न्यू इंडिया ऍश्‍युरन्सचा डिसेंबरमध्ये आयपीओ

नवी दिल्ली: सार्वजनिक विमा कंपनी न्यू इंडिया ऍश्‍युरन्सची शेअर बाजारात लवकरच नोंदणी होणार असून डिसेंबरअखेरीस कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) पार पडेल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.”बाजारातील परिस्थिती अनुकूल राहिली तर या कॅलेंडर वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीचा आयपीओ दाखल होण्याचा अंदाज आहे”, असे न्यू इंडिया ऍश्‍युरन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी श्रीनिवासन यांनी सांगितले.

कंपनी लवकरच भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे अर्ज दाखल करणार आहे; मात्र त्याची नेमकी तारीख श्रीनिवासन यांनी स्पष्ट केली नाही. सध्या केंद्र सरकारची कंपनीत 100 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीला सरलेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 1,008 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दरम्यान, कंपनीचे हप्ता संकलनाचे प्रमाण 27.17 टक्‍क्‍यांनी वधारुन 19,115 कोटी रुपयांवर पोचले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पीय भाषणात सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे विमा कंपन्यांनी शेअर बाजारात येण्याची तयारी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu