सुट्टीच्या दिवसात मुलांसाठी खास …
मुलांची कल्पकता , त्यांची बौद्धिक क्षमता हि त्यांच्या वयोगटानुसार बदलत असते. म्हणूनच मुलांवर त्या त्या वयात योग्य संस्कार झाले तर त्यांचा विकास उत्तमप्रकारे होऊ शकतो. आता वार्षिक परीक्षा संपून सुट्ट्या सुरु होतील. ह्या सुट्ट्यांमध्ये मुलांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवले तर त्यांचा वेळाही छान जाईल आणि त्यांची बौद्धिक प्रगती होण्यासही मदत होईल.
वयोगट ४ ते ८ वर्षे :
साधारणत: या वयोगटातील मुलांना आपल्या आवडीप्रमाणे गोष्टी करायला खूप आवडते. त्यामुळे यांना चित्रकला , मातीकाम , योगा , संगीत , नृत्य , पोहणे अशा गोष्टी शिकण्यात खूप रस असतो.
चित्रकला : या वयात मुलांना वेड्यावाकड्या रेषा काढून त्या रंगवायला खूप आवडते. अशाने त्यांच्या कल्पकतेचा विकासही होतो.
मातीकाम : मातीकाम करण्यात मुले तासान तास गुंगतात. मुलांना मातीपासून भांडी, वस्तू करायला शिकवतात. ज्यांना मातीत खेळायची आवड आहे अशी मुले अशा शिबिरांमध्ये छान रमतात.
योगा : मुलांना व्यायामाची आवड असेल तर मुले नक्की या क्लासला रमतील. शिवाय यामुळे मुले उत्साहीही होतात.
संगीत , नृत्य : हल्ली बॉलीवूड डान्स , सिंगिंग असे भरपूर क्लासेस जागोजागी असतात. शिवाय उन्हाळी शिबिरांमध्ये खास ह्या कला शिकवल्या जातात. यातून मुलांचा नेमका कल कुठे आहे तेही लक्षात घेत येते.
वयोगट ९ ते १३
या वयातील मुले थोडी काळती, समजूतदार झालेली असतात आपली आवड कशात आहे हे त्यांना काळत असते. त्यामुळे तशाच प्रकारचे छंद वर्ग मुलांसाठी उपयुक्त ठरतात.
अभिनय : जर मुलांना अभिनयाची आवड असेल तर त्यांना अभिनयाच्या कार्यशाळेत पाठवा. त्यामुळे त्यांचा अभिनय सुधारेल, बोलण्यात अजून लकब येईल. सुट्टी आनंदात जाईल .
परदेशी भाषा :
जर मुलांना वेगवेगळ्या भाषा बोलायची आवड असेल तर त्यांना एखादी परदेशी भाषा शिकण्यासाठी पाठवा. त्याने त्यांच्या ज्ञानात तर भर पडेलच पण पुढील आयुष्यातही त्याचा उपयोग होईल .
याशिवाय क्रिकेट , खो खो , फुटबॉल, टेनिस असे मैदानी खेळ हि या वयात खूप छान पद्धतीने शिकाता येतात. सायन्स क्लब , भाषा , किंवा इतर शैक्षणिक शिबिरांमुळे ही मुलांची चांगली प्रगती होते. सुट्टीत रोज शुद्धलेखन काढायची सवय कोणत्याही वयात लाभदायीच ठरते. अक्षर आणि भाषा दोन्ही सुधारण्यासाठी ती एक उत्तम पद्धत आहे. शिवाय सुट्टीत मुलांनी वेगवेगळ्या विषायांवरील पुस्तके वाचली तर त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. मग लागा कामाला आणि धम्माल करा सुट्टीत !!!