‘दाद’ द्यायलाच हवी – मॅप्रो उद्योग

आपल्या अवती भवती सतत काही ना काही घडत असतं. सहेतुक किंवा निर्हेतुकपणे गोष्टी पुढे नेण्याचा कौलाचा सुरु असतो. परंतु आपण जेंव्हा त्याचे साक्षीदार असतो किंवा दुरून व जवळून अनुभूती घेत असतो तेंव्हा त्या प्रसंगाला अनुसरून प्रतिक्रियाही नोंदवीत असतो. साधा धुळीचा लोट आला कि पापण्या आपोआप बंद होतात. हि जशी कायिक प्रतिक्रिया तशीच मानसिकही असते. नकळत त्या घटनेला अनुलक्षून प्रश्न  आणि उत्तरे आपण शोधीत राहतो. निसर्गाच्या अद्भुत आविष्काराने तर आपण वेडावून जातो तर कधी नातेबंधात , भावना आणि कर्तव्याच्या दोलायमान संभ्रमात जीवाची ओढाताण होत राहते. सकारात्मकतेची रुजवात मनात असेल तर आनंदाचा झरा झुळझुळत राहतो. उस्फुर्त तरीही जाणता प्रतिसाद देत राहतो.          
 
 

शोध घेणं सुरू झालं. नेहमी होतं अगदी तसंच. जेव्‍हा जेव्‍हा आपण एखाद्या वास्‍तुला, मंदिराला, बगीचाला, गावाला किंवा निसर्गा​च्‍या कोणत्‍याही आविष्काराला भेट देतो ना, तेव्‍हा तेव्‍हा त्‍या ठिकाणचं वैशिष्ट्य, अर्ध​गर्भ​ता, प्रेरणा, वेगळेपणा इ. अनेक छटा टिपलेल्या असतात. पुन्हा कधी ज्‍यावेळी त्‍या दिशेला वळतो, प्रवास करतो अन् तिथे पोहोचतो तेव्‍हा नकळत ही शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. कुतुहल असत, अंदाजाचे पतंग उडत असतात. काळाच्‍या ओघात काही बदल झाले असतील. जे सौंदर्या​त भर घालतील की खासियत ओसरली असेल, तर्का​चे खूर दाही दिशांना उधळतात. सहज भासलं तरी, मन तुलनात्‍मक विश्लेषण करीत राहतं, मन:पटलावर नोंदणी सुरू होते.

पुण्याहून वाई​ मार्गे​ महाबळेश्वर ही शनिवार-रविवार ट्रीप गेली काही वर्षे​, वर्षा​तून एक-दोनदा तरी नक्कीच अनुभवत आलोय. तरीही सदाबहार, निसर्गा​ने लपटलेल्या महाबळेश्वराचं आकर्ष​ण जराही कमी झालेलं नाहीये. वृक्षांची ‘जांभुळमाया’ बिलकुल लुप्त झाली नाहीये. थोडे-थोडे बदल होत राहणार हे गृहित धरलेलं असतं. लाल मातीचा, वळणांचा, घाटाचा रस्ता कापीत जाताना शेंदूरजणे (वाई​) पाचगणी, गुरेधर यायचं जिल्हा साताऱ्यामधलं थंड हवेचं ठिकाणं साद घालायला लागायचं परंतु तत्पूर्वी​ गुरेधरलाच मार्गा​वरच्‍या एका आकर्ष​णाने वाट अडवली होती. हां मॅप्रोचे फलक वाई​ फाट्याला वळलं की लगेचच दिसायचे जसे आता पुस्‍तकाच्‍या गावचे दिसतात! व्‍हायचं असं की मंडपाच्‍या प्रवेश द्वारापाशी गुलाब पाण्याचा फवारा उडावा तसं मॅप्रोचं इंप्रेशन महाबळेश्वरमध्ये शिरताना व्‍हायचं. डेलिया, झेंडू, गुलाब फुलं फुललेली, आतमध्ये शिरताच डावीकडे टॅम्‍पोलीन खुणवायचं- पलिकडे काऊंटरपाशी जॅम, ज्‍युसेसची विनाशुल्‍क नमुन्‍यांची पेरणी सुरू असायची. सँडवीचचा खमंग, भूक चाळवणारा गंध यायचा, नापरिसर घेऊन आणि जॅम-ज्‍युसेसची खरेदी झाल्‍यावर तिथून बाहेर पडायचं हा क्रम आवडीचा ठरवलेला दिवसेंदिवस तिथली मंदी वाढत होती. परंतु कधी टॉयलेटला जायचं असायचं तर कधी मध पाहिजे असायचा. एकूण काय, मॅप्रोचा हॉल्‍ट नक्की व्‍हायचा, खुणेसाठी फलकावरती देखणी, लाल चुटूक स्ट्रॉबेरी हमखास खुणवायची.

साधारणपणे २००८ च्‍या सुमारास वाई​मध्ये मॅप्रोचं नवीन सेंटर सुरू झालेलं दिसलं. स्‍ट्रॉबेरीच्‍या फलकांनीच ते लक्षात आणून दिलं. फलेरो, सरबतांचा कारखाना इथे सुरू झालाय असं कळलं. ‘या आऊटलेटमध्ये डोकावून येऊ या.’ अशी स्‍वाभाविक इच्‍छा झाली. त्‍यावेळी आतमध्ये एक छोटीशी शेड होती. पाच-सहा बेंचेस होते. विचारणा झालीच तर, प्रसिद्ध सँडविचेस आणि आई​स्क्रीमची उपलब्धता होती. मला आठवतंय, त्‍यावेळी सँडवीचची चटणी गुरेघरच्‍या मुख्यालयातून आयात केली जायची. इथे प्रायोगिक तत्वावर पर्य​टकांच्‍या मागण्याना प्रतिसाद मिळत होता. पलिकडे एक शेड होती. जिथे मॅप्रोची उत्‍पादने सुबकपणे विक्रीसाठी मांडली होती. मुख्य आकर्ष​ण होते कारखाना पाहाण्याचे. विनाशुल्‍क फळांवर होणाऱ्या प्रक्रिया बघण्याचे त्‍याचवेळी या कारखान्यातली स्‍वच्‍छता, कुशल कामगारांचे नैपुण्य पाहून या उत्पादनांविषयी विश्वास दाटला बरं, बरोबर आमची हट्टी आणि लाडकी चिमणावळ होतीच की! फुकट सँपलची मजा चारवायचा अन् मग भरभरून खरेदी व्‍हायची.

१९५९ मध्ये किशोर वोरा या फॉरमसिस्‍टने स्‍ट्रॉबेरी जॅमचं उत्‍पादन प्रथमत: सुरू केलं. एखादा मोठ्ठा व्‍यवसाय सुरूवातीला छोट्या प्रमाणात सुरू केलेला असतो. अनेक प्रयोग, निरनिराळ्या शक्यतांच्‍या आधारावर बेतलेला असतो. गणितं जमली की यशस्विता वाढते न् उद्योग विस्‍तारत जातो. तसंच झालं. घरातल्‍या तिघांनी मिळून स्‍ट्रॉबेरी जॅम बनवायची तयारी केली. भट्टी जमल्‍यावर तीन घरांमध्ये जॅमचं उत्‍पादन सुरू झालं. फायदा अगदीच माफक होता परंतु व्‍यवसाय नफ्याच्‍या तत्वावर आगेकूच करीत असतो हे सत्‍य नाकारता येत नाही.
गिऱ्हाई​काच्‍या पसंतीची नेमकी नाडी ओळखणे, ग्राहकाला समाधान देणे. पैशांच्‍या मोबदल्‍यात पुरेसं असेल. ही गोष्ट वाटते  तितकी सोपी नसते. कालामानाप्रमाणे आवडी निवडीत होणारे बदल स्‍वीकारून पुढे जावं लागतं. या पार्श्व​भूमीवर मला मॅप्रोच्‍या फाळांपासून तयार होणाऱ्या उत्‍पादनांचं विशेषत्‍व जागवत होतं.

गुरेथरच्या सेंटरमध्ये एका बाजूला चॉकलेटची फॅक्‍टरी आहे. जी पाहताना मुलंच काय मोठीही हरवून जायची. कॅडबरीची फॅक्‍टरी पाहायला यू.के. मधल्‍या बोर्न​व्‍हीटेला गेलो होतो.

पर्पल​ रंगात रंगलेलं ‘कॅडबरी वर्ल्ड​’ अनुभवताना खूप मजा वाटली होती. आता तसाच अनुभव सह्याद्रीच्या कुशीतल्या या वाई​-महाबळेश्वर मार्गा​वर ‘मॅप्रो’ देतयं असं वाटून गेलं, स्‍ट्रॉबेरी क्रशचंही आकर्ष​ण वाटतं होतं. प्रत्‍यक्षात क्रशची उत्‍पादनं प्रक्रिया पाहायला मिळत होती. फळातल्‍या गराची ४५% भाग क्रशमध्ये होता.

गुरथर काय किंवा आताचं शेंदूरजगेच फूडवर्क काय अतिशय स्‍वच्‍छ अशी स्‍वच्‍छतागृहे पर्यटकांच्‍या पसंतीस उतरत होती. आत्ताच म्‍हणजे मागच्‍या आठवडयात वाईच्या मॅप्रो सेंटरला भेट दिली. त्‍यावेळी तिथल्‍या आकर्षणात भर पडलेली आढळली. यावेळी मार्च अखेर ‘स्‍ट्रॉबेरी’ महोत्‍सव’ सुरु होता जो गेली काही वर्षे सातत्‍याने होत आहे. म्‍हणजे ढोल-ताशे, मल्लखांब, नृत्‍य, मेंदी, लेझीम, टॅटू, स्‍केच असे मनोरंजनाचे अनेकाविध अविष्कार या महोत्‍सवा दरम्‍यान होतात. यावेळी मनसोक्‍त स्‍ट्रॉबेरीज मुक्‍त असतात. मनसोक्‍त खाव्‍यात अशी कल्‍पना असते. प्रवेशद्वारापासून फुलझाडे, फुले-कारंजे आपलं स्‍वागत करीत असतात. यावेळी सारा परिसर समारंभासाठी सुशोभित केलेला होता. अतिशय मार्दवाने आणि हसतमुख पद्धतीने स्‍वागत केले होते. उत्‍पादन विक्रीची तीन दालने दिसत होती. प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग एकच होता. दालनं खुली होती. बाहेर नेहमीप्रमाणे जॅम, सरबतांचं फ्री सॅपलींग (वाटप) केंद्र आमची वाट बघत होतं. भरीत भर म्‍हणून यावेळी खोबरे आणि चिक्कीचे नमूनेही नेटकेपणाने ठेवलेले होजे. पर्यटकांच्‍या मागणीनुसार पुरवठा करण्याचा जणू बोरा फॅमिलीने बांधला होता.        

      पलीकडे टाळयांचा आवाज येत होता. वाई  जिमखान्‍याच्‍या आठ ते बारा वयोगटातील मुली मल्लखांब कसरती करीत होत्‍या. झाडाला बांधलेल्‍या मजबूत शेंडयावर हव्‍या-तशा लवचिकतेने अचंबित करणाऱ्या आसनाकृती करीत होत्या. बरं, इतक्‍या अवघड नव्‍हे नव्‍हे थरारक हरकती आपण करतोय याचं भानही त्‍या मुलींच्‍या चेहऱ्यावर नव्‍हतं. होता फक्‍त आनंद ! उत्‍सुकता वाढली प्रश्न निर्माण झाले. तिथल्‍या कर्मचाऱ्यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली. काही गोष्टी कळल्‍या. महत्त्वाचं म्‍हणजे या फलोत्‍पादनाचे निमित्ताने इथल्‍या लोकल लोकांना काम मिळालयं. सध्या अडीचशे कर्मचारी इथे काम करताहेत. बराचसा तरुण वर्ग आहे. ज्‍याच्‍या मुखावर हास्य आहे. तत्‍परतेने काम करण्याची वृत्ती आहे. मुलं मूठी-मूठी फुलोरा घेत होती. हवी तशी बागडत होती आणि ही कामगार मंडळी त्‍यांनाही रिझवीत होती. आकर्षणात भर म्‍हणून स्‍ट्रॉबेरी-मँगोच्‍या आकाराच्‍या मऊ-मऊ उशा किंवा सोफ्यावरचे-बेडवरचे तक्‍के म्हणूया हव तर मुलांना आवडकत होते.

      काही जंगल राईड करुयात ना वाघ-सिंह पाहायला मिळतील.     

      इथे उभयारण्य नाहीये. फक्‍त जंगल आहे. निव्‍वळ गर्द वनराई आहे.

      म्‍हणजे पक्षी तरी नक्की असतील.

आता नको उशीर झालाय.

प्‍लीज… ज, जंगलचा वास मस्‍त असतो.

आणि हो, राईड फ्री आहे.

… हो ना हो ! या धीटुकल्‍या हरीणीने मला विचारलं होतं. तिकीटाचं ‘‘तिथल्‍या ताईने सांगितलं.

होयं-नाही करत करत जंगलात फेरफटका मारला. कारखान्‍यातही डोकावलो. अत्‍याधुनिक सुरक्षा यंत्र आणि यंत्रणा पाहिली. विशिष्ट अप्रॅन मधले कामगार वेगळे ओळखू येत होते. गर्दी इतकी वाढली होती लगबगीने सेवा पुरविणारे कर्मचारी लक्षवेधी होते. यावेळी लाल-पिवळया-निळया रंगाचे स्‍क्रप कंटेनर होते. कुठेही, कसेही हलवता येत होते. त्‍यामध्ये उत्‍पादने मांडावीत किंवा कोणाची राहण्याची सोय करावी.

एक भलीमोठी (कृत्रीम) स्‍ट्रॉबेरी चित्र वेधून घेत होती. त्‍यामध्ये बाकावर बसून फोटो काढता येत होता. आतमध्ये फिरता येत होतं. हिंडून-फिरुन आम्‍ही फुलकोर्टामध्ये पोहोचलो. सँडविच, पिझ्झा आणि अनेक पेये उपलब्‍ध होती. आईस्‍क्रिम खाऊन तृप्‍त होऊन आम्‍ही बाहेर पडलो आणि खरेदीच्‍या प्रांगणात शिरलो. सध्या मॅप्रोकडे एकशे सदतीस उत्‍पादने सुरु आहेत. अर्थात सर्वच्‍या सर्व फळांपासून तयार केलेली आहेत. तशी फॅक्‍टरी हिमालय प्रदेशातल्‍या कांग्रा जिल्‍हयात इंडोरा येथेही आहे, फळांवर प्रक्रिया करताना ती ताजी असायला हवीत म्हणून  स्‍वत:हून ठरवून घेतलेला निकष ग्राहकांच्‍या पसंतीला न उतरला तरच नवल.

कुशलकुंज पाचगणी येथे मॅप्रोचे मुख्य ऑफिस आहे. प्रत्‍येक ठिकाणच्‍या लोककथा त्‍यावेळच्‍या वास्ववावर प्रकाश टाकीत असतात. इथेही कळलं, ते असं होतं. १९१८ च्‍या सुमारास सहयाद्रीच्‍या या डोंगर कुशींमध्ये स्‍ट्रॉबेरीचं प्रचंड उत्‍पादन झालं. बरं, हे फळ फार नाजुकसं अवघ्या चोवीस तासात खराब होणारं. जेवढं चवीचं तेवढं हळवही! त्‍यावेळी विक्रीसाठी फळांची वाहतूक करण्याच्‍या जलद आणि खात्रीशीर सोयी नव्हत्या . शेतकऱ्यांनी टोपल्‍या-टोपल्‍या फळं ओतून टाकल्‍या, मेहेनत वाया गेली. भांडवलंही निघालं नाही. परिस्‍थिती लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची उमेद खचू नये म्‍हणून पुढच्‍या वर्षी दोन कुटुंबाने या स्‍ट्रॉबेरी माफक दरात खरेदी केल्‍या आणि फुकट वाटपाचं नियोजन केलं.

आजवर ही प्रथा सुरु आहे. समाजाचं देणं मानणाऱ्या या सुद्धा विचाराला सलाम.

मॅप्रोमध्ये आठवडयाच्‍या सुट्टीचे काम आहेत. मंगळवार आणि बुधवार म्‍हणजे शनिवार-रविवारी भेट देऊ इच्‍छिणाऱ्या लोकांसाठी आणि उत्‍पादनाच्‍या कामासाठी ही मंडळी कारखान्‍यात हजर असतात. गर्दी असो वा नसो. कामाचे ठिकाणी समरसून काम चालतं प्रतीची फळे आणि त्‍यापासून बनविलेल्‍या उत्‍पादनांची प्रतही तशी क्‍वालिटी असलेली. ग्राहकाच्‍या मनात कोणतीही बाधा निर्माण होत नाही. मला मनापासून वाटलं की भूमीच्‍या शिरावर हा फळांपासून उत्‍पादनाचा प्रकल्‍प उभा आहे. त्‍या भूमीचंही हे भाग्‍य आहे !

अंदाजे पन्नास लाख पर्यटक दरवर्षी महाबळेश्वरला जातात. त्‍यातील साधारणपणे साठ टक्के लोकं मॅप्रोचा पाहुणचार घेतात. इथे जरासे विसावतात. स्‍वच्‍छता आनंदाने होणारे स्‍वागत आणि विनामूल्‍य राईडस , फ्री सँपलींग अनुभवल्‍यानंतर निर्विकल्‍प खरेदी होते. दहा मेट्रीक टन उत्‍पादनाची जागा आता तीस हजार (३०,०००) मे. टन उत्‍पादनाची होते आहे. वार्षिक उत्‍पादनातला हा फरक भरभराट दाखवितो आणि पर्यटकांचा कल नमूद करतो..

मोबाईल लायब्ररीचा विषयही इथे विचाराधीन आहे. असं कळलं. खूप छान वाटलं. निवांतपणे सुट्टी एन्‍जॉय करण्यासाठी येणारा कोणत्‍याही वयाचा पर्यटक इथे रमेल याची काळजी मॅप्रोने घेण्याचं ठरवलेलं दिसतं. यामध्ये दूरदृष्टी कल्‍पकता होती तशीच आपल्‍या प्रदेशातील फळाच्‍या उत्‍पादनातलं नाविन्‍य टिकविण्याची तळमळही होती. आम्‍ही आनंद करतो. आनंद वाटतो हे ध्येय बाळगणारी मोठया मनाची माणस या उत्‍पादनांच्‍या मागे आहेत. आनंदाची प्रेरणा घेऊन काम करताहेत याचा प्रत्‍यय येत होता.

वाई, पाचगणी घाट मागे टाकून आम्‍ही महाबळेश्वरला पोहोचलो. रुटीनमध्ये बदल आणि उकाडयापासून थोडी सुटका!  वातारणाचा असर होतो आणि विचारांमध्येही परिवर्तन जाणवतं परत वाटत राहिलं की बदल हा परिसरात होतोय तसा आपल्‍यामध्येही होतो आहे. सूक्ष्मपणे होतोय पण प्रक्रिया नक्की सुरु आहे. पु. ल. देशपांडेचं फुलराणी नाटक आवडलं होतं . भक्ती बर्वेचा आणि सतीश दुभाषीचा अभिनय कमालीचा होता. आता पुन्‍हा तेच नाटक दोन वर्षांवूर्पी पाहिलं. कलाकार वेगळे होते तरी भावलं त्‍यातील भाषेचं सौंदर्य, शब्‍दांची मूळ म्‍हणजे गाभारी खुलावट आणि पु. लं. ची सिद्धहस्‍त लेखणी ! भारावून गेले होते. समज, आकलन आणि अनुभवाचा प्रत्‍येकाचा आवाज समृद्ध होत राहतो ना ! विचार परिस्‍थिती सगळचं बदलत राहतं. बदल होणं ही नवीनतेच्‍या पूजेची शाश्वत खूप आहे. असं म्‍हणणं वावगं ठरु नये. अशीच बदलती अभिरुची ध्यानात घेऊन पर्यटकांना आनंद देऊ इच्‍छिणाऱ्या मॅप्रो टीमनाही दाद द्यायला हवी. ग्राहकाला देव मानणाऱ्या मनाची भाषाच वेगळी आहे.  

  • कविता मेहेंदळे
                               

 

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu