देवपूजेचे प्रकार 

देव आणि देवपूजा ही संकल्पना आजची नाही. मुळात ती संकल्पनाच नाही. ती प्रत्यक्ष अनुभवातून परिणत झालेली जीवनधारणा आहे. वेदकाळातील ऋषी मुनींनी आपल्या द्रष्टेपणातून जो या विश्वाच्या जडणघडणीचा अभ्यास केला त्याची ही फलश्रुती आहे. या संकल्पनेत कालानुरूप बदल होत गेले आहेत पण मूळ तत्व मात्र कायम आहे. थोडक्यात देव आणि देवपूजा ही आपल्या वैदिक परंपरेने संपूर्ण मानव जातीला दिलेली एक अनमोल देणगीच आहे. ती सुखमय आहे , शांतिमय आहे. प्रवृत्तींकडून निवृत्तीकडे नेणारी आहे. पूजा ही भक्तिभावाचं मूळ उगमस्थान आहे. 

आज माणूस सर्वकाही मिळवण्याच्या नादात जी एकमेव गोष्ट गमवून बसला आहे ती म्हणजे मा:शांती. समाधान. आनंद ! ५० -१०० वर्षांपूर्वी माणसाची जी आर्थिक परिस्थिती होती आता ती बदलली आहे. थोडी सुबत्ता आली आहे , अर्थार्जनाचे वेगवेगळे मार्ग खुले झाले आहेत. देहाचे कष्ट कमी करणाऱ्या , श्रम वाचवणाऱ्या अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. हे सारं सुखं सर्वार्थाने आणि सर्वांगाने भोगूनही भोक्ता मात्र समाधानी नाही.
ऐहिक सुखाचे उत्सव साजरे करता करता दमून गेलेला आणि भौतिक सुखामागोमाग येणाऱ्या दुःख वेदनांनी व्याकुळ झालेला माणूस आता खऱ्या आनंदासाठी योगविद्या शिकू लागलाय, आर्ट ऑफ लिविंग शिकू लागलाय , आधुनिक संत महात्मांच्या मठात किंवा आश्रमात जाऊ लागलाय. तीर्थयात्रा करू लागलाय. इतकच काय तर हजारोंच्या संख्येने पंढरपूर शिर्डी पायवारीही करू लागलाय. ध्यानधारणा, नामस्मरण या सारख्या साधनांकडेही तो वळू लागला आहे.देवपूजा ही सुद्धा त्याला समजून उमजून करावीशी वाटत आहे. करणं काहीही असोत हे परिवर्तन म्हणजे आपली आपल्यालाच खूण पटू लागल्याचा शुभशकुन आहे . 
देवपूजा काय , नामस्मरण काय, व्रतवैकल्ये काय किंवा सण- उत्सव काय यांच्या संकल्पनेतील भूमिका समजावून घेतली की हे उपक्रम केवळ कर्मकांड नसून आपल्या दु:खी ,कष्टी जीवाला आंतरिक आनंदाकडे नेणाऱ्या सोप्या वाटा आहेत हे कळते. 
या सदरातील माहितीने आजच्या स्वत:च्या अंतरिक आनंद गमावून बसलेल्या माणसाला आपल्या वैदिक परंपरांबद्दल आत्मीयता वाटून त्यांच्या अभ्यासाने व मनन , चिंतनाने थोडीफार मन:शांती लाभावी हाच या प्रयासामागील सद्हेतू आहे .   
 
देवपूजा : 
देवपूजेचे स्थूलमानाने स्वरूप पहिले तर असे दिसेल की  हा प्रवास समग्रतेकडून एकाग्रतेकडे नेणारा आहे. देवपूजा हि मुख्यतः: पंचायतन पूजा असून तिचे दोन प्रकार आहेत. 
१. नित्य पूजा 
२. नैमित्तिक पूजा 
आणखी एक साधकांचा प्रकार आहे तो म्हणजे ३. मानस पूजा 
 
१. नित्य पूजा 
प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीने रोज आचारण्याचे हे नित्यकर्म आहे असे धर्मशास्त्र सांगते. घरातील वाडीकधाऱ्या मंडळींनी हे कर्म करण्याची पद्धत पूर्वी रूढ होती. यामुळे पूर्वी सुसंकृत घरात देवघर व देवपूजा अनिवार्य मानले जात असे. आजही कुटुंबव्यवस्था जरी विस्कळीत झाली असली तरी विभक्त कुटुंबात जी वडीलधारी मंडळी आहेत ती हा आजही हा नेमधर्म पाळतात. श्री. सत्यनारायणाची पूजा हि या पूजेचाच एक भाग आहे. 
पंचोपचार : गंध , पुष्प, धूप , दीप, नैवेद्य हे पंचोपचार असून नित्यपूजेत हे उपचार अनिवार्य असतात. नित्य पूजा पंचोपचारांची केली तरी चालते. 
नित्यपूजेसाठी घरात देवघर असतेच व त्यातच पंचायतन व इतर देव, इष्टदेवता किंवा त्याच्या तसबिरी असतात. याशिवाय शंख व घंटाही असते. शंख नेहमी पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूस आसनस्थ हवा. तो निरांजनाच्या आकारासारख्या आडणीवर ठेवावा. देव्हाऱ्यात दोन शंख किंवा दोन घंटा असू नयेत. शंख , घंटा देवघरात देवांच्या पुढे दर्शनी भागास  ठेवावे. सर्व देव रेशमी वस्त्राच्या आसनावर ठेवावे. रेशीम हे मुलायम व शुद्ध वस्त्र समजले जाते. हे वस्त्र नित्य बदलावे. देव्हाराही नित्य स्वच्छ करावा. सकाळी व संध्याकाळी देवघरात दिवा तेवत राहावा म्हणून छोटी समई असावी. समईच्या मंद प्रकाशाने देवघर उजळून निघते व त्यामुळे मन प्रसन्न होते. देवघरातील धातूच्या वा पाषाणाच्या देवांना सामान्यतः रोज पाण्याने स्नान घातले जाते. पण काही शास्त्रकारांच्या मते देव ओलसर वस्त्राने पुसले तरी चालतात. हा प्रकार भावनेनुसार पत्करावा. पंचोपचारात नमस्कार व आरती या उपचारांचा समावेश नसला तरी त्याशिवाय पूजा पूर्ण होणार नाही. म्हणून निदान गणपतीची एक आरती म्हणावी व देवांना नमस्कार करावा व प्रार्थना करावी. 
 
नैमित्तिक पूजा :
विशिष्ट प्रसंगी , व्रतवैकल्याच्या निमित्ताने , सण वारी किंवा चातुर्मासात व्रतारंभ करावयाच्या देवपूजेस नैमित्तिक पूजा म्हणतात. कुळधर्म , कुळाचार , वार्षिक उत्सव, विवाह , व्रतबंध , भूमिपूजन , वास्तूपूजन , कलशपूजन आदी प्रसंगी करावयाच्या पूजा यासुद्धा नैमित्तिक पूजा होत. भाद्रपदातील गणेशोत्सवात होणारी गणेश पूजा , गौरी पूजा, नवरात्रातील दुर्गा पूजा किंवा इतर व्रतपूजा या सुद्धा याच प्रकारात मोडतात. नैमित्तिक पूजा ही साधारणपणे षोडशोपचार असते. 
पूजेतील षोडषोपचार :
आवाहन ,आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान, वस्त्र , यज्ञोपवीत, गंध , पुष्प, धूप, दीप, नैवेद्य (आरती), प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प. हे पूजेचे षोडष उपचार आहेत. 
 
मानस पूजा : कोणत्याही बाह्य सामग्रीचा किंवा उपचारांचा आधार न घेता मनानेच, मनातल्या मनात, मनोभावे करावयाची पूजा म्हणजे मानसपूजा. इष्टदेवता किंवा आपले गुरु यांची अशा प्रकारे मानसपूजा केली जाते. पण वरवर वाटते तितकी ही पूजा सहज सोपी नाही. गुरुकृपा किंवा नित्य साधना यामुळे ज्यास आपले ध्यान केंद्रित करता येते किंवा ज्याला मनाची एकाग्रता सहज साधता येते त्यांनाच ही पूजा शक्य असते. मुख्य म्हणजे या पूजेत समोर कोणतीही मूर्ती किंवा दृश्य देवता नसते. डोळे मिटून आपल्या मनात इष्टदेवता किंवा गुरुमूर्ती डोळ्यांपुढे स्पष्ट आणायची असते व आपल्या उपास्य देवतेच्या सचेतन स्वरूपाची मनातल्या नानातच पूजा करायची असते. 
PC:google
Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu