कथा – शक्कल

आज रविवार, फॅक्टरीची बांधिलकी नाही. मशीन शॉपमधील यंत्रांचा खडखडाट नाही. कामगारांचा गलगलाट नाही, ऑफिस स्‍टाफची लगबग नाही. सार कसं शांत. काल रात्री आलेले सगळे मेल्स शांतारामकडे फॉरवर्ड केलेले. आवश्यक त्या सुचना केल्यात, तो बघेल काय ते.

      मी आज मुक्‍त, निवांत, सर्वप्रथम अभ्यासिकेत जावून भरपूर वाचन करणार. नंतर सारा वेळ विनीसाठी राखून ठेवलाय ब्रेन वॉशिंग करावं लागणार आहे, डोक्यावरच तिचं भूत उतरवायचय, खूळ शिरलय तिच्या डोक्यात. कोण्या एैऱ्यागैऱ्या मित्राशी सलगी करुन मैत्री वाढवत त्याच्याशी पार लग्न करण्याच्या अतिरेकी विचारात ती वावरत आहे. तिने ओढवून घेतलेल्या संकटातून तिची तुक्‍तता करावीच लागणार.

      मुळात माझी विनी मोठी गोड, लाघवी, थोडी अल्लड, खोडकर आणि थोडीफार आततायी देखील आहे. एखादी गोष्ट तिच्या डोक्यात शिरली की त्याची शहनिशा करुन विनीला मूळ पदावर आणायचं कसब मला साधलयं हे माझ भाग्य…

      आपला सोन्यासारखा संसार मोडायचा अन् गेली बारा वर्षे साथसंगत करणाऱ्या मनस्वी जोडीदाराला सोडून परक्याबरोबर जाण्याचा दळभद्री  विचार तिच्या मनात कसा कोठून आला. याचा शोध घ्यायचाय.

      संघर्षाने भरलेल्या जगात हळवं होऊन चालत नाही. फणस पडल्याचा आवाज ऐकून आभाळ कोसळल्याच्या  भितीनं धावत सुटणाऱ्या सशासारखा हा हळवेपणा असतो.
अभ्यासिकेत  शिरुन निवांतपणे वाचनाला आरंभ करणार तोच दार लोटून विनी खोलीत शिरली. माझ्या समोरच्या मेजवर बसून तिने आरंभ केला.  

      ‘‘श्री, तू कसाही असलास तरी सुसंस्कृत आहेस, समंजस आहेस, तुझ्याजागी दुसरा कुणी असता तर त्याने डोक्यात राख घालून घेतली असती.’’

      ‘‘विनीने केलेल्या उपऱ्या कौतुकाआड उच्चारलेले ‘‘तू कसाही असलास’’ हे शब्द मला फारसे रुचले नाहीत. तरीदेखील माझा चेहरा मी निर्विकार ठेवला.

      आपण तिघांनी एकत्र येऊन शांतपणे चर्चा करण्याची तुझी कल्पना खरोखर सॉलीड आहे. तुझा खिलाडूपणा मी मान्य करते. अर्थात त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही हे या क्षणी मी ठामपणे सांगते.

      ‘‘काहीच निष्पन्न होणार नाही? मी वेडेपणाचे सोंग आणले.’’

      ‘‘उगाच वेड पांघरु नको, यापुढे आपण एकत्र राहू शकत नाही हे तुला देखील ठाऊक आहे. ‘‘का राहू शकत नाही आपण एकत्र? सर्वकाही ठाऊक असूनही मी वेडेपणाचं नाटक चालू ठेवलं.’’

      ‘‘कारण आपण विभक्‍त होणार आहेत. यापुढे आपण एकोप्याने संसार  करणे अशक्य. मी तुला सोडून जाणार हे नक्की.’’

      ‘‘विनी तू क्षमाशीलं आहेस, विचारशील आहे, नि:पक्षपाती आहेस. तुझं मन निश्चितपणे तुला योग्य कौल देइल अशी मला अशा आहे’’   

      ‘‘फोल आहे तुझी आशा. आपण परत एकत्र येऊ याची मला सुतराम शक्यता वाटत नाही. खरंतर तुला दुखावण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये. पण माझा नाईलाज आहे. विशुशिवाय मी जगूच शकणार नाही. तुझ्याकडून घटस्फोट मिळवल्याशिवाच मी विशुशी लग्न करणार कशी?

      ‘‘थोडक्यात तुला सारं संपवायचंय आपल्या नात्याला सुरुंग लावयचाच, माझ्याविषयी थोडीदेखील ओढ शिल्लक राहिलेली नाही तुझ्या मनात’’ माझी लटकी मनधरणी.

      तसंच काही नाही रे श्री, तू माझा शत्रू नाहीस. अजूनही आपलेपणाचा अंश शिल्लक आहे. पण विशु, विश्वनाथ माझा सर्वस्व आहे. तो माझ्या आयुष्यात आपल्यापासून मी खुळावले आहे, स्‍वप्नील अवस्थेत मी वावरते आहे.’’ ‘‘तुझा त्याग करण्याखेरीज मला दुसरा पर्याय नाही श्री.’’

      ‘‘एके काळी मी देखील तुझा अधाखड होतो, सर्वेसर्वा होतो हे लाडिकपणे सर्वांना बोलून दाखवायचिस’’ तू! मी कडवडपणे म्हणालो…

      ‘‘होतास ना, मी कुठे नाकरत्येय,’’ जरादेखील कटुता न दाखवता विनी म्हणाली ‘‘पण तुझ्याविषयी मला जसं वाटयचं ना, तसंच, थोड अधिकच विशुविषयी मला वाटू लागलय, त्याला तू आणि मी तरी काय करणार?’’ भावनांवर नियंत्रण ठेवायला आपण ऋषीमुनी थोडेच आहोत.’’ माझी आयुष्याभराची सहचारी साडी बदलावी तसा तिचा नवरा बदलू पहात होती. कमालीच्या निर्विकारपणे संसार उधळणच्या गोष्टी बोलत होती.

      कोण कुठला विश्वनाथ, अवघ्या विश्वाशी प्रतारणा करीत तिचा नाथ होऊ पहात होता. या नाथाला चराचर विश्वात फक्‍त माझी बायकोच दिसली.

      ‘‘चहा घेऊया का’’ माझ्या विचारकल्लोळातून मला जागे करीत विनी म्हणाली. मी मठ्ठपणे तिच्याकडे पहात राहिलो.     

      ‘‘नाहीतर विशुला येऊ दे, येईलच तो एवढ्यात.’’ चहाचे घोट घेत घेत आपण निर्णायक चर्चेला आरंभ करुया.’’ एखाद्याच्या नरडीचा घोट घेण्याच्या अविर्भावात विनी बोलत होती.

      कोण्या उपऱ्याने टाकलेल्या प्रेमाच्या जाळ्यात विनी गुंतत चालली होती. ही गुंतवळ सोडविणे आवश्यक होते. दरवाजावरील बेल वाजताच अल्लडपणे उड्या मारीत विनी दाराकडे धावली.

      ‘‘शंभर वर्षे आयुष्य आहे तुला ।। दारात उभे ठाकलेल्या उपऱ्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकीत विनी म्हणाली. ‘‘अरे तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही… तुझी ओळख आधी करुन देते. श्री, विशु, माझा जिवलग मित्र, आणि विशु हा माझा नवरा श्री? बारा वर्षे उलटली आमच्या लग्नाला.’’

      ‘‘बाराखडी पुरे, बसा’’ मी कोरडेपणाने म्हणालो . बसता बसता हस्तांदोलनाही त्याने हात पुढे केला, मी हात आखडते घेत माझा पवित्रा जाहीर केला. मला सारा प्रकार किळसवाणा वाटला. माझ्या डोळ्यादेखत माझ्या बायकोवर हक्क सांगणाऱ्याची त्या क्षणी तिडिक वाटली. समंजसपणा, सुसंस्कृतपणा, खिळाडूवृत्ती आदि गोंडस शब्दाची झूल पांघरून  वावरणाऱ्या माझ मलाच हसू आल.

      काहीतरी जालीम उपाययोजना  करणं आवश्यक होते. कोण तो विशु त्याचं वस्‍त्रहरण करुन त्याला जमालगोटा देणं जरुरींच होतं. एवढ्यात विनी स्वत: चहा घेऊन आली.

      ‘‘विशु तुझ्या कपामध्ये साखर जास्त टाकलीय. तुला गोड चहा लागतो म्हणून’’ विनी लाडिकपणे म्हणाली, त्या भामट्याच्या आवडीनिवडी जपण्याइतपरत विनीची मजल गेली होती.

      ‘‘मला वाटतं ज्या कामासाठी जमलो आहोत  त्या कामाला आरंभ करुन या का? विनीकडे पहात मी त्रासिकपणे म्हणालो.

      ‘‘अवश्य ! शुभश्य शिघ्रम’’ विनी टाळ्या पिटत म्हणाली. माझ्या थंडपणामुळे मात्र त्या भामट्याचा गोंधळ उडालेला दिसला. ‘‘ठीक आहे मी तयार आहे’’ चहाचा कप टेबलावर ठेवत तो सावरुन बसला.

      ‘‘असं पाहा, माझ्या मालकीची खास वस्तु, नव्हे, चक्क माझी बायको तुला हवीय आणि अर्थातच ती देण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे प्रश्न उभा राहतो. विनीकडे पहात मी सहेतुकपणे मी म्हणालो. भामट्या चपापलेला दिसला.

      ‘‘प्रश्न? कसला प्रश्न?’’ विनीकडे पहात त्याने विचारले.

      ‘‘सोपं आहे अगदी, श्री आणि मी आधी घटस्फोट घेऊ, त्यानंतर विशु आपण लग्न करु. आहे काय त्यात विनी झटक्यात बोलून मोकळी झाली.

      ‘‘करेक्ट, पण याला खूप वेळ लागेल. एखादा शॉर्टकट नाही का? लग्नासाठी उतावीळ झालेला उपरा बोलला.

      ‘‘गुडघ्याला बाशिंग बांधण्यापूर्ती आधी स्वत:बद्दल सांगशील? कोण? कुठला? काय करतोय? सगळी माहिती उघड करुन सांग.’’ 

      ‘‘सांगतो ना. आम्ही कोल्हापूरचे, कोल्हापुरात आमची मोठी शेती आहे. माझे वडील, काका, थोरले बंधु, पुतणे शेतीची काम करतात, गोठ्यातल्या गाई-म्हशीच्या मुबलक दूधावर दूधाचा धंदा जोरात चालतो. आपली दुधाची डेअरी देखील आहे. कुटुंबाचा मोठा बारदान असल्यामुळे मनुष्यबळ कमी पडते.’’

       ‘‘अन् तुझ्यामधील स्वबळाचं काय? ते कुठे खर्ची घातलं’’ का ढिवाळ काढलं स्वबळाचं?

      ‘‘छे, छे, शेतीच्या  चिखल मातीत अन गोठ्यातल्या शेणामुतात हात बरबटून  घ्यायची माझी मुळीच इच्छा नाही. मी कलासक्‍त माणूस आहे. माझ्यातल्या कलाकाराची जोपासना करणे. कलागुणांना विकसित करणे हीच माझी ध्येयासक्‍ती आहे.

      ‘‘सॉलीड यार ! विशु ग्रेट. मला तुझा अभिमान वाटतो’’ विनीचे कौतुक उफाळून आले.

      ‘‘मग कुठे कुठे उधळले गूण?

      ‘‘सांगतो ना, माझ्यातील कलागुणांची, अभिनय सामर्थ्यांची नोंद घेणारे, मला प्रोत्साहन देणारे कोल्हापुरात कुणीच नव्हते. पर्यायाने माझा कोंडमारा होऊ लागला.

      एखादा माणूस स्वत:बद्दल बोलताना कितीही प्रामाणिकपणे बोलत असला तरी त्यातले सत्य हे धुक्यातून दिसणाऱ्या उन्हासारखं अंधुक होण्याचा संभव असतो. ‘‘माझं घरातल्यांशी पटेनासं झालं. दुरावा वाढीस लागला. शेवटी व्हायचं तेच झाले. एके दिवशी माझा बाडबिस्तरा उचलून पुढील शिक्षणासाठी इथं मुंबईला माझ्या मामाकडे मला पाठविण्यात आले.’’ मुंबईत शिक्षणाबरोबर नाट्यसाधना सुरु झाली. मुंबई म्हणजे नाटकवाल्यांचे शहर. इथल्या रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकार नावारुपाला आले. पडद्यामागच्या हरहुन्नरी कलाकरांपासून रंगकर्मी, स्थिरावलो. माझ शिक्षण चालूच होतं. नाट्यशास्त्रातील धडे गिरविताना ‘नाटक’ हेच माझ ध्येय निश्चित केलं होतं.

      ‘‘विशु तू किती छान बोलतोस, ‘पुढे काय?’’ इति विनी.

      ‘‘कौतुक पुरे. ‘पुढे काय?’’ मी वैतागून म्हणालो.

      ‘‘ शिक्षण पूर्ण होताच. एका थोर कलावंताच्या आशिर्वादाने माझा दुरदर्शन केद्रात प्रवेश झाला.

      ‘‘कामसू वृत्तीने मी दुरदर्शनच्या विविध विभागात काम करु लागलो, पार कपडेपटापासून फटपार पोऱ्यापर्यंत.’’

      ‘‘दुरदर्शन कल्लोळ छान ! आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास’’ माझी फिरकी.

      श्री, दुरदर्शन कल्लोळ नव्हे दूरदर्शन वेल्हाळ म्हण.’’ विनीने पुस्ती जोडली.     

      खरंच मेहनती गुणाजनांना दूरदर्शनवर मोठी संधी आहे. नावारुपात येण्याची शाश्वती आहे. दुरदर्शनवरील वेगवेगळ्या विभागांत काम करतांना माझ्या कष्टांच फळ मिळून सार्थक झाल्यासारखं वाटलं. हातात. पैसा खेळू लागला.

      ‘‘तो कसा? मी अधीरतेने विचारलं. माझा नेम योग्य ठिकाणी लागत होता. मासा गळाला लागण्याच्या बेतात होता.

      दुरदर्शनवर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना फावल्या वेळात मी दुरदर्शन मालिकेत जाहिरातील अनेक विनोदी कार्यक्रमात, नृत्य, गायन, वाद्य वादनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गुणवान तरुण तरुणींची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. आता सांगायला हरकत नाही. पण अशाच एका कार्यशाळेत विनीचा नि माझा परिचय झाला. विनीमध्ये अभिनयाची जाण असल्याचे मला जाणवले. मला तिच्यामध्ये मोठा स्पार्क दिसला.’’

      ‘‘अभिनयाचा स्पार्क आणि माझ्या बायकोमध्ये? कदाचित पैसेवाल्या स्त्रिचा स्पार्क दिसला असेल तिच्यामध्ये. मी सावधगिरीने खडा टाकला. येस, बरोबर ओळखलस श्री, विशुने मला त्याच्या कार्यशाळेतील फायनान्सरची ऑफर दिली. ती आनंदाने स्विकारल्यावर त्याचक्षणी विशुने मला दुरदर्शन मालिकेतील भूमिकेकरीता सिलेक्ट केलं.’’ विनीचा भांडाफोड.

      अखेर माझा खडा बरोबर लागला. विनीने भाबडेपणात नकळत तिच्या मित्राच्या भ्रष्टाचाराचा धंदा उघडकीस आणला होता. धनाढ्य, श्रीमंत घराण्यातील सावजांना जाळ्यात ओढून दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे गाजर दाखवायचे अन् मोठमेठ्या रकमेच्या मोबदल्यात दुरदर्शनवर झळकविण्याचे अमिष दाखवत झुलवत ठेवायचे. परस्पर देवाणघेवाण अन् खुशीचा मामला. तेरी भी चूप अन मेरी भी चूप, असा सौदागिरीचा मामला विनीच्या भामट्या मित्राने थाटला होता.

      आपण एकमेव निर्दोष व्यक्‍तीमत्वाचे, आपल्या हातून कसलेही पापकर्म, कधी कसली चूक घडली नाही अश्या अहिम धुंदीत तो भामटा वावरत होता. त्याला पाप-पुण्याची संकल्पनाच मान्य नसावी.

      ‘‘माझ्या विनी खेरीज त्या नीच माणसाच्या फसवेगिरी यंत्रणेत आणखी किती तरुणाई भरडली गेली असेल याचा विचार येऊन मी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरुच ठेवली.

      तुझ्या कार्यशाळेत दाखल झालेल्या नक्की किती तरुण तरुणींना दुरदर्शनवरील विविध कार्यक्रमामधून झळकण्याची तू संधी मिळवून दिलीस?’’

      ‘‘ते मी कसे सांगणार? तो माझ्या कार्यशैलीचा भाग आहे आणि दुरदर्शनवर झळकण्याऱ्या प्रत्येक अभिनेता व अभिनेत्रीचं रेकॉर्ड मी कशासाठी ठेऊ? भामटा सावधगिरीने बोलत होता.

      ‘‘अच्छा, माझ्या बायकोशी विवाह करुन तुझ्या कार्यशाळेला काय मोठं डबोलं मिळणार होतं?

      ‘‘ते तुमच्या विनीलाच विचारा.’’        

      ‘’बरोबर आहे श्री. मी त्याची फायनान्सर आहे, कार्यशाळेची भागिदार आहे, मला विचार ना?

      माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. विनीच्या श्रीमंतीवर डोळा ठेऊन तिच्या पैशांवर डल्ला मारण्याचा त्या हरामखोराचा विचार होता. माझा संयम संपला होता. मी त्याला फैलावर घेण्यास सुरुवात केली.

      आतापर्यंत शांतपणे मी तुझं ऐकून घेतलं. आता मी बोलणार, तू ऐकायचंस, समजलं? घटस्फोट आणि लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला तुम्हाला? कायद्यान घटस्फोट मिळायला सहा महिन्याचा अवधी लागतो. या सहा महिन्यात मी तुला आयूष्यातून उठवणार आहे. होत्याच नव्हतं करणार आहे. लक्षात घे.

      विनी गांगरली होती. तो देखील हादरला होता…म्हणजे काय? तो चाचरत म्हणाला. ‘‘कळेल लवकरच. सर्वप्रथम मला तुझी कार्यशाळा बघायचीय. तिथलं वातावरण, कार्यपद्धती, वितरण/भावी  कलाकरांना भेटायचय. सर्वाची कसून तपासणी करणार आहे मी.’’ तुमचा काय संबंध? तो अधिक बावचळला. ‘‘अरे तू माझ्या बायकोशी लग्न करणार ना? मग ती राहणार कुठे ? जगणार कशी ? या गोष्टींची शहानिशा करायला नको? मला माझ्या बायकोला वाऱ्यावर सोडायचं नाही. आता माझ्या मालकीच्या इतर गोष्टी कुठल्या ते नीट ऐक’’ माझी बायको विनीसह मुंबईमधील हा माझा राहता बंगला. गेल्या पंधराविस वर्षात भरभराटीला आलेली माझी फॅक्टरी, माझ्या नावे असलेली इतर स्थावर जंगम इस्टेट, माझ्या फॅक्टरीतील कामगारानां भरपूर पगारासह मिळणाऱ्या सोयीसवलती, सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंत वर्गातून माझ्या बायकोला मिळणारी प्रतिष्ठा. समाजातील सर्व स्तरांमधून. उदाहरणार्थ व्यापारी, समाज सेवा संस्था, समाज उपयोग संस्था यामधून असलेला तिचा समावेश, क्लब, पार्टी, शॉपिंग, गेट टु गेदर यामधून होणारा तिचा वारेमाप खर्च आणि इतर चैनीच्या गोष्टी. या उलाढालींचा गोष्टींचा तू विचार तरी करु शकतोस का?’’

      ‘‘हे बघ.’’ उत्तम वेव्हारे धन जोडावे’’ हे काम करता करता त्या ऐश्वर्याचा एकला धनी मी कधीच झालो नाही. माझ्या अन माझ्या बायकोचा सहभागात तिचा एकेक क्षण. सुखाचा कसा जाईल याची दक्षता मी घेत राहिलो.’’

      माझा अन विनीचा घटस्फोट झाला तर त्याची पैशाची आवक बंद होणार. तिच्या वारेमाप खर्चाला कात्री लागणार. मग तुझ्या कार्यशाळेला पैसा कुठून मिळणार? कोण देणार? तूच सांग.

      माझा निर्णय ऐकून विनीच्या पायाखालची जमीन सरकली असावी बहुधा. अतिशय केविलवाण्या स्वरात विनी म्हणाली. ‘‘विशु कस होणार रे आपलं? काय ठरवलंस तू? तिच्या मित्राचा पार नंदीबैल झाला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता त्याचा. गर्भगळीत झालेला मित्र म्हणाला.

      ‘‘सारीच गणितं चुकली. मला वाटलं लग्न झाल्यानंतर तुझी संपत्ती, प्रॉपर्टी, तुझ जे काही ऐश्वर्य आहे ते सर्व आपल्याला मिळेल. कार्यशाळेचा भांडवल मिळेल. अन् आपण सुखात राहू. एरव्ही मामांकडे पेईंगगेस्‍ट म्हणून राहताना मी भांडवल आणि इतर सर्वांची व्यवस्था कुठून करणार.’’

      ‘‘अस्स ! म्हणजे तुझ्या आवाक्याबाहेर असलेल्या दुरदर्शनच गाजर दाखवित, माझ्यासाठी मनोरंजनाच्या पायघड्या घालीत तू माझी दिशाभूल करीत होतास. आणखी कितीजणांना तू तुझ्या नादी लावलंस? मी अस्सल मुंबईकरीण आहे हे लक्षात ठेव. मनात आणलं तर तुझी पळता भुई थोडी करेन. विनी चवताळून बोलली.

      ‘‘विनीच्या रागाचा पारा तर ती काय करुन शकते याची मला कल्पना होती म्हणून तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याच्या उद्देशाने मी त्या भामट्याला जरबेच्या स्वरात म्हणालो, ‘‘तुझं आयुष्य बरबाद होऊ नये. तू रस्त्यावर येऊ नयेस असं वाटत असेल तर दूरदर्शनच्या नावाखाली फसवणुकीचे तुझे उद्योग बंद कर. अन्यथा टी.व्ही. क्षेत्रातील अधिकारी तुझा पक्का बंदोबस्त करतीलच. मुंबईतल्या धनिक वर्गातील मंडळी तुझे नामोनिशाण शिल्लक ठेवणार नाहीत. पोलिसांचा ससेमिरा एकदा पाठीमागे लागला कि तुला जगणं कठीण होईल.’’

      ‘‘चालता हो इथून…जस्ट गेट आऊट’’ भामट्याकडे जळजळीत नजरेने पहात विनी आत निघून गेली. माझ्या दृष्टीनं सारं ऑल बेल झालं होतं. पुढे सारं सोपं होतं. माझ्या नि विनीच्या शाब्दिक माऱ्याने अर्धमेला झालेला भामटा खाली मान घालून डोकं गच्च धरुन बसला होता.

      ‘‘उठ, मी सभ्यतेचा आव आणित म्हणालो, हे बघ तू चांगल्या घरातला दिसतोस. मी किंवा माझी बायको तुझ्यावर कसलाही कायदेशीर कारवाई करणार नाही. पण आम्ही सतर्क रहाणार आहेत. इत:पर आम्हाला किंवा कुणालाही तुझ्या गुन्हेगारी करावयाचा दर्प जरी आला. कि तू संपलास म्हणून समज. लक्षात घे, ज्याला माळरान तुडवावयाचं त्यानं राजरस्‍त्याची स्वप्ने पाहू नयेत.

      ‘‘होय सर,’’ माझ्या पायांना स्पर्श करुन तो तडक बाहेर पडून चालू लागला. गालातल्या गालात हसत मी देखील आत निघालो. विनीला खूष करण्यासाठी तिला लाँग ड्राईवर न्यायच होतं…तिच्या दु:खावर पांघरुण घालायच होत. पोर्चमध्ये गाडी तयार करुन शोफर आमची प्रतिक्षा करीत होता.

अरुण सावळेकर

१३६, नारायण पेठ, सीताफळ बाग कॉलनी,

पुणे – ४११ ०३०.

भ्रमणध्वनी : ९८२२४ ७०७२२

निवास : ०२०-२४३५५०       

PC:google

Main Menu