ढिल दे दे ढिल दे दे रे भैय्या ….
ढिल दे दे ढिल दे दे रे भैय्या ….
पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होते. सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायानातून उत्तरायणात होण्याच्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.
मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली. या देवीला अनेक हात आहेत. एखाद्या वाहनावर बसून वस्त्रालंकारानी सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसरया दिशेकडे जात असते असे वर्णन पंचांगात दिलेले आहे.संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते.विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात यावरून आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे हा वाक्प्रचारही आलेला आहे.
संक्रातीचे तीन दिवस
भोगी:
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
दक्षिण भारतात हा दिवस भोगी पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी इंदाची पूजा करून आप्तजनांसह मिष्टान्न भोजन करण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांती:
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।
(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगूळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. तिळावर साखरेचा पाक चढवून हलवा करण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी.
मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरावणारंभापासून (२२ डिसेंबरपासून) मोठे घालेले दिवमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूयोर्दयापासून सुर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार! म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात. फरगीव्ह अँड फरगेट हा संदेश या सणाद्वारे दिला जातो. जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे.
बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करून इष्ट मित्राना देतात. तसंच तांदुळाच्या पिठात तूप-साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करून तोही वाटतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयाग इथे मोठी यात्रा भरते. अनेक भाविक गंगास्नान करतात. दक्षिणेतही ताम्रपणीर् नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिन्नेवल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात.
हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात. दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्याना खाऊ घालतात.
दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगळ म्हणून साजरा करतात. या दिवशी अंगणात दुधातही तांदुळाची खीर शिजवतात. खिरीला उकळी आली, की पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे.
किंक्रांत:
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो.
संक्रांतीच्या दिवशी मनातील द्वेषभाव नाहीसा करून परस्परांत प्रेम निर्माण करायचे असते. तिळातील स्नेह व गुळातील गोडी आपल्याही जीवनात यावी म्हणून आपण तिळगुळ देतो. म्हणूनच तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणत मनातील सारे रुसवे फुगवे विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करावी.
साभार संदर्भ : लेख – संक्रातीचे तीन दिवस
-दा. कृ. सोमण
PC:google