दीवाना हुआ बादल
Romance at it’s best . आजच्या पॕनडॕमिकच्या काळात आवश्यक असणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगपेक्षा जास्त डिस्टन्स पाळून चित्रित केलेलं , तेही शम्मी कपूरचं , एक अप्रतिम प्रणयगीत . साठ ते ऐंशीच्या दशकात अशी अगणित गाणी बॉलिवूडने रसिकांना पेश केली . राज नर्गिस , दिलिप वैजयंती , देव नूतन अशी अनेक कॉम्बिनेशन्स लगेच आठवतात . शम्मी कपूर हा आत्ममग्न ( चांगल्या अर्थाने ) कलाकार होता . नवोदित नायिकांसोबत तो बिनदिक्कतपणे चित्रपट स्विकारायचा . त्या चित्रपटांना उदंड यशही मिळायचं .सायरा – जंगली , शर्मिला – कश्मीर की कली ही सणसणीत उदाहरणं . शम्मी बऱ्याचदा अंडररेट होतो असं माझं प्रामाणिक मत आहे . काळाच्या पुढे असलेला भारी माणूस होता तो . त्याचा अभिनय आणि त्याची नृत्यं आजही तेवढीच टवटवीत आणि काल सुसंगत वाटतात .
असं म्हणतात की , शम्मी हा बॉर्न कोरिओग्राफर होता . गाण्याची सिच्युएशन , त्याचे काव्य , त्याचं संगीत , त्याची चालं , गायक .. बहुतेक तर त्याच्यासाठी रफीचाच आवाज असे . या सगळ्यांचा विचार करून तो आपल्या स्टेप्स ठरवायचा . कोरिओग्राफरचं काम म्हणजे त्याप्रमाणे त्याने नायिकेच्या स्टेप्स ॲडजेस्ट करायच्या . राज , देव , दिलिप या पहिल्या फळीतल्या आघाडीच्या त्रिमूर्तींची गाणी तर सुंदर होतीच , पण मला शम्मीची गाणी तितकीच आवडतात . काही गाणी किंबहुना त्यापेक्षा जास्तच . शम्मीची गाणी , नृत्यं हा नेहमीच प्रसन्न , आनंददायक अनुभव असे . त्याची स्वतःची अशी स्टाईल होती . दोन्ही हात डोक्यामागे घेत चुटकी वाजवत ऱ्हीदम पकडणे , बिली बाऊडन सिक्सरचा इशारा करायचा तसा तो हळूहळू उभा रहायचा . डोक्यावरची टोपी कपाळावर सरकावणे , मुलायम झुल्फे उडवणे , ग्लासात चमचा वाजवणे , गिटार , ट्रंपेट , सॕक्सोफोन , पियानो , क्लॕरिनेट ही सर्व वाद्ये त्याला शोभून दिसायची . त्याला संगीताची चांगलीच जाण होती . देशी , विदेशी कुठल्याही प्रकारच्या वाद्यासोबत तो कंफर्टेबल असायचा . चाहत्यांना वेड लावणारे त्याचे गिमिक्स ‘ लै भारी ‘ होते . शम्मी दोन्ही हात डोक्यावर मानेपाशी घ्यायचा तेंव्हा उजव्या हातात त्याचं घणसर ब्रेसलेट हमखास दर्शन द्यायचंच ! दोन्ही हात विमानाच्या पंख्यासारखे उडवत तो डौलदार पावलं टाकायचा तेंव्हा त्या काळातील पोरींचा कलिजा खलास व्हायचा . विचारा हवं तर आजच्या आज्या पणज्यांना ! शम्मीची विनोदाची जाण तर अप्रतिमच होती .

कृष्ण धवल जमान्यातील अशीच एक अनवट जोडी , बॉलिवूडच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात देखणा नायक देव आणि बॉलिवूडची आजपर्यंतची सर्वात जास्त सौंदर्यवती , शापित अप्सरा मधुबाला यांच्याविषयी पुन्हा कधीतरी !
PC:google

