नागपंचमी (श्रावण शुदध पंचमी)
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे प्राणीसृष्टी बद्दल प्रेम, दया , कृतज्ञता व्यक्त करणे .गावात शेतकऱ्याना नाग साप खूप उपयुक्त ठरतात . शेतीचा नाश करणाऱ्या प्राण्यांना नाग खाऊन शेताच आणि पिकाच रक्षण करतो . नागाला म्हणून क्षेत्रपाल म्हणतात .या दिवशी बायका नागाची पूजा करतात . जिवंत नागाऐवजी एका कागदावर किवा पाटावर नऊ नागांच चित्र शाईने किवा गंधाने काढून , दूध – लाह्यांचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करतात . काही ठिकाणी मातीच्या नागांची पूजा केली जाते . रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग अंगणात काढतात. चंदनाने पाटावर पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र
स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लाची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवद्य दाखवला जातो. या सणाल विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे..
नागपंचमी साठी वेदकालापासून अनेक प्रथा आहे. त्यांपैकी एक कथा..सत्येश्वपरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्व र हा तिचा भाऊ होता. सत्येश्वीराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्ववरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्ववरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..तसेच या सणाची दुसरी पौराणिक कथा अशी आहे की यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी, दुष्ट नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्व वातावरण विषारी होई. ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुदध पंचमी (नागपंचमी). नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुध्दा पूजा करतात.
या दिवशी सर्पाकृती भाज्या न खाण्याची प्रथा आहे . तसेच विळी , चाकू, सुरी तसेच तवा न वापरता अन्न केवळ शिजवून ते खाण्याची प्रथा आहे . साप, नाग यांना देव मानल्यामुळे तवा चुलीवर ठेवणे, विळीने चिरणे, तळणे इत्यादी या दिवशी निषिध्द मानले आहे कारण हे करताना चुकून साप किंवा नाग यांना इजा पोचण्याची शक्यता असते असे मानले जाते. नागपंचमी दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही. काही ठिकाणी प्रत्यक्ष वारुळाची पूजा केली जते. पण ते गावातच शक्य आहे . नागपूजेने नागदंशाच भय नष्ट होत असा समज आहे . या दिवशी नाग कुणालाही दंश करत नाही.
या सणाला नववधू माहेरी येतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रीया हातावर मेंदी काढतात व नवीन बांगडया भरतात. खेडेगावातून झाडाला दोर बांधून मुली झोके घेण्याचा खेळ खेळतात, झिम्मा फुगडी खेळतात.
या दिवशी गारूडी लोक शहरात नाग घेऊन रस्त्याने हिंडतात व त्यांना घरी बोलावून लोक त्याची पूजा करतात. या दिवशी पुरणाची किंवा साखर-खोब-याची दिंडे बनवतात.
प्रचंड मोठी जत्रा महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला भरते. येथे जिवंत नाग अंगाखांदयावर खेळवून नागपंचमी साजरी करतात . आसपासच्या खेडयातील लोकांसकट परदेशी पाहुणे सुध्दा तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. मोठा चमत्कार म्हणजे कितीही विषारी नाग-साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत .