गौरीपूजन

गणपती उत्सवाच्या काळात अनुराधा नक्षत्र असलेल्या दिवशी गौरी बसवल्या जातात . ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन केलं जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन होते . आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे हा त्यामागचा हेतू असतो.कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाऊन चार खडे ताम्हणात घेउन ते खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालने आवश्यक आहे .

खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे ज्येष्ठा व कनिष्ठा असे दोन मुखवटे असतात. दोन सवाष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून व मागील दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली” किंवा ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली, आली तर येऊ द्या सोनपावली होऊ द्या,” असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.
गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी, खोब-याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे, लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात आणि पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ, दुस-या दिवशी पुरणपोळी आणि तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.
तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवून त्यांचे विसर्जन करतात.
देशस्थांमध्ये गौरींचे अनेक प्रकार असतात . कुणाच्या गौरींचे मुखवटे पितळेचे, कुणाचे शाडूचे, तर कुणाचे सुगडावर नाकडोळे रंगवलेले. कुणाच्या गौरींना हात नाहीत, तर कुणाच्या गौरींचे डोक्‍यावरून पदर. कुणाच्या गौरींची पोटे लाडू-करंज्यांनी भरायची, तर कुणाची खारीक-बदामांनी. काही घरांमध्ये एकावर एक दोन कळश्‍या ठेवून त्याला साडी नेसवून त्यावर सुगडाचा चेहरा केला जातो, तर काही ठिकाणी लाकडी काठ्या, लोखंडी स्टॅंड वापरले जातात. कुणाकडे हे सर्व सजावटीसह भिंतीवर रंगवून साकारलेले असते, तर कुणाकडे एक गौर खुर्चीवर बसवलेली असते. कुणाकडे गणपतीची रवानगी केल्याशिवाय गौरी येत नाहीत, कुणाकडे गणपती असतानाच गौरी येतात व भोजनाच्या दिवशी गणपती दोन्ही गौरींच्या मध्ये बसविला जातो. गौरी हे पार्वतीचे रूप असल्याने, तिचे बाळ म्हणजे गणपती गौरींच्या मध्ये बसतो. कुणाकडे गणपतीपाठोपाठ गौरी येतात व बरोबर विसर्जन होते.
भाद्रपदातली गौर ही ज्येष्ठा-कनिष्ठा, माहेरवाशिण म्हणून ओळखली जाते. आल्या दिवशी तिला शेपूची किंवा मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो. दुसऱ्या दिवशी भोजनाचा कार्यक्रम असतो. त्यात देशस्थांमध्ये पाच पक्वान्ने, सोळा भाज्या व इतर अनेक पदार्थांची रेलचेल असते. आपल्याप्रमाणे देवीलाही मिष्टान्ने करून वाढावीत हा त्यामागचा भाव. गौरींच्या निमित्ताने दोन सुवासिनींना जेवायला बोलावून त्यांच्या रूपाने दोन गौरीच भोजनाचा आस्वाद घेत आहेत, असे मानले जाते .

Main Menu