‘कॉमन मॅन’ चे जनक,सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण ©मुकुंद कुलकर्णी”

“I am very happy with my politicians . They did not take care of the country , but they took care of my job . “

‘ कॉमन मॅन ‘ चे जनक , सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा २४ ऑक्टोबर हा  जन्मदिवस . २४ ऑक्टोबर २०२०  पासून त्यांचे  जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले.  दि.२४ ऑक्टोबर  १९२१ रोजी म्हैसूर येथे रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांचा जन्म अय्यर कुटुंबात झाला . सुप्रसिद्ध लेखक आर.के.नारायण यांचे ते लहान बंधु . आठ भावंडातले ते सर्वात लहान .

चित्रकलेची आवड लक्ष्मण उपजतच घेऊन आले . लहानपणापासून त्यांना चित्रं काढायचा छंद होता . द स्ट्रँड,पंच,बायस्टँडर , वाईल्ड वर्ल्ड अशा मासिकांमधील रेखाटने , व्यंगचित्रे पहाण्यात लक्ष्मण गुंगुन जात . लिहायला वाचायला शिकण्याआधीच लक्ष्मण चित्रकला शिकले . स्वतःच्या कल्पनाशक्तीने ते उत्तम चित्रे काढत . घराच्या भिंती ,फरशा,दरवाजे यावर ते चित्रं काढत . सहज रेघोट्या ओढत ते शाळेतील शिक्षकांची रेखाचित्रे काढत . शाळेतील शिक्षकांनी , त्यांनी काढलेल्या पिंपळपानाच्या चित्राच्या केलेल्या कौतुकामुळे आपल्यात दडलेल्या कलाकाराचा त्यांना साक्षात्कार झाला . स्वतःला ते उदयोन्मुख कलाकाराच्या रुपात पाहू लागले . प्रख्यात ब्रिटिश कार्टूनिस्ट सर डेव्हिड लो यांच्या शैलीचा त्यांच्यावर पगडा होता . लहानपणी बराचकाळ चित्रांखालील त्यांची सही ते low ऐवजी cow अशी वाचायचे ! द हिंदू मध्ये लो यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत . लहानपणीच्या आपल्या चित्रांबद्दल लक्ष्मण ‘ The Tunnel Of Time ‘ या आपल्या आत्मचरित्रात लिहितात , ” I drew objects that caught my eye outside the window of my room – the dry twigs , leaves and lizard- like creatures crawling about , the servant chopping fire wood and of course and number of crows in various postures on the rooftops of the buildings opposite . ”

कावळा हा लक्ष्मण यांचा आवडता पक्षी होता . त्यांच्या दृष्टीने तो ‘ Uncommon bird ‘ होता . लक्ष्मण यांच्या पत्नी कमला म्हणतात , ” He likes crows for their colour and also because the bird is very intelligent . He loves crows more than me .”

शाळकरी मुलांच्या ‘ रफ अँड टफ अँड जॉली ‘ या क्रिकेट टीमचे लक्ष्मण कॅप्टन होते .
‘Dodu the money maker’ आणि ‘ The regal cricket club ‘ या आर.के.नारायण यांच्या गाजलेल्या कथा लक्ष्मण यांच्या शालेय जीवनातील माकडचेष्टांवर आधारित आहेत . संथ चाललेल्या त्यांच्या बालवयातील आयुष्याला धक्का देणारी घटना म्हणजे , अर्धांगवायूच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे झालेले दुःखद निधन .हा धक्का पचवायला मोठे भाऊ समर्थ असल्यामुळे त्यांचे शालेय जीवन सुरळीत सुरू राहिले .

शालेय शिक्षण संपल्यावर आपल्या अत्यंत आवडत्या ड्रॉइंग आणि पेंटिंग या विषयात करियर करण्याच्या उद्देशाने लक्ष्मण यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ  आर्ट्स या संस्थेत आपला प्रवेश अर्ज दाखल केला . पण जे जे स्कूलच्या डीन नी त्यांच्या प्रवेश अर्जाच्या उत्तरादाखल त्यांना कळवले , ” या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक त्या गुणवत्तेचा अभाव असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात येत आहे . ” हे म्हणजे , आईनस्टाईनच्या प्रगती पुस्तकावर शिक्षकांनी मंदबुद्धी असा शेरा मारला होता तसेच झाले ! शेवटी म्हैसूर विद्यापीठातून लक्ष्मण यांनी बीए ची पदवी प्राप्त केली . हे चालू असताना व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रात त्यांची ‘ फ्री लान्सर’ कारकीर्द सुरू होती .

सुरूवातीच्या काळात स्वराज्य , ब्लिझ या मासिकांसाठी त्यांनी काम करण्यास सुरूवात केली . मोठे बंधू नारायण यांच्या द हिंदू मध्ये छापून येणाऱ्या कथांना त्यांची चित्रे प्रसिद्ध होऊ लागली . त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रांमधून त्यांची राजकीय व्यंगचित्रे प्रसिद्ध होऊ लागली .

लक्ष्मण यांची पहिली पूर्णवेळ नोकरी ‘ द फ्री प्रेस जर्नल ‘ मुंबई येथे सुरू झाली . येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी व्यंगचित्रकार होते . इ.स.१९५१ मध्ये त्यांनी ‘ द टाईम्स अॉफ इंडिया ‘ जॉईन केले  आणि तिथून सुरु झाली त्यांची पन्नासहून जास्त वर्षांची देदिप्यमान कारकीर्द . ‘ कॉमन मॅन ‘ जन्माला आला . ‘ यू सेड इट् ‘ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय रोजचे व्यंगचित्राचे सदर सुरू झाले आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला . एशियन पेंटच्या जाहिरातीतील ‘ गट्टू ‘ ही त्यांचीच कल्पना . ‘ द हॉटेल रिव्हिएरा ‘ सारख्या काही कादंबऱ्याही लक्ष्मण यांनी लिहिल्या . मिस्टर अँड मिसेस 55 अशा काही हिंदी चित्रपटातूनही त्यांची कार्टून्स झळकली . मोठे बंधू आर.के. नारायण यांच्या ‘ मालगुडी डेज ‘ या सर्वकालीन ‘ क्लासिक ‘ कलाकृतीला लक्ष्मण यांच्या तितक्याच ‘ क्लासिक’ रेखाचित्रांनी शोभा आणली . याच नावाची टीव्ही सिरियल तसेच ‘ वागळेकी दुनिया ‘ अशा टिव्ही सिरियल्समधे त्यांची कार्टून्स , स्केचेस झळकली . डेव्हिड लो , टी.एस्.इलियट , बर्ट्रांड रसेल , जे.बी.प्रिस्ली , ग्रॅम  ग्रीन इत्यादींची त्यांनी काढलेली कॅरिकेचर्स प्रसिद्ध आहेत .

लक्ष्मण यांचा कॉमन मॅन प्रचंड लोकप्रिय झाला . त्याच्या जन्माविषयी लक्ष्मण म्हणतात ,
” I never found the common man , he found me . I was looking in the crowed and he came and stood in front of me . ” लक्ष्मण यांचा कॉमन मॅन व्यंगचित्रातून कधीही बोलला नाही , त्यावर ते म्हणतात , ” The power is in keeping ones mouth shut , not in blah – blahing . ”

पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल लक्ष्मण यांना सॉफ्ट कॉर्नर होता . याचा अर्थ ते काँग्रेसच्या बाजूचे होते असा नाही . उलटपक्षी आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर घणाघाती टीका केली . व्यंगचित्रं काढताना आणि राजकीय टिप्पणी करताना ते पूर्णपणे न्यूट्रल , निःपक्षपाती असत . नेहरूंविषयी ते म्हणतात , ” He was the best ….. gentle , cultured and caring . He called me for 10 minutes , but our meeting went on for an hour . ”
Name one good politician या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं ” Manmohan Singh . ”

‘ Timeless Laxman ‘ या पुस्तक प्रकाशन समारंभात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ,
” R. K. Laxman’s cartoons don’t hurt people , but have a healing power . ”

इतर अनेक पारितोषिकांबरोबर भारत सरकारने त्यांना इ.स.१९७३ साली ‘ पद्मभूषण ‘ आणि इ.स.२००५ साली
‘ पद्मविभूषण ‘ ने गौरवले . इ.स.१९८४ साली त्यांना ‘ रेमन  मॅगसेसे ‘ पुरस्कार प्राप्त झाला होता .

दि.२६ जानेवारी २०१५ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले .

आजूबाजूला , जगभरात घडणाऱ्या घटनांचे अचूक टिपण , उत्तम निरिक्षण , कुशाग्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर त्यांनी काढलेली व्यंगचित्रे कायमच लक्षात राहतात . चौकड्याचा कोट , धोतर , टोपी , छत्री अशा साध्या वेशातला त्यांचा ‘ कॉमन मॅन ‘ अजरामर झाला आहे . लक्ष्मण यांनी एकाहून एक सरस अशी असंख्य व्यंगचित्रे काढली पण , या माध्यमातून त्यांनी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत . इतका दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारे लक्ष्मण हे बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावेत . जवाहरलाल नेहरू , महात्मा गांधींपासून अटलबिहारी बाजपेयी , लालकृष्ण अडवाणी , सोनिया गांधींपर्यंत राजकीय नेत्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी रेखाटल्या आहेत . सशक्त रेषांमधून या नेत्यांची व्यक्ती वैशिष्ट्ये स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती . लक्ष्मण यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय व्यंगचित्रे बहारदार असत . जगभरातील सर्व प्रसिद्ध राजकीय नेत्यांची बोलकी व्यंगचित्रे ते काढत असत . लक्ष्मण यांनी आपल्या व्यंगचित्रातून खिल्ली उडवली नाही असा राजकारणी विरळा ! भारतीय राजकारणातील गमतीजमती ह्या नेहमीच त्यांच्या पहिल्या पानावरील व्यंगचित्रातून व्यक्त होत असत . इतक्या तल्लखपणे सामाजिक आणि राजकीय जीवनातील विसंगती शोधून काढणारे फारच थोडे व्यंगचित्रकार आहेत .

अशा ह्या जगप्रसिद्ध , सुसंस्कृत व्यंगचित्रकारास आदरपूर्वक अभिवादन !

मुकुंद कुलकर्णी©

pc:google
This Article Originally Published on our Group Website – www.thinkmarathi.com 

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu