पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल चे शोभा डे, तुषार गांधी ,राहुल कराड ,नीलिमा दालमीया इ. मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

पुणे – ‘‘कमी वेळांत तत्काळ आकर्षित करणारे साहित्य लिहिले गेले पाहिजे. त्यातूनच साहित्यात आणि वाचनात स्वारस्य गमावत चाललेल्या तरुण पिढीचे लक्ष केंद्रित होईल. म्हणूनच खिळवून ठेवणाऱ्या साहित्याची आज गरज आहे,’’ असे प्रतिपादन लेखिका शोभा डे यांनी सहाव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या उद्‌घाटनप्रसंगी शुक्रवारी केले.  

या प्रसंगी इटालियन राजदूत लोरेन्जो ॲन्जोलोनी, विश्वकर्मा पब्लिकेशनचे भरत अग्रवाल आणि एमआयटीच्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, संयोजिका मंजिरी प्रभू आदी उपस्थित होते. इंग्रजी साहित्याचा प्रचार आणि प्रसार या साहित्य फेस्टिव्हलमधून केला जातो. या वर्षी फेस्टिव्हलची थीम ‘कुटुंब’ ही आहे. ३० सप्टेंबरपर्यंत फेस्टिव्हल चालेल. या तीन दिवसादरम्यान साहित्य क्षेत्रातील विविध साहित्यीक, साहित्यप्रेमी फेस्टिवलला भेट देतात. येथे आयोजित विविध सत्रातून मान्यवर संबोधित करतात. 

शोभा डे म्हणाल्या, ‘‘मी एका मध्यमवर्गीय घरात लहानाची मोठी झाले. ज्या घरात माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांसाठी कधीच खेळणी किंवा बाजारातील इतर वस्तू न आणता केवळ पुस्तकं भेट दिलीत. मला पाच नातवंडे आहेत. त्यांना मी दररोज निदान पाच मिनिटे तरी वाचण्यासाठी सांगते. आजच्या तरुण पिढीने वाचनातील स्वारस्य गमावले आहे. तेव्हा ही सवय प्रत्येकाने आपल्या घरातील मुलांना लावणे गरजेचे आहे.’’ यासोबतच डे यांनी साहित्य क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत ‘पिल्फ’ सारख्या साहित्य संमेल्लनाचे महत्त्व सांगत या इंग्रजी साहित्य संमेल्लन आणि विश्वकर्मा पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या इंग्रजी साहित्य स्पर्धेसोबतच मराठी साहित्य स्पर्धेविषयीही सुचविले. 

‘द महात्मा टुडे’ या विषयावरील सत्रात महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी आणि लेखिका नीलिमा दालमिया-आधार यांच्याबरोबर ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांनी संवाद साधला. गांधी म्हणाले, ‘‘बापू यांनी नेहमी युद्ध शमविण्याचा प्रयत्न केला. म्हणून सत्य, अहिंसा ही मूल्य समाजात आहेत. बापू जाऊन आज सत्तर वर्षे झालीत, तरी आपण संपलेल्या गोष्टींचाच पाठलाग करीत आहोत. आज भगतसिंग, लाला लजपत राय, नेताजी बोस यांच्याविरुद्ध बापू, असा संघर्ष निर्माण केला जातो. पण, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न आजच्या पिढीने केला पाहिजे.’’

नीलिमा दालमिया यांनी ‘द सीक्रेट डायरी ऑफ कस्तुरबा’ या त्यांच्या पुस्तकाचा उल्लेख करीत बापूंच्या जीवनात बा (कस्तुरबा गांधी) यांचे महत्त्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगितले. दालमिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्या प्रमाणे, ‘बापूंसोबत बा यांनी आपले जीवन वाहिले. पण त्यांचा उल्लेख हा बापूंची पत्नी म्हणूनच केला जातो. तर बा यांचे अस्तित्त्व एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. बा या कुटुंबाला एकत्रित आणणाऱ्या, काळजी घेणाऱ्या तर होत्याच पण सोबतच त्या विद्रोही देखील होत्या. पत्नी म्हणून त्यांनी खुप सहन केलं आहे. बा यांना मी माझ्या आईत बघते. तिच्याही वाट्याला असाच कुटुंब संघर्ष आला आहे. मला वाटतं, बा ही व्यक्तिरेखा मी निवडली नाही, तर त्या व्यक्तिरेखेने मला निवडलं आहे.’ पुस्तकातील या त्यांच्या लिखानातील मुद्दे तुषार गांधी यांनी खोडून काढले. तुषार गांधी म्हणाले, ‘ बापू आणि बा यांच्या नात्यात समंज्यस पणा होता. बा यांची प्रकृती खराब असताना बापूंनी त्यांची सुश्रूषा केली होती. बा यांनी बापूंवरील हक्क नेहमी ठमेठोकपणे सांगितला आणि बापूंनीही तो नेहमी आपलासा म्हणून स्विकारला.’ 

राहुल कऱ्हाड यांनी अभियांत्रिकी आणि मेडीकलच्या विद्यार्थ्यांचा समग्र दृष्टिकोन असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘कला, साहित्य आणि अध्यात्म यांचा मेळ अभ्यासक्रमात असावा. या घटकांच्या अभ्यासाने माणसाला पुर्णत्व येईल. साहित्य संमेल्लन हे महाविद्यालये किेंवा विद्यार्थी संस्थेत व्हायला हवे. जेणेकरुन तरुणाईला ते अधिक जवळचे वाटेल आणि स्वारस्य निर्माण होईल. सिनेमा, संगीत, जीवनचरित्र या गोष्टींना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे.’ तर लोरेन्जो अॅन्जोलोनी यांनी आपल्या भाषणाची सुरवात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या वचनाने केली. ते म्हणाले की, ‘आपले कौशल्य आपण कुटुंब म्हणून कसे एकत्र येऊ शकतो यासाठी लावले पाहिजे आणि कुटुंबाचं नातं घट्ट केलं पाहिजे.’ अॅन्जोलोनी हे भारत आणि इटालियन संबंधाचे 70 वर्ष मैत्रीपुर्ण संबंध साजरे करण्याच्या निमित्त देखील येथे आले आहेत.
Inputs from :  सकाळ 
PC:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu