फॅशन ट्रेंड्स खास नवरात्रीसाठी
रंगीलो मारो घागरो…. असो किंवा कुकडा तारा ढोल… असो सळसळत्या उत्साहात गाण्यांच्या तालावर नाचत , गरबा, दांडिया खेळत नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहाला उधाण आलेले असते. नऊ दिवस रंगांची उधळण असते. मग ते रंग रंगी बेरंगी घागरा चोळी चे असोत वा त्यावर घालणाऱ्या दागिन्यांचे ! हे सगळे आपल्या जीवनातही रंग भरतात. यावर्षीही बाजारात आलेल्या नवीन ड्रेसेस व दागिन्यांचे ट्रेंड खास तुमच्या साठी. नवरात्रीत खेळला जाणारा गरबा दांडिया हे गुजरातचे नृत्यप्रकार असले तरीही ते महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय आहेत.या दिवसांमध्ये दांडिया खेळायला जाताना ९ दिवस रोज नवीन साज शृंगार करावा म्हणून खूप आधीपासूनच तरुणाईची तयारी सुरु होते.तरुणाईच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी बाजारपेठाही सज्ज होतात.पण महागडे कपडे व दागिने घेण्यापेक्षा आपल्या आवाक्यात बसतील असे काही सुंदर मिळते का अशी शोधाशोध सुरु होते. यासाठीच यंदाच्या नवरात्रोत्सवाचा ट्रेंड जाणून घेऊया ……
– नवरात्र म्हटले कि वर्क केलेले वेगवेगळ्या डिझाइन्सचे घागरा चोळी बाजारात बघायला मिळतात.त्याप्रमाणे या वर्षीही वर्क्सच्या ड्रेसेसची फॅशन आहे. साधारणत: २५० रुपयांपासून १०- १२ हजार रुपयांपर्यंत कपडे व दागिने बाजारात उपलब्ध आहेत.
– या वर्षी घागरा चोळी कॉटन, शिफोन, आणि पारंपारिक बांधणीच्या कपड्यांमध्ये मिळते आहे. तर पुरुषांमध्ये केडिया , धोती , पटियाला असे प्रकार दिसत आहेत.
-वर्क मध्ये जर्दोसी वर्क टिकल्या लावलेले व रात्री चमकणारे वर्क केलेल्या चनिया चोलींना कवडी वर्क केलेल्या चनिया चोळी पेक्षा जास्त पसंती मिळते आहे. कारण कवडी वर्क केलेले चनिया चोळी जास्त वजनदार असतात. गरबा खेळताना ते वजन सांभाळणे थोडे कठीण जाते.
– सिल्क , सुती अशा कपड्यांमध्ये हि विविध नक्षीकाम केलेले , भरत काम केलेले ६० ते ८० कळ्यांचे घागरे ही सध्या ट्रेंड मध्ये आहेत.
– ऑक्सिडाइजचे दागिने , सिल्वर प्लेटेड दागिने , व्हाईट , मल्टी कलर चुडा सध्या बाजारात भरपूर प्रकारात उपलब्ध आहेत.
या सगळ्या गोष्टी मुंबईत तुम्हाला प्रत्येक उपनगराच्या मार्केट मध्ये तर मिळतीलच पण दादर ,घाटकोपर, विलेपार्ले , कांदिवली , लिंकिंग रोड अशा ठिकाणी तर पुण्यातही अनेक ठिकाणी सहज मिळतील . पण भरपूर घासाघीस करायला मात्र विसरू नका.
फॅशन ट्रेंड जरा हटके …
जर तुम्हाला घागरा चोळी असा पारंपारिक ड्रेस घालायचा नसेल तर सरळ जीन्स घाला पण त्याच्यावरती वर्क केलेला बांधणीचा किंवा डिझाइनर कुर्ता घाला आणि ओढणी घ्या. त्याच्यावर दागिने म्हणून ऑक्सिडाइजच्या माळा, झुमके , मांग टीका आणि हातात व्हाईट चुडा घाला बघा कसा ट्रेंडी लुक येईल तो. शिवाय खेळायलाही कम्फर्टेबल वाटेल.