फटाक्यांच्या धुरापासून सावधान !!
दिवाळी आली की नवीन कपडे , खाऊ आणि फटाके याला वेगळे करणे अशक्यच ! पण मजा म्हणून उडवत असलेल्या या फटक्यांमुळेच आपल्याला अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. फटाके व त्यापासून निर्माण होणाऱ्या कानठळ्या बसवणारे आवाज व धूर यामुळे श्वसनाचे विकार, त्वचारोग, बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो. फटाक्यांचा धूर फुफ्फुसात शिरल्याने दमा आणि अस्थमाचे विकार बळावतात.एवढेच नव्हे तर फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या, भाजल्याने जखमा होण्याच्या घटना घडतात.फटाके फुटल्याने वातावरणात धूर पसरतो. परिणामी पर्यावरण प्रदूषण होते. दमा आणि अस्थमाच्या रुग्णांना याचा प्रचंड त्रास होतो. काही फटाक्यांमधून निघणारा धूर विषारी स्वरुपाचा असतो. त्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. ज्यांना दमा किंवा अस्थमाचा त्रास नाही, त्यांना न्यूमोनिया, त्वचेचे विकार तर कधीकधी मानसिक संतुलन ढासळण्याची स्थिती निर्माण होते. काहींना थंडी वाजून ताप येतो. उलटय़ा होणे, डोळे येणे असा त्रास होऊ लागतो. फटाक्यांमध्ये कार्बन मँगनीज, सल्फ र आणि अन्य रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे शारीरिक विकार बळावतात. फटाक्यांमुळे होणारी उष्णता एवढी तीव्र असते की डोळ्यांना गंभीर हानी पोहोचून अंधत्व येण्याची देखील शक्यता असते. जळत्या फटाक्याचा धूर डोळ्यात गेल्याने काळी बुबुळे पांढरी होतात. त्यामुळे भविष्यात आंधळेपणा येण्याची शक्यता असते. धमाका करणाऱ्या फटाक्यांमुळे मेंदू व कानावर परिमाण होतो. माणसाचा मेंदू व कान ९० डेसिबल्सपर्यंतच आवाज सहन करू शकतात. बाजारात उपलब्ध असलेले मोठय़ा आवाजाचे फटाके १२५ डेसिबल्सपर्यंत आवाज करतात. त्यामुळे मनुष्यास कमी प्रमाणात किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. तेव्हा लहान मुलांना, वृद्धांना व रुग्णालयातील रुग्णांना आवाजाच्या प्रदूषणाचा मोठा त्रास होणार नाही, याकडे लक्ष ठेवावे . दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा, परंतु, आनंदाच्या भरात पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.

