कोरोनाचा विळखा
चीनमध्ये जन्मलेल्या एका छोट्या विषाणूने संपूर्ण जगाला फैलावर घेतले आहे.आज जगभरात लोकांना आपापल्या घरात बसून राहण्याची वेळ आली आहे .कोणी कधी कल्पनाही केली नसेल की एवढ्या छोट्या विषाणूमध्ये सारे जग जवळजवळ बंद पाडण्याची, थांबवून ठेवण्याची ताकद असेल, असा विचार आपण करत होतो म्हणूनच चुकलो .निसर्गाने नेहमी हे दाखवून दिले आहे की माणूस निसर्गाचा भाग आहे.तो निसर्गापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही.
खरं तर खूप सारे विषाणू, जीवाणू सृष्टीत एकमेकांच्या शरीरात त्या शरीराला आपले घर आहे असे समजून काही त्रास न देता रहात असतात.आपल्या शरीरात छोटे छोटे व्हायरस , बॅक्टेरिया रहात असतातच .आपण आणि ते एकमेकांना फारसा त्रास न देता आपले आयुष्य जगत असतो.
पण गोंधळ तेव्हा होतो जेव्हा आपण नको ते करायला जातो.कोरोना विषाणू असाच वटवाघळांमध्ये राहात होता ज्याचा वटवाघुळांना कदाचित काही त्रास होत नव्हता कारण त्यांच्या शरीरात त्या विषाणूचा उद्रेक होऊ नये म्हणून पेशींची व्यवस्थित यंत्रणा कार्यरत असेल.
खरंतर वटवाघळे गुहेत असतात, सहसा मानवी सहवासात येत नाहीत. पण चायनामध्ये जेव्हा गुहेतील वाटवागळे बाहेर काढून त्यांचा अन्न म्हणून उपयोग होऊ लागला तिथेच सारी चूक घडली.
सध्या नेटवर बरेच तर्क वितर्क चालत आहेत की चीनने हे तयार केलेले बायो वेपन आहे , चीन वटवाघुळांना खायला लागला आणि या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केला वगैरे वगैरे . कारण काहीही असेना खरा मुद्दा आता यापासून मानव जातीचे रक्षण करणे हा उरला आहे.
त्यासाठी सरकारने उपाय सांगितले आहेतच जे तुम्हाला या विषाणूंपासून दूर राहण्यास मदत करतील जसे ,
– सोशल डिस्टसिंग – म्हणजे एकमेकांपासून लांब राहा जेणेकरून कोणाला याचा संसर्ग झाला असेल तर तुम्हाला होऊ नये.
– थोड्या थोड्या वेळाने आपले हात साबणाने व पाण्याने धुणे.
-विनाकारण घराबाहेर पडू नका घरातच रहा .
– नाक ,कान , डोळे यांना हात लावणे टाळा.
कारण हा व्हायरस नाक ,डोळे, कान यामधून आपल्या श्वासनलिकेत जातो.तिथून खाली फुफ्फुसांपर्यंत जाईपर्यंत तो पेशींमध्ये शिरतो, स्वतःच्या कॉपीज बनवतो आणि फुप्फुसांमध्ये बिघाड करून श्वासोश्वासाच्या प्रक्रियेत बाधा आणतो आणि शेवटी माणसाचा मृत्यू होतो. पण जर एखाद्याची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपल्या शरीरात लढणाऱ्या पांढऱ्या पेशी पटकन त्याचा खात्मा करतील. त्यामुळे याची लक्षणेही काही जणांना न जाणवता ते बरे होतात पण प्रतिकार शक्ती कमी असेल तर पुढचे सारे सुरू होते.
म्हणूनच आपली प्रतिकारशक्ती वाढवणे आणि पूर्वीपासून चालत आलेले काही घरगुती उपाय करणे सध्याच्या परिस्थितीत अधिक हितावह आहे.जसे ,
– कोमट पाण्यात हळद मीठ घालून किंवा पाण्यात हळद , मीठ घालून उकळून कोमट करून त्याच्या गुळण्या करणे .
सर्वांनीच सध्या सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे करावे.
हळद ही अँटी व्हायरल आहे आणि कोमट पाणी आणि मिठामुळे घशामध्ये जर काही असेल तर ते तिथल्या तिथेच मरतील , खालपर्यंत पोचणार नाहीत.
-हळद गुळाची गोळी करून जिभेखाली ठेवून त्याचा रस गिळत राहिल्यानेही चांगला लाभ होतो.
आता तुम्ही काय खावे ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल ?
प्रतिकार शक्ती म्हणजे तुमच्या पांढऱ्या पेशी व इतर व्हायरस विरुद्ध प्रतिकार करणाऱ्या पेशींची क्षमता वाढवण्यासाठी अन्नातले मॅग्नेशियम ,फॉस्फरस, पोटॅशियम, सोडिअम, लोह , झिंक हे धातू आणि विटामिन A,D,E,B5, B9 आणि Vitamin C
हे विटामिन्स मुख्य असतात कारण हे आपल्या डिफेन्स सिस्टीमला अधिक सामर्थ्यवान करण्याचे काम करतात.
या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पदार्थांमधून आपल्याला मिळतात त्यापैकी सध्याच्या काळात तुमच्या आहारात नक्की असावेत असे पदार्थ इथे देत आहोत.
गहू तांदूळ ज्वारी बाजरी अशी धान्य ,डाळी तुरडाळ ,मूगडाळ ,मसूर डाळ अशा डाळी , कडधान्य, शेंगदाणे, बदाम, हिरव्या पालेभाज्या, चीज, बटाटे, लिव्हर मीट, वटाणे,अंड्याचा पिवळा बलक, अंडी, पिवळय़ा व केशरी रंगाची फळे व भाज्या ,रताळी ,फ्लॉवर ,टोमॅटो, ब्रोकोली अशा भाज्या.
यापैकी बरेच पदार्थ आपण रोजच्या जेवणात खात आहोतच. सध्या शेंगदाणे आणि सायट्रस फ्रूट्स जास्त खावीत. संत्री , मोसंबी, लिंबू ,यांसारखी फळे टॉमेटो वगैरे जेणेकरून तुम्हाला सी विटामिन भरपूर प्रमाणात मिळेल .रोज लिंबू पाणी पिणे ही लाभदायक ठरेल.
खाण्याबरोबरच काही योगासने, कपालभाती आणि ओमकार यासारखे प्राणायामाचे प्रकार रोज केल्याने तुमच्या फुफुसाची क्षमताही वाढेल.
या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची आठवण करून देतात, आपली भारतीय जीवनपद्धती उत्तम होती,आहे आणि राहील.जमलं तर आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ मुळीच तोडू नका.
रोज संध्याकाळी देवासमोर रामरक्षा म्हणा. रामरक्षा हा अँटीवायरल मंत्र आहे असे म्हणतात. राम नामाच्या आणि र च्या उच्चराने सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि त्यांच्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढते. म्ह्णूनच २१ दिवसांच्या या वेळेचा सदुपयोग करून घ्या. मुलांशी खेळा, त्यांना चांगली स्तोत्रे शिकवा जेणेकरून त्यांचे उच्चर स्पष्ट होतील आणि मेंदू तल्लख होईल. कोणत्याही गोष्टीची सवय व्हायला २१ दिवस लागतात असे म्हणतात , मग अनायासे हे २१ दिवस मिळाले आहेत तर लावून घ्या कि राव चांगल्या सवयी !!!!