दीवाना हुआ बादल

Romance at it’s best . आजच्या पॕनडॕमिकच्या काळात आवश्यक असणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगपेक्षा जास्त डिस्टन्स पाळून चित्रित केलेलं , तेही शम्मी कपूरचं , एक अप्रतिम प्रणयगीत . साठ ते ऐंशीच्या दशकात अशी अगणित गाणी बॉलिवूडने रसिकांना पेश केली . राज नर्गिस , दिलिप वैजयंती , देव नूतन अशी अनेक कॉम्बिनेशन्स लगेच आठवतात . शम्मी कपूर हा आत्ममग्न ( चांगल्या अर्थाने ) कलाकार होता . नवोदित नायिकांसोबत तो बिनदिक्कतपणे चित्रपट स्विकारायचा . त्या चित्रपटांना उदंड यशही मिळायचं .सायरा – जंगली , शर्मिला – कश्मीर की कली ही सणसणीत उदाहरणं . शम्मी बऱ्याचदा अंडररेट होतो असं माझं प्रामाणिक मत आहे . काळाच्या पुढे असलेला भारी माणूस होता तो . त्याचा अभिनय आणि त्याची नृत्यं आजही तेवढीच टवटवीत आणि काल सुसंगत वाटतात .

असं म्हणतात की , शम्मी हा बॉर्न कोरिओग्राफर होता . गाण्याची सिच्युएशन , त्याचे काव्य , त्याचं संगीत , त्याची चालं , गायक .. बहुतेक तर त्याच्यासाठी रफीचाच आवाज असे . या सगळ्यांचा विचार करून तो आपल्या स्टेप्स ठरवायचा . कोरिओग्राफरचं काम म्हणजे त्याप्रमाणे त्याने नायिकेच्या स्टेप्स ॲडजेस्ट करायच्या . राज , देव , दिलिप या पहिल्या फळीतल्या आघाडीच्या त्रिमूर्तींची गाणी तर सुंदर होतीच , पण मला शम्मीची गाणी तितकीच आवडतात . काही गाणी किंबहुना त्यापेक्षा जास्तच . शम्मीची गाणी , नृत्यं हा नेहमीच प्रसन्न , आनंददायक अनुभव असे . त्याची स्वतःची अशी स्टाईल होती . दोन्ही हात डोक्यामागे घेत चुटकी वाजवत ऱ्हीदम पकडणे , बिली बाऊडन सिक्सरचा इशारा करायचा तसा तो हळूहळू उभा रहायचा . डोक्यावरची टोपी कपाळावर सरकावणे , मुलायम झुल्फे उडवणे , ग्लासात चमचा वाजवणे , गिटार , ट्रंपेट , सॕक्सोफोन , पियानो , क्लॕरिनेट ही सर्व वाद्ये त्याला शोभून दिसायची . त्याला संगीताची चांगलीच जाण होती . देशी , विदेशी कुठल्याही प्रकारच्या वाद्यासोबत तो कंफर्टेबल असायचा . चाहत्यांना वेड लावणारे त्याचे गिमिक्स ‘ लै भारी ‘ होते . शम्मी दोन्ही हात डोक्यावर मानेपाशी घ्यायचा तेंव्हा उजव्या हातात त्याचं घणसर ब्रेसलेट हमखास दर्शन द्यायचंच ! दोन्ही हात विमानाच्या पंख्यासारखे उडवत तो डौलदार पावलं टाकायचा तेंव्हा त्या काळातील पोरींचा कलिजा खलास व्हायचा . विचारा हवं तर आजच्या आज्या पणज्यांना ! शम्मीची विनोदाची जाण तर अप्रतिमच होती .

एवंगुणविशिष्ठ , सर्व वैशिष्ट्ये जपणारं कश्मीर की कली मधलं ‘ दीवाना हुआ बादल ‘ हे गाणं म्हणजे या सर्व गुणांचं उत्तम रसायन जमलेलं फक्कड गाणं . शर्मिलाचा हा पहिलाच सिनेमा . या सिनेमात ती जेवढी सुंदर दिसली , तेवढी सुंदर पुन्हा कधीच दिसली नाही . सौंदर्य , तारुण्य , उत्साह याचा एवढा सुंदर मिलाफ फार थोड्या गाण्यात पहायला मिळतो .
पृथ्वीवरील नंदनवनात चित्रित झालेलं हे प्रेमगीत म्हणजे सौंदर्य , निसर्ग सौंदर्य , दिलखेचक नृत्य , कर्णमधुर संगीत आणि गायन याचा सुरेख संगम . शिकाऱ्यामधे राजबिंडा शम्मी , छोट्या नौकेत शालीन सौंदर्यवती शर्मिला म्हणजे नेत्रसुखद अनुभव . तेवढंच महत्वाचं ओ पी नय्यर यांचं मेलोडियस संगीत , रफीसाहेब आणि एव्हरग्रीन आशाताई यांचा स्वर्गीय आवाज , एस.एच.बिहारी यांचं रोमँटिक काव्य आणखी काय हवं !
शर्मिलाचा पहिलावहिला चित्रपट असल्याने ती डायरेक्टर्स , कोरिओग्राफर्स गर्ल होती . हे गाणं एवढं अप्रतिम जमून जायचं हे ही एक महत्वाचं कारण असावं असं माझं प्रामाणिक मत ! चेहऱ्यावरील एवढे सुंदर नाजूक विभ्रम पुन्हा तिलाही जमले नाहीत . ती जसजशी स्थिरावत गेली , तसतसे ते लाऊड होत गेले . हे माझं वैयक्तिक मत , ते निखालस चूक असण्याची शक्यता नाकारता येणार नाही !
ओहोहो …. ओहोहो …… आहाहा …… म्हणत राजबिंडा शम्मी जेंव्हा अवतरतो तेंव्हाच एक सुंदर गीत बघायला मिळणार आहे याची खात्री पटते . सेल्फ कोरिओग्राफीच्या सगळ्या अदा शम्मी पहिल्या मिनिटातच पेश करतो . नाजूक पदन्यास टाकत हरीण शावका सारखी बागडणारी शर्मिला गोड दिसते . अतिशय साध्या आणि लयबद्ध स्टेप्स आहेत शर्मिलाच्या . ‘ क्या तुमने अदा पायी ‘ म्हणत आपल्या नटखट अदा दाखवणारा देखणा शम्मी मजा आणतो . छोट्याशा होडीला वल्ह्याचा नाजूक झटका देत दल लेकमधे जलविहार करणारी लावण्यवती शर्मिला जलपरीच भासते . ‘
‘ जीवनमे मची हलचल ‘ हे शर्मिलाच्या अदाकारीत बघताना आत कुठेतरी हलचल होते !
हाथोमें तेरा आँचल म्हणत शम्मी जेंव्हा शर्मिलचा आँचल पकडतो तो या रोमँटिक गाण्याचा उत्कर्षबिंदू म्हणायला हरकत नसावी ! अत्यंत धसमुसळ्या शम्मीचं हे प्रणयगीत केवळ अविस्मरणीयच .

कृष्ण धवल जमान्यातील अशीच एक अनवट जोडी , बॉलिवूडच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात देखणा नायक देव आणि बॉलिवूडची आजपर्यंतची सर्वात जास्त सौंदर्यवती , शापित अप्सरा मधुबाला यांच्याविषयी पुन्हा कधीतरी !

मुकुंद कुलकर्णी©
PC:google
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu