गुलाल उधळीला जणु !

आम्ही वीस माणसे कलकत्त्याहून जलपायगुडी येथे आलो. डोशांचा भरपूर समाचार घेतला. चहा पिऊन दार्जीलिंग येथे जाणाऱ्या गाडीमध्ये बसलो, छोटी गाडी, रेल्वेच्या रुळांच्या अगदी जवळून जाणारा बसचा रस्ता पाहून मजा वाटत होती.( खरे तर आराधना पिक्चर ने या गाडीला अमर केले आहे ) न्यू जलपायगुडी येथे आमच्या गाडीच्या प्रत्येक तीन डब्यांना एक इंजिन जोडले. एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या व त्या झुक झुक करत निघाल्या. लांब अंतरावरून दिसणाऱ्या धुरावरून आमच्या गाडीचा एखादा भाग कुठे आहे हे ओळखता येत होते.स्टेशनला प्लेटफोर्म असा नव्हताच. गाडी थांबायची,उतरून समोरच्या दुकानातून फळे आणेपर्यंत गाडी फुसफुसत थांबलेली असायची.खूप गम्मत वाटायची. चढण चढताना गाडी सरळ वळण न घेता , अर्धे वळण घेऊन अर्ध्या वळणावर उलट चालायची, अशी गम्मत तर कुठेच अनुभवली नव्हती.दोन्ही बाजूच्या उतारावरून चहाचे मळे आमच्या स्वागतास सिद्ध होते. त्या हिरव्या रंगात दंग असताना दार्जीलिंग पटकन आलेसे वाटले. आम्ही सामान घेऊन हॉटेल वर आलो. संध्याकाळी मेटाडोर्स ठरवण्यासाठी माणूस आला. येथे सूर्योदय लवकर होतो. तो म्हणाला ” मध्यरात्री २.३०. वाजता मी सर्वाना उठवीन, २ छोट्या मेटाडोर्स, ३ वाजता निघू या.रात्री चांदणे छान पडले होते . दरवाजा बंद करण्यापूर्वी बापूंनी समोर पहिले आणि पाहतच राहिले. म्हणाले , अग बघ हे कांचनगंगा शिखर अगदी आपल्या समोर आहे आणि आता चांदण्यात कसे न्हाऊन निघाले आहे ना ! ते दृश्य मनसोक्त पहिले. 

 पहाटे २.३० वाजता दार वाजले, उठलो. तोंड धुवून व स्वेटर घालून शालही पांघरून निघालो.ठीक ३.३० ला मेटाडोर्स एके ठिकाणी थांबल्या, उतरून पाहिले, खूपच गर्दी जमा झाली होती. हात कडकडत होते, फुंकर मारली तर तोंडातून वाफा निघत होत्या.दोन तीन चहाचे स्टोल्स होते. गरमागरम चहा सर्वांनी घेतला आणि कुडकुडत उभे राहिलो.ऑक्टोबर महिना पण खूपच थंडी होती. आकाश मात्र निरभ्र होते.

अरुण हसत हसत दोन्ही मुठीनी सगळीकडे गुलाल उधळीत होता. उंचावर,समोर, मागे , पुढे सगळीकडे जत्रेत किंवा मिरवणुकीत गुलाल उधळला की कसे धूसर धुलीकण दिसतात तसे दिसू लागले. मध्येच फक्कन फेकलेला गुलाल एकदम गुलाबी रंग, माझ्या, बापूंच्या, सर्वांच्या डोक्यावर गुलाबी धुलीकण. आम्ही अवघे गुलाबी रंगात रंगलो रे ही अवस्था झाली. सन्माननीय पाहुणे म्हणून उषा देवीने केलेले हे स्वागत इतके आवडले. १० मिनिटे सभोवतालचे सर्व आसमंत गुलाबी बनले. पूर्व दिशेने गुलाल उधळला ही अजून पर्यंत कविकल्पनाच वाटत होती .ती प्रत्यक्षात उतरलेली पाहून सानंद आश्चर्य वाटले. हळूहळू गुलाबी रंग कमी होऊन सोनेरी रंग आपली किमया दाखवू लागला. प्रसन्न मानाने सोनेरी सूर्याला नमस्कार केला. तेंव्हा कांचनगंगा शिखर आपले नावं सार्थ करीत सुवर्ण वैभव मिरवीत दिमाखाने उभे होते.

मद्रास येथील सूर्योदय, जेथे समुद्रातून सूर्य उगवताच सूर्यकिरण थेट आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, रामेश्वरचा सूर्योदय पूर्व दिशेला सप्तरंग वेगवेगळ्या रीतीने शोभतात., गुलाबी रंगाचा प्रभाव जास्त असतो.  कन्याकुमारीचा सूर्योदय , गुलाबी रंग पूर्व दिशेचे वैभव दाखवीत असताना, सूर्य हळूच डोकावतो. पण हा दार्जीलिंगचा अरुणोदय उंच डोंगरातून उदय पावत असल्यामुळे आपल्या अगदी जवळ उंचावर उभे राहून आपल्यावर गुलाल उधळतो. चार माजली इमारतीवरून दहीकाल्याच्या वेळी गोविंदा पथकावर बायका पाण्याच्या बदल्या फेकतात ना , तसे उषा देवी अरुण देवाकडून आपल्यावर मुठी-मुठी भरून गुलाल उधळते.

     हा अदभूतरम्य, अनोखा आनंद अनुभवण्यास रसिकहो, दार्जीलिंगला जरूर भेट द्या, कांचनगंगेची त्रिविध रूपे तुमच्या मनावर मोहिनी घालतील !     

सौ. केळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu