आषाढस्य प्रथमदिवसे ©मुकुंद कुलकर्णी

आकाशात गडद काळ्या ढगांची गर्दी झाली , सौदामिनी कडकडू लागली की , आम्हा सामान्यजनांना गरमागरम कांदाभजी आणि वाफाळलेला चहा आणखीन काही …. आठवते , तिकडे तो महाकवी कालिदासांचा नायक यक्ष आपल्या प्रियतमेच्या विरह व्यथांनी व्याकूळ होतो आणि जन्माला येते एक महाकाव्य ‘ मेघदूत
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ||

महाकवी कालिदासांची अमर रचना मेघदूत या महाकाव्यातला हा अप्रतिम श्लोक . विरहव्यथेचे अत्यंत उत्कट वर्णन म्हणजे हे महाकाव्य . आकाशात गर्दी करणाऱ्या , गंडस्थळाने प्रहार करायला सज्ज असलेल्या मदमस्त गजराजाप्रमाणे भासणाऱ्या , दाटणाऱ्या मेघांना पाहून कालिदासांच्या मनातील विरहव्यथाही उफाळून आल्या . आणि वर्षाऋतूच्या या अग्रदूतांनाच आपल्या संदेशाचे दूत बनवले कालिदासांनी . महाकवी कालिदासांची प्रतिभा किती विलक्षण अद्भुत आणि रोमँटिक आहे !

घन घन माला नभी दाटल्या , कोसळती धारा
केकारव करी मोर काननी , उभवून उंच पिसारा

कालिंदीच्या तटी श्रीहरी , तशीच घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो , ओल्या अंधारा

वर्षाकालिन सायंकाळी , लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठीस लागे , भिरभिरता वारा

कृष्णविरहिणी कोणी गवळण , तिला अडविते कवाड अंगण ,

अंगणी अवघ्या तळे साचले ,भिडले जल दारा

ग दि मा

गदिमांच्या या विरही गवळणीचीच भावविभोर विरहावस्था झाली आहे महाकवी कालिदासांच्या मेघदूत या खंडकाव्याच्या नायकाची , यक्षाची !

आषाढ म्हणजे वर्षाऋतूची सुरुवात , अंगाची लाहीलाही करणारा तप्त उन्हाळा संपून पावसाची चाहूल लागते . आसमंतात क्षणात उन , क्षणात सरसर धावणारे काळे ढग यांचा लपंडाव सुरू होतो . हवेत किंचितसा अल्हाददायक गारवा , म्हटलं तर पाऊस , म्हटलं तर ऊन असं वातावरण . काहीसा मनाची घालमेल वाढवणारा माहोल . अशा या अवस्थेत विरही प्रेमिकाचं मन सैरभैर झालं नाही तरच नवल . क्षितिजरेषेवर आक्रमकपणे चालून येणाऱ्या गर्द निळ्या मेघांना बघून मनात उठणारं काहूर , प्रतिभासमृद्ध महाकवी कालिदासांच्या लेखणीतून मेघदूत हे महाकाव्य बनून अवतरलं . महाकवी कालिदासांच्या ” आषाढस्य प्रथमदिवसे ….. ” या ओळी अजरामर झाल्या आहेत .आषाढाचा पहिला दिवस जणू या महाकवीला समर्पित करण्यात आला आहे . आषाढ , मेघदूत आणि कविश्रेष्ठ कालिदास यांचं गारुड रसिक जनमानसावर अमिट राहणार आहे .

रघुवंशम् , कुमारसंभव , ऋतूसंहार या सारखी महाकाव्ये , अभिज्ञानशाकुन्तलम् , विक्रमोर्वशीयम् , मालविकाग्नीमित्रम् या सारखी अभिजात वाड़्मयनिर्मिती करणाऱ्या महाकवी कालिदासाची अनुपमेय रचना मेघदूतम् . विरहिणीच्या सर्व लक्षणांनी समृद्ध आहे मेघदूत . कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेला मेघांचा प्रवास हा तर अद्भुत चमत्कारच आहे . त्याची भौगोलिक अचूकता , पर्जन्यमानाचे अचूक वर्णन हे तर स्तिमित करणारे आहे . आजही विज्ञानाच्या कसोटीवर ते खरे उतरते . हा विलक्षण चमत्कार कालिदासांनी कसा साधला असेल हे कल्पनातीत आहे . उज्जैनीचा सम्राट राजा विक्रमादित्य याच्या दरबारातील महाकवी कालिदास केवळ महाकवीच नाही तर , वैज्ञानिक सुद्धा होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही .

पत्नीविरहाने व्याकूळ झालेला यक्ष हा मेघदूताचा नायक आहे . पण , प्रेमसंदेश घेऊन जाणारे मेघच या महाकाव्याचे नायक आहेत . आपल्यापासून सहस्त्र योजने दूर हिमालयातील अलकेमध्ये असलेल्या आपल्या पत्नीचा , यक्षिणीचा विरह रामगिरीस्थित यक्षाला , कुबेराच्या शापाने सहन करावा लागत आहे . या शापामुळे समस्त सिद्धी हरपलेला व्याकूळ यक्ष आपल्या प्रियतमेला भेटू शकत नाही . कामीजनांना अत्यंत पीडा देणाऱ्या वर्षाऋतूच्या आगमनाने यक्षाच्या प्रेमभावना उचंबळून आल्या . मग तो , आषाढातील आकाशात एखाद्या विराट मदमस्त गजाप्रमाणे भासणाऱ्या मेघांना आपल्या प्रियेपर्यंत आपला संदेश घेऊन जाणारे दूत बनवतो आणि साकारतं जगद्विख्यात खंडकाव्य मेघदूत .

आज आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूत या खंडकाव्याचे स्मरण !

महाकवी कालिदासांच्या अलौकिक दिव्य प्रतिभेला माझ्या श्रद्धेची ही छोटीशी ओंजळ !

तप्त धरित्रीला लागते ,
घनघोर वर्षावाची चाहूल
हिरवाळी व्यापून उरते ,
निळ्यासावळ्या मेघःश्यामाची रानभूल .

©मुकुंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu