आगळं-वेगळं : परदेसी सिनेगॉग, कोची

काही देशांनी व प्रदेशांनी तयार केलेल्या पर्यटन श्रेयपंक्ती(टूरिझम टॅगलाईन्स) खूपच आकर्षक असतात. त्या श्रेयपंक्तींच्याद्वारे देशोदेशींचे प्रवासोत्सुक त्या देशाकडे किंवा प्रदेशाकडे आकृष्ट होतात. जसं मलेशियाची श्रेयपंक्ती, ‘मलेशिया,ट्रूली एशिया’; मॉरिशसची, ‘इट्स अ प्लेझर’; मालदीवची, ‘द सनी साईड ऑफ लाईफ’;  केरळची श्रेयपंक्ती, ‘केरळ,गॉड्स ओन कंट्री’.

बाहेरच्या व्यक्तीला अशा श्रेयपंक्ती त्या देशाकडे किंवा प्रदेशाकडे अशा प्रकारे आकर्षित करतात की त्यात दर्शवलेला भावार्थ त्यांना पूर्णपणे खरा वाटू लागतो. थोडक्यात मलेशिया हा खराखुरा आशिया असून, मलेशियाला भेट दिली की इतर आशियाई देशांमध्ये जाण्याची गरज नाही. अर्थात, चोखंदळ प्रवासी अशा श्रेयपंक्तींच्या आशयाचा बरोबर अंदाज घेतात आणि त्यानुसार आपला प्रवासी कार्यक्रम ठरवतात.

आपल्या देशातील केरळ ह्या राज्याची श्रेयपंक्ती, आधी दिल्याप्रमाणे, ‘गॉड्स ओन कंट्री’ ही अशीच आकर्षक श्रेयपंक्ती. तिथल्या निसर्गावर  सौंदर्याची मुक्त दैवी उधळण झाल्यामुळे तो ‘देवांचा प्रदेश’  किंवा देवांना भावलेला प्रदेश असल्याचा अर्थ त्यातून अभिप्रेत होतो. हा जरी रूढार्थ असला तरी माझ्या दृष्टीने त्या श्रेयपंक्तीतून अजून एक अर्थ लक्षात येतो तो म्हणजे केरळ हा प्रदेश जणूकाही देवांचं वसतिस्थान आहे.

सनातन धर्म केरळच्या भूमीवर आधीपासून होताच. सनातन धर्माची भारतभर पुनर्स्थापना करणारे आदी शंकराचार्य यांचा केरळच्याच  भूमीवर जन्म झाला. वेगवेगळ्या कालखंडात ह्या प्रदेशात जगभरातून  विविध धर्मांचं आगमन झालं व त्या अनुषंगाने त्या त्या धर्मांच्या प्रार्थनास्थळांची निर्मिती झाली. त्यात परत काही  धर्मांचं भारतातील आगमन केरळच्या भूमीवर प्रथम झाल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. वास्को द गामा ह्या पोर्तुगीज खलाशाच्या अनेक शतकं आधी, ख्रिस्ती धर्म भारतात केरळात पोहोचला. इ.स.५२ मध्येच सेंट थॉमस हे ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतात केरळमध्ये मलबार किनाऱ्यावर पोहोचले आणि त्यांनी थ्रीसुर येथे भारतातील पहिल्या चर्चची उभारणी केली.  इस्लामच्या उदयाच्या आधीपासूनच अरबी व्यापाऱ्यांची केरळच्या किनाऱ्यावर येजा होती, त्यामुळे उत्तर भारतात  पोहोचण्याआधीच; इसवी सनाच्या सातव्या शतकातच इस्लाम केरळच्या भूमीवर, मलबार किनारी दाखल झाल्याचे पुरावे मिळतात. तसंच इ.स.६२९ मध्ये भारतीय उपखंडातली पहिली मशीद कोडंगलूर,थ्रीसुर येथे बांधली गेली. ह्या दोन धर्मांशिवाय यहुदी(ज्यू) धर्माचं भारतातलं आगमनही केरळच्या भूमीवर कोडंगलूर येथेच झाल्याचं समजलं जातं.

फेब्रुवारी,२००८ मध्ये आम्ही ‘कोची(कोचीन)-मुन्नार’च्या पर्यटनासाठी स्वतंत्रपणे गेलो होतो. कोचीमध्येच आमचं वास्तव्य होतं. ‘मे २०२०’ च्या ‘आगळं वेगळं’ सदरातील माझ्या ‘नामड्रोलिंग मॉनेस्ट्री’बद्दलच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, आम्हाला हिल स्टेशनला जाऊन राहायला फारसं आवडत नाही. त्यामुळे मुन्नारला आम्ही एका दिवसात जाऊन आलो.  तिथे जातायेता अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेतला. चहाच्या मळ्यांमधून जाणाऱ्या घाट वळणाच्या डोंगरातल्या रस्त्यांनी मुन्नारला एक वेगळाच आयाम प्रदान केला आहे. पर्यटकांना तिथे आनंदाची एक आगळीच अनुभूती मिळते आणि ‘केरळ,गॉड्स ओन कंट्री’चा प्रत्यय येतो.

नंतरच्या दिवशी आम्ही कोची पर्यटनासाठी आमच्या राहण्याच्या हॉटेलमार्फतच टॅक्सी ठरवली. टॅक्सी चालकाने आम्हाला कोचीतील चायनीज फिशिंग नेट्स दाखवून सेंट फ्रान्सिस चर्चला नेलं. ह्या चर्चचं वेगळेपण म्हणजे ह्या चर्चमध्ये इ.स.१५२४ला, ‘वास्को द गामा’च्या मृत्यूनंतर त्याचं शव पुरण्यात आलं होतं. त्यानंतर चौदा वर्षांनी त्याचे अवशेष तिथून काढून पोर्तुगालमध्ये लिस्बनला नेण्यात आले. तरी त्याचं नाव कोरलेला थडग्याचा दगड आपल्याला चर्चमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतरचं ठिकाण म्हणजे ‘परदेसी सिनेगॉग’ असल्याचं त्याने सांगितल्यावर आमची उत्सुकता वाढली कारण यहुदी धर्मियांचं प्रार्थनास्थळ(सिनेगॉग) आम्ही तिथपर्यंत कधी पाहिलं नव्हतं; त्यात त्याच्या नावातील ‘परदेसी’ शब्दाने उत्सुकता अधिकच वाढवली.

दहा-बारा मिनिटांत आम्ही मत्तनचेरी विभागातील,’ज्यू टाऊन’ला पोहोचलो. तिथे एका लहानशा गल्लीच्या तोंडाशी चालकाने टॅक्सी थांबवली. आम्हाला त्याने टॅक्सीतून उतरायला आणि त्या गल्लीत असलेला सिनेगॉग पाहून यायला सांगितलं. आमच्या समोर एक चार-पाच जणांचा गट त्या दिशेनेच निघाला होता, त्यांच्या आपसातील वेगळ्या भाषेतील संभाषणात ‘सिनेगॉग’ शब्द एकदोनदा आलेला मी ऐकला आणि त्यांच्या मागून निघालो. गल्लीच्या दुतर्फा लहान,लहान दुकानं होती. दोनच मिनिटात सिनेगॉगच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो.


प्रवेशद्वारावर यहुदी धर्मियांच्या ‘स्टार ऑफ डेव्हिड’चं चिन्ह दिसलं आणि आम्ही इच्छित स्थळी पोहोचल्याचं लक्षात आलं. सिनेगॉगच्या बाहेर लावलेल्या फलकावरील सूचनेनुसार आम्ही पादत्राणं बाहेर काढून ठेवली. हा स्थानिक अन्य धर्मियांच्या परंपरेचा झालेला परिणाम असल्याचं नंतर समजलं. तसंच तिथे अभ्यागतांच्या ‘ड्रेस कोड’संदर्भात माहिती दिली होती. ते धार्मिक स्थळ असल्यामुळे मर्यादशील कपडे परिधान केलेले असावेत, अशी सूचना फलकावर दिली होती. दुसऱ्या फलकावर सिनेगॉग शुक्रवारी दुपारी, शनिवारी व यहुदी सणांच्या सुट्टयांच्या दिवशी अभ्यागतांसाठी बंद असल्याची माहिती दिली होती. तिसऱ्या फलकावर त्या ‘परदेसी सिनेगॉग’संदर्भात त्रोटक माहिती दिली होती. ती आम्ही वाचली.  सिनेगॉगमध्ये शिरल्यावर लक्ष वेधून घेतलं ते छतावर लावलेल्या अनेक प्रकारच्या काचेच्या झुंबरांनी व सुरेख, रंगीबेरंगी काचेच्या हंडयांनी. समोरच्या बाजूस मध्यावर, नक्षीदार पितळी खांबांनी बंदिस्त केलेलं लहानसं व्यासपीठ होतं. त्याचा उपयोग प्रवचन देण्यासाठी केला जात असल्याचं समजलं. स्त्रिया व पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अजून एका गोष्टीकडे लक्ष गेलं, ते त्याच्या जमिनीवर बसवलेल्या मध्यम आकाराच्या ‘फ्लोअरिंग टाईल्स’कडे. फिकट निळ्या पुष्ठभागावर गडद निळ्या रंगाचं नक्षीकाम त्यावर केलेलं होतं. सकृतदर्शनी सर्व टाईल्सवरील नक्षीकाम जरी सारखंच वाटत असलं तरी नीट पाहिल्यावर प्रत्येक टाईलवरचं नक्षीकाम वेगळं असल्याचं आमच्या लक्षात आलं. आमच्या ह्या निरीक्षणाद्वारे काहीतरी मोठं रहस्य आम्ही  उलगडल्याचा तात्कालिक आनंद आम्हाला झाला.

सिनेगॉगमध्ये प्रथमच आलो असल्याने त्याची अधिकची माहिती जाणून घ्यायची इच्छा होती. तेथील एका सेवेकऱ्याला मी तशी विनंती केली. त्याने उत्साहाने माहिती द्यायला सुरुवात केली व त्यामुळे त्या सिनेगॉगचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात आलं.

सेवेकरी सांगू लागला; “हा सिनेगॉग ‘परदेसी सिनेगॉग’, ‘कोचीन ज्यूईश सिनेगॉग’ तसंच ‘मत्तनचेरी सिनेगॉग’ ह्या नावांनी ओळखला जातो. कोची शहरावरून व मत्तनचेरी विभागावरून जरी इतर दोन नाव पडली असली  तरी ‘परदेसी सिनेगॉग’ हेच नाव जास्त रूढ आहे. परदेसी हा शब्द विदेशी(फॉरेनर) लोकांसाठी बऱ्याच भारतीय भाषांमध्ये वापरला जातो. इ.स.१५६८ साली हा सिनेगॉग बांधून पूर्ण झाला. सेफार्डीक किंवा स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या, पश्चिम आशियातून निष्कासित झालेल्या यहुदी धर्मियांनी(परदेशी) तत्कालीन कोचीन राज्यात हा सिनेगॉग बांधला, म्हणून ‘परदेसी सिनेगॉग’ हे नाव वापरात आलं. कोचीन प्रदेशात खरंतर सात सिनेगॉग वेळोवेळी बांधले गेले. हा सिनेगॉग भारतातीलच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रकुल देशांमधील सर्वात जुना, कार्यरत सिनेगॉग आहे. राम वर्मा ह्या राजाने ह्या सिनेगॉगच्या उभारणीसाठी मलबारी येहुदींना आपल्या राजवाडा व शासकीय मंदिराशेजारी जागा देऊ केली. इ.स.१९६८ साली ह्या सिनेगॉगला चारशे वर्ष पूर्ण झाली; त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या समारंभात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी उपस्थित राहिल्या होत्या. इ.स.१९४८ साली, इस्राएलच्या निर्मितीनंतर बरेचसे यहुदी इस्राएलला स्थलांतरित झाले. आता फारच कमी यहुदी त्या विभागात रहातात. तरीदेखील ह्या सिनेगॉगचं दैनंदिन कामकाज चालू आहे, तसंच तिथे यहुदी सण सुद्धा उत्साहाने साजरे केले जातात.” एव्हढी माहिती दिल्यावर त्याने ‘फ्लोअरिंग टाईल्स’कडे आमचं लक्ष वेधलं व तो त्यातलं वेगळेपण आमच्या लक्षात आणून देऊ लागला. त्यावर त्यातील प्रत्येक फ्लोअरिंग टाईलचं नक्षीकाम वेगळं असल्याचं आमच्या लक्षात आल्याचं आम्ही सांगितल्यावर त्याला आमचं कौतुक वाटलं. त्या फ्लोअरिंग टाईल्स इ.स.१७६२ साली कॅन्टोन,चीन येथून मुद्दामून मागवून सिनेगॉगमध्ये बसवण्यात आल्या. मूळच्या वास्तूसंकुलामध्ये इ.स.१७६० साली सिनेगॉगच्या बाजूला असलेल्या ‘क्लॉक टॉवर'(दर्शनी, वरच्या बाजूस घड्याळ असलेला मनोरा)ची भर पडली. इ.स.१९९८-९९ ह्या वर्षात ‘जागतिक स्मारक निधी’ तर्फे क्लॉक टॉवर तसंच संकुलातील इतर भागांची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर त्याने आम्हाला परदेसी सिनेगॉगला वेळोवेळी भेट म्हणून मिळालेल्या काही वस्तू दाखवल्या. त्याबरोबरच काही पुरातन, ऐतिहासिकदृष्टया महत्वाचे ताम्रपट तिथे असल्याचं त्याने सांगितलं. त्या ताम्रपटांवर जोसेफ रब्बन ह्याला तत्कालीन राजाने दिलेल्या भेटवस्तूंची व बहाल केलेल्या विविध अधिकारांची माहिती जुन्या मल्याळी भाषेत कोरलेली असल्याचं त्याने सांगितलं. त्या ताम्रपटांच्या कालखंडाविषयी निश्चितता नाही. काहींच्या म्हणण्यानुसार ते इसवीसनाच्या अकराव्या शतकातील आहेत तर स्थानिक कोचीन यहूदींच्या समजुतीनुसार ते इ.स.३७९ साली जोसेफ रब्बन याला प्रदान करण्यात आले. सिनेगॉगच्या बाहेरच्या भिंतीवर लावलेली एक कोनशीला त्याने आम्हाला दाखवली. त्यावर हिब्रूमध्ये काही मजकूर कोरलेला होता व त्याचं इंग्रजीतील भाषांतर कोरलेली लादी त्याखाली बसवली होती. त्यावरील माहितीप्रमाणे कोचांगडी येथील इ.स.१३४४ साली बांधलेल्या सिनेगॉगच्या कोनशीलेचा दगड तिथे लावला होता.

त्यानंतर त्याने आम्हाला एका लहानशा स्मरणिका विक्री केंद्रात नेलं. तिथे त्या सिनेगॉगची थोडक्यात माहिती दिलेली एक पुस्तिका आणि आधी उल्लेख केलेल्या ताम्रपटांच्या लघुप्रतिकृतींची आम्ही खरेदी केली. त्या  लघुप्रतिकृतींबरोबर त्यावरील मजकुराचं इंग्रजीतील भाषांतर असलेला कागद दिलेला असल्यामुळे,  त्यावरील माहिती समजली.

त्या सेवेकऱ्याने दिलेल्या ह्या माहितीमुळे परदेसी सिनेगॉग समजण्यासाठी नक्कीच मोठी मदत झाली; नाहीतर आम्ही एखादं प्रदर्शन पाहिल्यासारखं तिथून बाहेर पडलो असतो.

कोचीच्या पर्यटनादरम्यान परदेसी सिनेगॉग दाखवला न गेल्यास, स्वतंत्रपणे वेगळा वेळ काढून ह्या ऐतिहासिक वास्तूला जरूर भेट द्यावी व ‘गॉड्स ओन कंट्री’ चा प्रत्यय घ्यावा.

डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com          

Pc: google       

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu