त जवळून एकरूपता दाखवतो.माझ्याबाबतीतही नेमके तेच झाले.या खाद्यासंकृतीशी एकरूप होण्याचे बाळकडु मला भारताच्या सांकृतिक राजधानीत राहून रुजत गेले.

माझी जन्मभूमी जरी नसली तरी कर्मभूमी ही पुणे असल्याने,इथल्या मातीत असणाऱ्या काही अत्यावश्यक गुणांबरोबरच इथली खाद्य संस्कृती जपण्यासाठी जे गुण लागतात तेही माझ्या पचनी पडत गेले आणि स्थळ,काळ,वेळ यांचा समन्वय साधून माझी खाद्याभ्रमंती सुरु झाली.अर्थात या भ्रमंतीची सुरुवात स्वत:च्या घरातूनच होते.हिंदू नव वर्षाच्या स्वागताला बत्ताशे आणि कडुलिंबाचे पान तोंडात ठेवण्यापासून जो प्रवास सुरु होतो तो वर्षाखेर होळी पौर्णिमेला कटाच्या आमटीत पुरण पोळी बुडवल्या नंतरच संपतो.या वर्षभराच्या प्रवासात भारतीय संस्कृती रक्तात उतरण्याआधी पोटात उतरविली जाते.खादाडी साठीच विशेष प्रसिध्द असणा-या काही सणात पाडव्यानंतर मग पुढे रामनवमी-हनुमान जयंतीला सुंठवडा,श्रावण पौर्णिमेला नारळी भात,अश्या मार्गाने माझा प्रवास सुरु होतो.
पुढच्या घाटवळणाला भाद्रपातात गणेशकृपेनी उकडीचे मोदक आणि उकडीत हिरवी मिरची ठेचून बनवलेल्या ‘निवग-या’मार्ग मोकळा करून जातात.रात्रीच्या प्रवासाला खास कोजागिरीला आटवलेले केशर,वेलची युक्त दुधानी तर माझी खाद्य ‘जर्नी’ ‘हॅपी’ झालेली आहे.यानंतर नाशकातला ‘कोंडाजी’ असो व भवानीतला लक्ष्मी नारायण,खास दिवाळीसाठी घरात बनलेला रुचकर पातळ पोह्यचा चकली-चिवडा तर वर्षभर माझ्या दिमतीला असतोच.संक्रांतीला तिळ हा गूळाबरोबर जेवढा पौष्टिक तसाच साजूक तुपाच्या धारेखाली बाजरीच्या भाकरीबरोबरही उत्तमच.याशिवाय दर संकष्टीला साबुदाणा खिचडी, बटाट्याचा कीस आहेच.खाद्य प्रवासात हिंदू सणांबरोबर काही इतर सणही लाखमोलाचे पदार्थ देऊन जातात.इस्टर संडेला कॅम्पमध्ये बनवला गेलेला लेमन कोकोनट केक तोंडात सोडताच वीरघळल्या शिवाय रहात नाही.ख्रिस्तमसला बनवली जाणारी खास ‘गोअन करीची’चव कुठल्याही देसी आमटीची डाळ शिजू देणार नाही.तसे पुण्यात देशी-विदेशी सर्व पदार्थ मिळून जातात.साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशी पुण्याच्या हॉटेलांमध्ये दिसणारी गर्दी पहिली की अजून कितीतरी अतृप्त आत्मे खाद्य भ्रमंतीतून मुक्ती मिळवण्यासाठी हॉटेलांबाहेर रांगा लाऊन तासंतास ताटकळताना दिसतात.पुण्यामध्ये शनिवार-रविवार घरात चूल पेटतच नाही असा माझा ठाम विश्वास होऊ लागलाय.एखाद्या पुण्याबाहेरच्या माणसांनी हॉटेलबाहेर होणारी गर्दी पहिली तर विकेंडला घरात बिलकुल अन्न शिजवू नये असा सरकारी कायदा वगैरे आहे की काय अशी शंका यावी.केवळ खादाडीसाठी इतकी तुडुंब गर्दी जगातल्या अजून कुठल्याही शहरात दिसत नसेल.केवळ स्वयंपाक करण्यास कंटाळा अथवा घरचे जेवण आवडत नाही अशीच कारणे असतील असे वाटत नाही.त्यासाठी घरातल्या नव्या पिढीच्या अन्नपूर्णाच दोषी असतील की नाही हा भाग निराळा पण इथल्या हवेतलाच हा गुण आहे.त्यामुळे पोटात कावळा आणि डोक्यात किडा आला की सरळ उठून,इच्छित स्थळी जाऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे हा पुणेकरांचा सार्वजनिक छंद आहे.असा हा छंद जीवाला जडला की माणूस जिभेचे चोचले पुरवायला कधी उपवासाला अप्पाची खिचडी खाताना,तर कधी कावेरीत जाऊन डोळे आणि नाक पुसत तांबडा रस्सा ओरपतानाही दिसेल.पुलंच्या उक्तीनुसार इथल्या दुकानांमध्ये जरी गि-हाइकाचा किमान शब्दात कमाल अपमान होत असला तरी ते दुकान खास उदरभरणासाठी असेल तर आलेलं गि-हाइक तोही अपमान तिथे मिळणा-या ‘खास’पदार्थाबरोबर पचवून तृप्त होऊन जातो.फक्त इथल्या उपहारगृहांच्या आणि दुकानांच्या वेळा सांभाळता आल्या पाहिजेत.गरम गरम बाकरवड्या खायला एकच्या अगोदरच चितळ्यांच्या दारात पोचायला हवे.

पहिल्या फोडणीत जमून आलेली पुणेरी मिसळीवरची तर्री ‘बेडेकर’आणि ‘श्री’मध्ये दुपारी चार नंतर संपलेली असेल.तर शरीरातील प्रमुख मर्मस्थळांना धक्का देऊन जाणारी मिसळ खायला टिळक रोडला ‘रामनाथ’ किंवा कर्वे रोडला ‘काटा किर्र’ मध्ये दिवेलागणी आधी पोचावे.साउथ इंडिअन पदार्थांवर ताव मारायला ‘मानकर’,’वैशाली’आणि ‘वाडेश्वर’हे प्रसिद्ध आहेतच पण आमच्यासारख्या भटक्यांना पहाटे चारला गरमागरम उपमा आणि वडासांबार देणारे मृत्युंजय चौकातले ‘हॉटेल स्वीकार’एकमेव आहे.महाराष्ट्राचे ‘राष्ट्रीय’खाद्य म्हणून ओळखला जाणारा वडा-पाव बनवण्यात ‘जोशी’वडेवाल्यांचा हाथ शहरभर पसरला आहे.कामचलाऊ पोटभरतीसाठी आणि सर्व वयोगटात आवडते असलेले चमचमीत पदार्थ म्हणजे भेळ आणि पाणी-पुरी.भेळ ही गोष्ट समुद्रकिना-यावर वाळूत बसून खाण्याची जरी असली तरी पुण्यात बहुतेक पेठांच्या किना-यांवर थाटलेल्या ‘गणेश’आणि कॅनौल रोडवरचे ‘कल्याण’भेळ जिभेचे सर्व चोचले पुरवतात.पाणी-पुरीचे रसायन जमायला लागणारे समीकरण हे प्रत्येक भेळवाल्याचे जुळतेच असे नाही.त्यामुळेच कित्येकवेळा खास पाणीपुरीसाठी मी कोथरूड वरून विश्रांतवाडी रोडला अठरा किलोमीटर गाडीपिट करून ‘सुदामा’मध्ये येऊन दाखल झालेलो आहे.तिखट-आंबट-पाण्यात पुरी बुडवून जेव्हा ती आपल्या समोरच्या प्लेट मध्ये धरली जाते तेव्हा किमान चार प्लेटांची आवर्तने संपवल्याशिवाय प्लेट खालती ठेवता येणं केवळ अशक्यच!अश्याच चमचमीत खाद्यात प्रसिद्ध असणारी भजी आणि मिरचीच्या ठेच्या बरोबर पिठलं भाकरी घरात न बनवता ती सिंहगडावरच खाऊन येण्याचे आदेश मी दिले आहेत.इथल्या हवेत आणि इथल्या मातीत खवय्यांसाठी लागणारे सर्व गुण आणि सर्व पदार्थ मिळू शकतात.फक्त खाण्यासाठी भटकंती सुरु ठेवावी ही अट आहे.जितक्या अस्सल शाकाहारी पदार्थांवर ताव मारता येतो त्याहून अधिक मांसाहारी पदार्थांवर मारता येतो.ज्यांना जमत नसेल त्यांनी सुरुवात अंडा बुर्जीपासून करावी.त्यासाठी अर्थातच पौड रोडच्या ‘दुर्गा कॉफी शॉप’हे जगप्रसिद्धच.सुज्ञानी अंड शाकाहारी की मासाहारी या वादात पडण्यापेक्षा आम्लेट बुर्जीमार्फात पोटात पाडून पहावे.तसेच एस पी कॉलेजच्या बाजूच्या बोळात हातगाडीवर अंड्याची उत्तम रेसिपी अनुभवता येते.समोरच्याच बाजूला पुन्हा ‘एस पी’ज बिर्याणी हाउस आपल्या स्वागताला असतेच.शक्यतो खवय्यांनी बिर्याणीसाठी उगाच कुठेही वणवण भटकण्यापेक्षा सरळ कॅम्पात ‘ब्लू नाईल’च्या तीरावर जावे नाहीतर भवानी पेठेत ‘राशीद मिया’आहेतच.

चिकन मटण थाळीसाठी प्रसिद्ध असणारे सदाशिव पेठेतले ‘आवारे लंच होम’अजूनही खवय्यांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी आणु शकते.पूर्वी पुण्यात तितकेसे ताजे मासे कुठे मिळत नसत आता तीही कसर इथे भरून निघाली आहे.इथे कन्याशाळेजवळील ‘फिश करी राईस’,लालन सारंगांच ‘मासेमारी’ आणि नळ स्टॉप जवळील ‘निसर्ग’ आणि ‘कलिंग’येथे निरनिराळे मत्स्यावतार आपल्याला चाखता येऊ शकतात.
माणुस खाद्यसंस्कृतीशी एकरूप झाला की आद्य संस्कृती आपोआप वृद्धींगत होऊ शकेल.संस्कृतीची जपणूक करायला उगाच कुठल्या सनातनी विचारांपेक्षा सनातन काळापासून चालत आलेल्या पदार्थांची देवाण घेवाण अधिक कार्यक्षम ठरू शकेल.’जीभ’ हे मानावाकडील सगळ्यात धारदार शस्त्र आहे,असं कुणीसं म्हंटलय.मग या शस्त्राचा दुरुपयोग टाळून मानवाने समाजात खाद्य संस्कृती रुजवण्यासाठी हे यत्नकर्म केल्यास आद्य आणि खाद्य अश्या दोन्ही संस्कृती वर्धिष्णू होण्यास नक्कीच मदत होईल.

-समीर दिवेकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu