आम्ही राष्ट्रीय खेळाडू – बास्केटबॉलपटू : भैरवी पालकर- घाटे

छेगं किती ! किती वर्षापूर्वीच्या गोष्टी या आता मी फक्त हर्षूची बायको आणि तन्वी-शौनकची आई आहे. तन्वीच्या लग्नाच्या निमित्तान होत असलेल्या एका कौटुंबिक समारंभात मी जेव्हा या सदरात तुझी मुलाखत हवीच, असं म्हटलं तेव्हा भैरवीचं हे उत्तर होतं.

हर्षू म्हणजे श्रीहर्ष घाटे. के.पी.आय.टी. या प्रसिद्ध कंपनीच्या संचालकांपैकी एक, लडाख पासून अनेक ठिकाणी सायकलवरुन जाण्याचा छंद जोपासणारा सायकलपटू, माझा आतेभाऊ आणि मामेदीर. भैरवी माझी वहिनी आणि जाऊ. त्यामुळे गेली ३० वर्षं आम्ही तिला बघतोय. हर्षूची बायको बास्केटबॉलची नॅशनल प्लेयर आहे. असं लग्न ठरलं तेव्हा आत्यानं कौतुकानं सांगितल्याचंही आठवतंय. लग्नानंतरही ती खेळत होती. लग्नानंतरच तिला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. मग मुलांच्या जन्मानंतर त्यांना घेऊन टू व्हीलरनं मैदानावर तिला जाताना पण आम्ही पाहिलयं.

तोही टप्पा झाल्यानंतर मात्र तिच्या म्हणण्यानुसार खरंच आता ती फक्त गृहिणी म्हणून घरात रमलीय. तिची खेळाडू आणि प्रशिक्षकाची कारकीर्द महत्वाची असल्यानं अखेर मी तिला मुलाखतीसाठी राजी केलं.

भैरवी मुळात मुबईची. तिचे वडील मुकुंद पालकर, सी.ए. आणि आई पुष्पा या हॉकी खेळाडू. हिचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुंबईला झालं आणि सातवीत चांगली शाळा म्हणून पुण्यात हुजुरपागेत प्रवेश घेतला. हिच्या आजीआजोबांचं घर भांडारकर रस्त्यावर. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आईच्या सांगण्यावरुन भैरवी पी.वाय.सी. ग्राउंडवर एका कँपसाठी गेली असतांना तिथले बास्केटबॉलचे कोच अशोक देशपांडे म्हणाले, तुमच्या शाळेतचं समर कँप घेऊ शकतो. इथलाच एक कोच देतो तुम्हाला, विचार शिक्षिकांना. हिनं शाळेच्या पी.टी.शिक्षिका, मीनाक्षी जोशीना विचारलं. त्यांनी होकार दिला आणि शाळेतच बास्केटबॉलचं रीतसर ट्रेनिंग सुरु झालं. ज्या कोचचा आदरपूर्वक उल्लेख भैरवी वारंवार करते त्यांचं नाव, अमृत पुरंदरे.

आईची इच्छा म्हणून खेळायला सुरुवात केली पण पुढे त्या खेळानं तिला खूप काही दिलं.शाळेची बास्केटबॉलची टीम होती, पण त्याला खरी गुणवत्ता प्राप्त करुन दिली ती अमृत पुरंदरेंनी. त्यांनी शिकवायला सुरुवात केल्यावर शाळेनं विचारलं की तुम्ही आंतरशालेय स्पर्धांची तयारी करुन घ्याल का ? त्या काळात कोचला पैसे वगैरे द्यायची पद्धत नव्हती, तरीही पुरंदरे सर तयार झाले, हे आमचं भाग्य, असं भैरवी म्हणते.

सरांनी आमची सॉलिड टीम बनवली. ते स्वत: त्याचा अभ्यास करायचे. खेळाडूचा मानसिक अभ्यास सुद्धा. म्हणजे आता ही स्पर्धा आलीय, तर खेळाडूंची कशी तयारी करुन घ्यायची. नुसतं शारीरिक नाही, नुसतं खेळाचं कौशल्य नाही, तर जिंकलं पाहिजे, ही मानसिकता तयार करायचे सर. माझी पिवोट पोझिशन असायची, म्हणजे इतर खेळाडूंकडे पाठ करुन इतरांना हूल देत देत बास्केट टाकायची. मी म्हणे त्यात खूप चांगली होते, पण ते सगळं सरांमुळे. सर मला बास्केटच्या खाली उभं करुन अक्षरश: ३०० स्ट्रोक टाकायला लावायचे, आणि स्वत: मोजत तिथे उभे असायचे. ही महत्वाची पोझिशन असते, खूप मार खावा लागतो, इतरांची कोपरं लागतात, त्या सगळ्याची तयारी करुन घेतली.

भैरवीनं खेळात चमक दाखवायला सुरुवात केली. आंतरशालेय, जिल्हा, राज्य हे टप्पे पार करुन १९८१ ला पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळायला ती गुवाहाटीला गेली. वेगवेगळया शाळातल्या मुली निवडून त्यांचा महाराष्ट्राचा संघ निवडला जाऊन त्यांच्यात आंतरराज्य खेळायचं असे. तेव्हा नागपूराच्या आणि मुंबईच्या मुली खूप चांगल्या होत्या, अशी तिची आठवण.

राष्ट्रीय स्पर्धा सगळया खेळांच्या एकत्र असतात. महाराष्ट्रातर्फे खेळणा–या विद्यार्थ्यांसाठी सरकार अख्खी रेल्वे गाडी सोडते. तेव्हा या गाड्यांना लाकडी फळ्या असत. त्यावर एका बाकावर दोघींनी एकीचं डोकं एकीकडे, दुसरीचं एकीकडे, अशा पद्धतीनं किंवा खाली चटई अंथरुन झोपायचं, स्टेशनवर उतरुन हातपाय धुवायचे कारण या रेल्वे गाडया सायडिंगला टाकत टाकत त्यांना पोचायला आरामात तीन-चार दिवस लागत. दिवसचे दिवस या गाडया यार्डात टाकल्या जात, मग बोगतले दिवे, पंखे बंद होत त्यामुळे खाली उतरुन स्टेशनवर फिरत बसायचं हाच उद्योग. पण असा प्रवास सगळी मुलं प्रचंड एन्जॉय करत. ज्युनिअर नॅशनल्सच्या वेळी मात्र परिस्थिती बदलली, जरा रिझर्वेशन वगैरे करुन प्रवास होऊ लागले.

पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा आणि ती आसाममध्ये. तेव्हा आसामात बोडो अतिरेकी धुमाकूळ घालत होते. आसाम अक्षरश: पेटलं होतं. तेव्हा मुलींना याचं गांभीर्य कळत नसलं तरी पालकांना निश्चितच काळजी वाटत होती. प्रत्यक्ष स्पर्धा खेळताना मुलींना कळलं की बाहेर किती अशांतता असेल, कारण यांच्या मॅचेस सुरु असताना, मुलांची टीम यांच्या भोवती कडं करुन उभी असे आणि त्यांच्या भोवती पोलिसांचं कड असे. प्रेक्षकांनी यांना कुठला त्रास दिला तर नाहीच, उलट मुलींच्या खेळाची सवय नसल्यानं त्यांना यांचं इतकं कौतुक वाटे की लोक चक्क यांच्या खेळाच्या वेळी मैदानावर पैसे टाकत. हा अनुभव भैरवीनं पहिल्यांदा घेतला म्हणून कायम लक्षात राहिला.

भैरवीच्या वडिलांचे काका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळचे प्रचारक म्हणून आसाममध्ये कार्यरत होते. हिच्या आईनं त्यांना पत्र लिहून भैरवी अशा स्पर्धा खेळायला येत असल्याचं कळवलं होतं आणि तेही ते जिथे राहात त्या गावाहून खास हिला भेटायला आले होते, कौतुक केलं होतं.

पुढच्या वर्षी गांधीनगरला झाल्या या स्पर्धा. तेव्हा सर्व खेळात महाराष्ट्र खूप आघाडीवर असे. चँपियनशिप महाराष्ट्राला मिळत असे. बास्केटबॉलमध्येही अर्थातच मिळाली होती. भैरवीला जिंकायची सवय लागली ती अशी लहानपणीच ! अर्थात यात अमृत पुरंदरे आणि शाळेच्या शिक्षिकांचा मोठा वाटा असल्याचं ती वारंवार सांगते.

शाळेत जवळपास आठ महिने स्पर्धा, सराव शिबीरं असं सगळं करतही दहावीला भैरवीची टक्केवारी भरपूर होती, सायन्सला जा, असा सल्ला सगळे देत असतानाही हिनं कॉमर्स निवडलं. बी.एम.सी.सी. हे महाविद्यालय खेळाला प्रोत्साहन देणारं आणि कॉमर्स शाखेत प्रॅक्टिकल्स वगैरे नसल्यानं खेळाला वेळही देता येईल हा त्यामागचा उद्देश.

हुजूरपागेच्या माजी विद्यार्थिनींनी एच.एच.सी.पी. स्पोर्ट्स क्लबची स्थापना करुन शाळेच्या मैदानावरच सराव सुरु ठेवला. अमृत पुरंदरे कोचिंग द्यायला होतेचे. कॉलेजकडून खेळताना कॉलेज पण कोच नेमतं, कधीकधी कॉलेज अमृत पुरंदरेंनाच नेमत असे. कधी वेगळे कोच असत. भैरवीची टीम अकरावी ते बी.कॉम पर्यंत पाचही वर्षं बास्केटबॉलमध्ये अजिंक्य राहिली.

ज्युनिअर नॅशनल म्हणजे अठरा वर्षांखालील वयोगटात भैरवी बडोदा आणि तामिळनाडूत नेवेलीला खेळली. नेवलीची आठवण म्हणजे अवघ्या एका गुणानं हुकलेलं विजेतेपद ओपन नॅशनल बरोबर इंटर युनिवर्सिटी स्पर्धा पण सुरु असायच्या.

युनिवर्सिटी, फेडरेशन कप, नॅशनल्स असं सगळं वेळापत्रक व्यवस्थित आखलेलं असे. म्हणजे विद्यार्थी त्यानुसार त्यांचं सरावाचं आणि अभ्यासाचं वेळापत्रक आखू शकत. भैरवीचा खेळ आणि अभ्यास दोन्ही यशस्वीपणे सुरु होता. वडिलांप्रमाणे सी.ए. होण्याचं तिचं स्वप्न.

ते भले पूर्ण झालं नाही, पण एम.कॉम पूर्ण झालं. सी.ए. साठी कीर्तने पंडित या  फर्ममध्ये आर्टिकल्स करताना तिच्या मनात लग्नाचा विचारही नसताना त्या फर्मचे तरुण भागीदार श्रीहर्ष घाटे यांच्याशी लग्नाचा योग जुळून आला.

अरे, आपण एकदम पुढे उडी मारली, अजून तर ती बी.एम.सी.सी. त शिकतेय, नाही का ? तर एकीकडे कॉलेज आणि दुसरीकडे खेळ. पण कॉलेजमध्ये मुलं जो टाईमपास करतात तो मात्र हिनं कधीच केला नाही. (अरेरे)

वर्षातले आठ महिने ही खेळण्यासाठी पुण्याबाहेर असायची. नॅशनलचे कँप प्रत्यक्ष स्पर्धांच्या आधी २-३ आठवडे असत.

ज्युनिअर नॅशनल जेव्हा नेवेलीला होती तेव्हा भैरवी महाराष्ट्राची कप्तान होती. तिथे तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताकडून निवड झाली. हा अत्यंत मोठा अभिमानास्पद क्षण होता. यासाठी सलग दोन महिन्यांचं सराव शिबीर पतियाळा इथे होतं. नॅशनल इन्सिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही अतिशय उत्तम दर्जेदार अशी संस्था. तिथली राहणं, जेवणं आणि प्रशिक्षणाची सगळीच सोय भैरवीच्या शब्दात, टॉप क्लास. मुलांनी केव्हा, काय खावं तेही पद्धतशीर असे. अख्ख्या दिवसाचं व्यवस्थित वेळापत्रक तयार केलेलं होतं. सकाळी सहा वाजता थंडीत २.४ कि.मी. पळण्यानं आणि पाठोपाठच्या व्यायामानं दिवसाची सुरुवात होई. नंतर आपल्याला हॉस्टेलमध्ये जाऊन दूध पिणं, थोडं आवरुन मग प्रत्यक्ष खेळाचा, बास्केट मध्ये बॉल टाकणं याला शूटिंग म्हणतात, त्याचा सराव आणि वेट ट्रेनिंग. तिथल्या अद्ययावत जिममध्ये हे वेट ट्रेनिंग चाले. ते झालं की न्याहारी. थोडा ब्रेक झाला की लगेच स्किल ट्रेनिंग, वेगवेगळी ड्रिल्स वगैरे. त्यानंतर मध्ये पुन्हा एखादं फळ खायला मिळायचं. मग जरा दुपारी निवांतपणा असे तेव्हाच अंघोळ, कपडे धुणं… अंग  इतकं घामाघूम होऊन गेलेलं असे क ट्रँक पँटपासून सगळे कपडे रोज धुवावेच लागत. घरी अशी वेळ कधी येत नसल्यानं बाहेर गेलं की आपोआप स्वावलंबनाची सवय लागत गेली. आटपून जेवून जरा विश्रांती घ्यायची की संध्याकाळपासून अंधार पडेपर्यंत परत खेळ. प्रत्यक्ष मॅचेस खेळायच्या आणि इतर प्रकारची ड्रिल्स, राष्ट्रीय स्पर्धा खेळताना राज्याच्या खेळाडूंबरोबर खेळायचं असतं, आंतराष्ट्रीय स्पर्धांच्या सराव शिबिरात आतापर्यंत विरोधात खेळलेल्या खेळाडूंबरोबर एका संघात खेळायची संधी. रोज रात्री दूध पिऊन दिवस संपायचा. ही इन्सिट्यूट म्हणजे पतियाळाच्या महाराजांचा राजवाडा असल्यानं सगळया सोई राजेशाही.

अगं, इतर स्पर्धांच्या शिबिरात आणि इथल्यात प्रचंड फरक जाणवला होता. जे खेळाडू अंड खात त्यांच्यासाठी तिथला आचारी आम्हाला विचारुन सिंगल फ्राय, की डबल की ऑम्लेट की उकडलेलं ते विचारुन प्रत्येकाला हवं तसं बनवून देई. जे खायचे नाहीत, त्यांच्यासाठी पनीर. ते पनीरसुद्धा इतकं लुसलुशीत असायचं नं. मस्त असायचं जेवण-खाण. रोज अंड, दूध,  फळ खायचंच, १९८४-८५ मधले ते दिवस भैरवीला तसेच्यातसे आठवतात. तेव्हा पंजाबमध्ये अशांतता होती. मुलामुलींना इन्सिट्यूट बाहेर सोडायच नाहीत. सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक. रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची परवानगी, पण सोबत सुरक्षा व्यवस्था असायची.

घरच्यांची आठवण यायची. सतरा अठराचं वय, मोबाईल नव्हते, घरच्यांशी बोलता यायचं नाही. तेव्हा भैरवीला तिची आई, आजी, बाबा दर दोन तीन दिवसांनी पत्र लिहायचे. आपल्या पालेकरांमधील तू एकटीच असं राष्ट्रीय पातळीवर, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणार. इथला विचार करायचा नाही, फक्त खेळ नजरेसमोर ठेव. असं प्रोत्साहन देणारी ती पत्र तिला खूप मोठा ठेवा वाटतात.

पहिला महिना झाल्यावर, दुस–या शिबिराला जायचं की नाही यासाठी टेस्ट होत्या. सिट अप्स.. १०० मी पळणं… अशा सर्व निकषांवर ही परीक्षा घेतली गेली. भैरवी अर्थातच त्यात निवडली गेली. इंडिया टीम सिलेक्ट झाली, खेळाडूंचे पासपोर्ट बनवले गेले, इंडियाचा ट्रॅक सूट तयार झाला… पण आधीच्या सेऊलच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अतिशय सुमार कामगिरी केल्यामुळे राजीव गांधींनी त्या वर्षी कुठल्याही भारतीय खेळाडूंना स्पर्धेत भाग घ्यायची परवानगी नाकारली.

आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची हातातोंडाशी आलेली संधी गेली. अर्थातच अतिशय वाईट वाटलं, पण किमान त्या शिबीरात खूप काही मिळालं असं ती मानते. खेळानं असा सकारात्मक दृष्टीकोन दिला.

बारावीत असताना हिला रेल्वेनं नोकरी देऊ केली. रेल्वे चांगल्या खेळाडूंना नोकरी देत असे. पण हिला महाराष्ट्राकडून खेळण्यात रस होता आणि नोकरी करायची नव्हती. पण त्यामुळे बरेचसे चांगले खेळाडू रेल्वेत गेले आणि त्यांची टीम अतिशय तगडी होत गेली.

भैरवी दोन शालेय, दोन ज्युनिअर आणि चार सिनिअर नॅशनल स्पर्धा खेळली. सिनिअर्स खेळण्याच्या निमित्तानं कटक, त्रिचूर आणि जयपूरला जाणं झालं, पैकी शेवटची जयपूरची स्पर्धां खेळली ती लग्नानंतर. १९८९ मध्ये. महाराष्ट्राची कप्तान म्हणून. त्रिचूरच्या राष्ट्रीय स्पर्धांपाठोपाठ म्हैसूरला नॅशनल गेम्स झाल्या. नॅशनल गेम्स म्हणजे सर्वोत्तम चार संघ आपापसात खेळतात. अशा पहिल्या नॅशनल गेम्स १९८५ मध्ये दिल्लीला झाल्या होत्या. म्हैसूरला महाराष्ट्राचा संघ जिंकला आणि सांघिक विजेतेपदसुद्धा पटकावलं.

सर्व स्पर्धा, त्यांची २-३-४ आठवड्यांची शिबिरं मिळून आठ महिने घराबाहेर राहणं व्हायचं. त्यात कधी आजारपणं यायची, सतत बाहेरचं खाऊन कधी पोट बिघडायचं, मुलींच्या मासिक पाळीच्या तक्रारी असायच्या, पण सर्वात महत्त्वाचा असायचा तो खेळ. त्यासाठी सगळं सहन केलं जायचं. कोच आईवडिलांची माया द्यायचे कधी स्पर्धकच मैत्रिणी होऊन मदतीला उभ्या राहायच्या. असे अनेक अनुभव जगायला शिकवतात, असं ती सांगते.

बी.कॉमच्या शेवटच्या वर्षी हिच्या आधीच्या बऱ्याच परीक्षा खेळामुळे बुडल्या होत्या. अशा मुलांचं आतापर्यंत वर्ष वाया जायचं, पण त्यावर्षीपासून युनिव्हर्सिटीनं अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, रणजी वगैरे खेळाडूंसाठी नंतर विशेष परीक्षा घेतली होती, त्यांच्यासाठी स्वतंत्र पेपर्स काढले होते. अशी सर्व खेळांची मिळून दहा मुलं होती, आणि तेव्हा भैरवीच्या इतक्या परीक्षा बुडल्या होत्या की सलग बावीस पेपर्स द्यावे लागले होते, तरीही तिला त्यात डिस्टिंक्शन मिळालं. मुळात भैरवीला जसा खेळ आवडायचा तसा अभ्याससुद्धा आणि खेळतोय म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं असं कुणी म्हणायला नको, म्हणून ती दोन्हींचा तोल व्यवस्थित सांभाळायची. त्यावेळी कॉलेजनं हिचा दोन्हीत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल सत्कार केला होता.

आर्टिकल्स करताना कीर्तने पंडित असोसिएटसच्या रवी पंडितांना हिचं खूप कौतुक. राष्ट्रीय खेळाडू असून सी.ए. व्हायच्या जिद्दीनं अभ्यास करते, यासाठी ते हिला बऱ्याच सवलती देत. हिचा कुठे फोटो छापून आला, बातमी आली की ती कात्रणं समोर मांडून ठेवायला सांगत. ही जशी लाडकी तसंच त्यांना जेमतेम विसाव्या वर्षी सी.ए. झालेल्या हर्षूचं कौतुक, पुढे दोघांचं लग्न झाल्यामुळे जणू त्यांच्या लोकाचा आणि लेकीचा संसार सुरु झाला. आजही त्यांचा आशीर्वाद या दोघांना महत्त्वाचा वाटतो.

खेळ आणि सी.ए. या कुतरओढीत सी.ए. मात्र जमेना आणि आतापर्यंत शैक्षणिक यश कायमच चांगलं असल्यानं सी.ए. चे पेपर्स न सुटण्याचं हिनं फार मनाला लावून घेतलं. दोन प्रयत्न केल, पण मग तो मार्ग आपला नाही, असं ठरवून त्यातून मन काढून घेतलं.

लग्नानंतर खेळ सुरु ठेवला. स्टेट चँपियनशिपसाठी सोलापूर, पुढे नॅशनलसाठी कँप हे सगळं तिन केलं. भैरवीची जयपूरची स्पर्धा बघायला तेव्हा दिल्लीला असणारे तिचे सासू सासरे खास आले होते.

१९८९ ला तिची शेवटची राष्ट्रीय  स्पर्धा, त्याच्या पुढच्याच वर्षी १८९८९-९० चं तिला शिवछत्रपती जाहीर झालं तेव्हा तिच्या आईबाबांइतकाच सासरच्या मंडळींना आनंद झाल्याची तिची आठवण आहे.

१९९१ ला पारितोषिक वितरण समारंभ कोल्हापूरला झाला तेव्हा तिथे प्रेक्षक म्हणून आईबाबा-सासूसासरे-हर्षु आणि ६ महिन्यांची तन्वी हजर होते.

पुढे २ वर्षांनी शौनकचा जन्म. क्लब लेवलकर, राज्य पातळीवर स्पर्धात्मक खेळ १९९५ पर्यंत सुरु होता. मुलं थोडी मोठी झाल्यावर हिला वाटू लागलं, आपल्याला आपल्या कोचनं जसं घडवलं तसं आपणही इतरांसाठी काहीतरी करायला हवं. मग भारती निवासच्या मैदानावर बास्केटबॉल कोचिन सुरु केलं. सुरुवातीला उन्हाळयाच्या सुट्टीत शिबीर घेतलं आणि मग सलग १५ वर्ष भैरवी बास्केटबॉल शिकवायला जायची. सोबत मुलांना पण घेऊन जायची. दोन्ही मुलं शालेय राष्ट्रीय स्पर्धा खेळली, शौनक ज्युनिअर नॅशनल पण खेळला. भारती निवासच्या मुलांचीही खेळात उत्तम प्रगती झाली. पुष्कळ मुलं आंतरशालेय, आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळली.

तन्वी कॉर्पोरेट लॉयर आहे. नुकतंच तिचं लग्न झालं, शौनक अमेरिकेत जाऊन इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनीअर झाला, पदव्युत्तर पदवी घेऊन तिथेच नोकरी करतो. घरात आता परत आम्ही दोघं राजाराणी.

या सगळया यशस्वी आयुष्याकडे मागे वळून बघतात तिला सर्वात महत्वाचा वाटतो तो आईचा पाठिंबा, प्रोत्साहन आणि कष्ट. ही मुलगी आठ महिने पुण्याबाहेर असताना शाळेचा अभ्यास काय सुरु आहे, त्याच्या वह्या उतरवून घेण्यापासून, नव्या वर्षांचे प्रवेश घेणं, गावाहून आल्यापासून पुन्हा जाईपर्यंत कपडे धुवून, इस्त्री करुन देण्यापर्यंत सगळं आई प्रेमानं करायची. पातियाळाच्या शिबिरात ही असताना पंजाब अशांत म्हणून मनातून लेकीची काळजी, त्यात कुठल्याच टीम परदेशात जाणार नाहीत, अशा बातम्या तर टी.व्ही. नं दिल्या, पण झेलम एक्सप्रेसनं हिला परत पोचेपर्यंत मुलांशी कुठलाही संपर्क नसल्यानं आई वडिलांनी केवढी काळजी केली असेल, हे तिला स्वत: आई झाल्यावर जाणवलं. मुलं झाल्यावरसुद्धा स्पर्धात्मक खेळ, सराव सुरु असताना आईचा सहभाग होताच कारण सासूसासरे पुण्यात नव्हते, ते बदलीच्या गावी असत, दिल्ली, कोल्हापूर, बनारस असं कुठे कुठे.

कॉलेजमध्ये गेल्यावर बास्केटबॉल खेळाडू अचला भिडे हिची जिवलग मैत्रीण. तिला बास्केटबॉलमध्ये हिच्याइतकं उत्तुंग यश मिळाले नसलं तरी त्याची बोच मुळीही न ठेवता तिनं हिला अत्यंत महत्वाची मदत सतत केली. यासाठी केवढं मोठं मन हवं. नोट्स काढून ठेवणं, परीक्षेसाठी अभ्यासात मदत करणं वगैरे. आजही अमेरिकेत स्थायिक अचलाची मैत्री टिकून आहे.

खेळानं भैरवीला असं खूप काही भरभरुन दिलं.  अमृत पुरंदरेंसारखे कोच, भारतभर फिरणं, भरपूर यश, गावोगावचे अनुभव, अनेकांची कौतुकं. शाळेतल्या बापट बाई, रणदिवे बाई यांची तिला अजून आठवण येते. या रणदिवे बाईंचा हिच्यावर एवढा जीव, की शाळेत कुणीकुणी बाईंना पेढे द्यायचे, त्या त्यांच्यातला पेढा कायम हिच्यासाठी राखून ठेवणार. असं प्रेम ही केवढी पुंजी.

शाळकरी आयुष्यापासून खेळ आणि अभ्यास यांचे वेगळे कप्पे करणं, एकातलं यश किंवा अपयश तिथेच विसरुन त्याची दुसर–यात गल्लत न करणं, दोन्ही ठिकाणी पाळायची निरनिराळी शिस्त आणि मुळात पाय जमिनीवर ठेवणं.

भैरवी स्वत: यशस्वी, प्रथितयश व्यावसायिकाची पत्नी, यशस्वी मुलांची आई असं सगळं चढत्या क्रमावर असूनसुद्धा तिचे पाय अजूनही जमिनीवर नव्हे, तर चक्क मातीत आहेत आणि नजर मात्र बास्केटकडे लागलेली.

(पूर्वप्रसिद्धी – विपुलश्री मासिक) 

  • नीलिमा बोरवणकर

२०१, प्लॉट नं. १२, रघुकुल सोसायटी,

गिरिजाशंकर विहार समोर,

भागीरथी हॉस्पिटल समोर,

कर्वेनगर, पुणे – ४११०५२

फोन (०२०) २५४४२११८

मो.क्र. ९८२२५५६२५१

भैरवी घाटे : ९७६२० २३०८०

PC:google

Main Menu