श्रावण अमावस्या – पिठोरी अमावस्या

मातृत्वाचा गौरव करण्याचा, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिठोरी अमावस्या होय.श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांची मुले जगत नाहीत अशा फक्त सुवासिनी स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात.ज्या घरांमध्ये गणपती येतो, अशा घरांमध्ये ‘पिठोरी’चं पूजन होतं.या दिवशी दिवसभर उपास करुन संध्याकाळी आंघोळ करुन सुवासिनी स्त्रिया ही पूजा करतात. विशेषत: चौसष्ट योगिनींची पूजा यामध्ये करतात. चौरंगावर ब्राह्मी, महेश्र्वरी, वैष्णवी, वाराही, कौमारी, इंद्राणी, चामुंडा या सात शक्ती देवतांची स्थापना करतात. पुढे कलशावर चौसष्ट सुपार्‍या तांदूळाने भरलेल्या ताम्हणात चौसष्ट कलांचे प्रतिक म्हणून मांडतात. योगिनी म्हणजे अशा कला ज्यांमुळे उपजिवीका होते . पूर्वी पिठाच्या मूर्ती करत, पण आता यांच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात.
या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला ‘पिठोरी अमावस्या’ म्हणतात.बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य. 

“अखंड सौभाग्य आणि दिर्घायु पुत्र” यासाठी प्रार्थना करतात. 

खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण घरातील मुलांसाठी करतात.पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती करतात, खिरीच्या वाटीवर पुरी झाकतात नंतर पूजा करणारी स्त्री ते आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, “आतीत कोण?” ( अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन तो नैवेद्य हातातुन घेतात व पूजा पूर्ण करतात. 
ही अमावस्या स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी आहे. 

देशावर या दिवशी बैलपोळा साजरा करतात . तेथील शेतकरी आपल्या बैलांना या दिवशी देवतेचा मान देतात . सकाळी त्यांना आंघोळ घालतात . त्यांच्या शिंगांना बाशिंग बांधतात .अंगावर रंगीबेरंगी ठिपके काढतात . गळ्यात सुंदर घुंगरमाळा घालतात ,पाठीवर झूल टाकतात . देवासारखं त्यांना सजवतात आणि पूजा करून ओवाळतात . पुरणपोळी भरवतात. या दिवशी बैलांना मायेने वागवतात . त्यांच्याकडून कोणतेही काम करवून घेत नाहीत .

Main Menu