लालबाग रॉक (खडक), बंगळुरू

पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या बंगळुरू, मैसूरू, उटी या ठिकाणांची सहल एक आनंददायी अनुभव देऊन जाते. दक्षिण भारतीय राज्यांमध्ये काही वेळा जाणवणारी भाषेची अडचणही  ह्या ठिकाणी फारशी जाणवत नाही. कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरातही अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. जवळजवळ असलेली दोन सुरेख  उद्यानं; लालबाग आणि कब्बन पार्क बंगळुरूमध्ये आहेत. तशी एकूण अकरा विविध प्रकारची उद्यानं बंगळुरूमध्ये आहेत. लालबाग हे जरी एक वनस्पती उद्यान असलं तरी नेहेमीच्या वनस्पती उद्यानांपेक्षा त्यात काही वेगळ्या स्थळांचा समावेश आहे. आमच्या दोन वेळा घडलेल्या बंगळुरू पर्यटनादरम्यान, आम्ही दोन्ही वेळेस लालबागला भेट दिली.

 लालबाग उद्यानाची निर्मिती अठराव्या शतकात तत्कालीन शासक हैदर अली याने सिरा येथील मुघल गार्डन्सच्या धर्तीवर केली. त्यानंतर टिपूच्या कालखंडात त्यामध्ये अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची भर पडली. पर्शिया, अफगाणिस्तान, फ्रान्स येथील काही  दुर्मिळ प्रकारच्या वनस्पती प्रजाती इथे आणल्या गेल्या. ब्रिटीश काळातही ह्या उद्यानात शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली आणि एक वनस्पती उद्यान म्हणूनच नव्हे तर सार्वजनिक समारंभांसाठी, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठीही त्याचा वापर होऊ लागला. सध्या एक हजारपेक्षा जास्ती प्रजातींच्या वनस्पती लालबागमध्ये आहेत. मोठ्या वृक्षांच्या बरोबरीने अनेक शोभेची झाडं, औषधी वनस्पती देखील ह्या उद्यानात आहेत. उद्यानाच्या मध्यावर एक ‘ग्लास हाऊस’ आहे. त्याची निर्मिती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात करण्यात आली. तेव्हापासूनच त्यामध्ये पुष्पप्रदर्शनांचं आयोजन करण्यात येऊ लागलं. आताही दरवर्षी भारताचा प्रजासत्ताक दिन; २६ जानेवारी व स्वातंत्र्य दिन; १५ ऑगस्ट, ह्यांना जोडूनच्या आठवड्यात तिथे पुष्पप्रदर्शनं भरवली जातात. आम्ही एकदा दिवाळीनंतर व दुसऱ्या वेळेस मे महिन्याच्या अखेरीस बंगळुरूला गेलो होतो; त्यामुळे आम्हाला ती पुष्पप्रदर्शनं पाहता आली नाहीत, तरी ग्लास हाऊसमध्ये व त्याच्या सुरेख परिसरात फिरणं आनंददायी होतं. 

 लालबागमधलं दुसरं महत्त्वाचं स्थळ म्हणजे लालबागच्या दक्षिणेकडे असलेला एक लहान टेकडीसदृश उंचवटा. तो खूपच विशेष असल्याचं समजल्यामुळे ग्लास हाऊस नंतर आम्ही तिकडे गेलो. पाच-दहा मिनिटात तिथे पोहोचलो. लालबागच्या आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी त्याची थोडी माहिती आम्हाला तिथे कळली होती आणि आम्ही ते ठिकाण पाहूनही आलो होतो. तरी दुसऱ्या भेटीच्या आधी त्यासंदर्भातील अधिकची व जास्ती तपशीलवार माहिती उपलब्ध पर्यायांतून वाचली. त्यामुळे ते ठिकाण व त्याचं महत्त्व समजण्यास मदत झाली.


 भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २५० ते ३४० कोटी  वर्षांपूर्वी ह्या खडकाची निर्मिती झाल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ ह्या संस्थेने ‘अनाच्छादित’ खडकाचं एक उत्तम उदाहरण असं त्याचं वर्णन केलं आहे. खडकांची निर्मिती प्रक्रिया समजण्यासाठी व त्यापुढे जाऊन भूगर्भीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तसंच पृथ्वीच्या उत्क्रांतीसंबंधी ह्या खडकाच्या अभ्यासावर आधारित अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत व शोधप्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. एव्हढंच नव्हे तर तो भूविज्ञानाच्या अभ्यासकांना अजूनही नवनवीन विषय संशोधनासाठी पुरवतो आहे. ह्या सर्वांच्या अनुषंगाने, सर्वसामान्य पर्यटकांना तसंच नागरिकांना खडकांच्या निर्मितीची प्रक्रिया जास्त चांगल्या प्रकारे समजण्यासाठी, त्याविषयात रस निर्माण होण्यासाठी, त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण होण्यासाठी त्याला ‘राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारक’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

 
तत्कालीन मैसूर भूवैज्ञानिक विभागाच्या डॉ. डब्ल्यू. एफ. स्मिथ यांनी इ.स.१९१६साली त्याचा प्रथमच शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याला द्वीपकल्पिय पट्टीताष्म  (Peninsular Gneiss)अशी संज्ञा दिली. त्यानंतर त्याचं भूगर्भीय महत्त्व अधोरेखित झालं. हा ‘अनाच्छादित’ खडक जगभरातील सर्वात जुन्या खडकांपैकी एक आहे. वरील बरीचशी माहिती आधी म्हटल्याप्रमाणे वाचली होती व काही माहिती खडकाजवळ लावलेल्या माहितीफलकावरून समजली. त्या खडकावर काही माणसं चढलेली दिसत होती. आम्हीही मग त्या खडकावर चढलो. लालबागेच्या बाजूने त्याचा चढ फार नाही. खडकावर आम्हाला वेगवेगळ्या रंगाचे पट्टे व थर दिसले. हा रूपांतरित प्रकारचा खडक असल्याची माहितीही तिथे समजली. त्याच्या निर्मितीच्या वेळी उच्चदाबाच्या व तापमानाच्या परिणामस्वरूप त्यातील खनिजांचं विलगीकरण  झाल्यामुळे त्यावर असे वेगवेगळ्या रंगांचे पट्टे तयार झाले आहेत. नकळत शालेय भूगोलात शिकलेल्या खडकांच्या प्रकारांची; गाळाचे(सेडिमेंटरी) खडक, अग्निज(इग्निअस) खडक व रूपांतरित(मेटामोर्फीक) खडक यांची मनातल्या मनात उजळणी झाली. ह्या खडकाचा चढ लालबागेच्या बाजूने जरी सोपा असला तरी त्यावर गेल्यावर दुसऱ्या बाजूस आपल्याला त्याचा बराच उतार असल्याचं लक्षात येतं पण वरून आपल्याला बंगळुरू शहराचं विहंगम दृश्य दिसतं.

 खडकाच्या मध्यावर एक बुरुजाकृती वास्तू दिसली. ती वास्तूदेखील ऐतिहासिक महत्त्वाची आहे. बंगळुरू शहराची स्थापना पंधराव्या शतकात, विजयनगर साम्राज्याचे एक सरदार केम्पेगौडा यांनी केली. त्यांनी बंगळुरू शहराची हद्द दर्शवण्यासाठी चार दिशांना बुरुज बांधले. त्यातला दक्षिण दिशेची सीमा दर्शवणारा बुरुज त्या खडकावर उभारला.

एक आगळं वेगळं ठिकाण आम्ही अनुभवलं. लालबाग रॉकमुळे लालबागेच्या महत्त्वात भर पडली आहे. “लालबाग ‘रॉक्स’  विथ ‘लालबाग रॉक’.”असं म्हणता येईल. काही वेळा दगडाखडकातून वाट काढत वनश्री पाह्यला जावं लागतं, लालबागच्या सुंदर वनश्रीतून आम्ही खडक पाहायला गेलो.

 बंगळुरू पर्यटनात लालबाग भेटीच्या वेळी ह्या राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारकाला जरूर भेट द्यावी.

डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com          

Pc: google    
Originally published on our Group Website – www.thinkmarathi.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu